जागतिक मधुमेह दिन विशेष | मधुमेह म्हणजे काय ?

वाचा सविस्तर लेख
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: November 14, 2022 15:57 PM
views 293  views

इंग्रजी बोली भाषेत किंवा लेखी भाषेत मधुमेहाचा उल्लेख ‘ डायबेटीस ‘ असा केला जातो. ‘ डायबेटीस मेलिटस ‘ या शब्दाचे हे संक्षिप्त रूप आहे. तथापि, ‘ डायबेटीस इन्सिपिडस ‘ नावाचा आणखी एक दुर्मीळ प्रकारचा मधुमेह अस्तित्वात असतो, याचे प्रमाण मात्र अगदी अत्यल्प आहे. अतिरिक्त प्रमाणात लघवी होणे आणि खूप तहान लागणे ही दोन लक्षणे दोन्ही प्रकारच्या अनियंत्रित मधुमेहात दिसून येतात. मात्र ‘ डायबेटीस इन्सिपिडस ‘ या प्रकारात इन्शुलिनची कमतरता भासत नाही आणि त्यामुळे रक्तातील ग्लुकोजचे (साखरेचे) प्रमाण नेहमीच सर्वसाधारण पातळीच्या आत राहते. या लेखात मधुमेहाचा उल्लेख केला गेला आहे तो ‘ डायबेटीस मेलिटस’चा. पोटाच्या वरच्या भागात जठराच्या मागे स्वादुपिंड नावाची संप्रेरक ग्रंथी असते आणि या ग्रंथीतून इन्शुलिन हा संप्रेरक स्रवत असतो. इन्शुलिनच्या पूर्ण अथवा सापेक्ष प्रमाणात असलेल्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या शारीरिक बिघाडांचा ‘ डायबेटीस मेलिटस’मध्ये समावेश होतो. मधुमेहाच्या स्थितीचा लिखित स्वरूपातील उल्लेख सर्वप्रथम इ.स.पूर्व १५०० मध्ये भारतीय आयुर्वेदाच्या ग्रंथात सापडतो. खूप प्रमाणात तहान लागणाऱ्या, अतिरिक्त प्रमाणात लघवी होणाऱ्या आणि शरीराला दौर्बल्य आणणाऱ्या या विचित्र रोगामुळे त्रस्त असणाऱ्या रुग्णाच्या लघवीकडे माश्या आणि मुंग्या आकर्षित होतात असा संदर्भ या लिखाणात सापडतो . ‘ डायबेटीस ‘ हा शब्द इजिप्तच्या अपोलोनियस याने इ.स.पूर्व २३० मध्ये पहिल्यांदा वापरला.



शब्द त्याने ग्रीक शब्द ‘ siphon ‘ किंवा ‘ to go through ‘ या शब्दावरून घेतला आहे. ज्या आजारात, रुग्ण जितके द्रव पदार्थ सेवन करतो त्यापेक्षा जास्त प्रमाणात तो ते शरीराबाहेर टाकतो, याच्याशी त्याचा संदर्भ जोडलेला आहे. त्यानंतर सतराव्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिश डॉक्टर विलीस यांनी ‘ मधुर ‘ शब्दासाठी ‘ mellitus ‘ हा लॅटिन शब्द जोडला कारण मधुमेहीच्या लघवीत साखरचे अस्तित्व असल्यामुळे ती मधासारखी गोड असते.


इन्शुलिन हे एक अत्यंत महत्त्वाचे विधायक संप्रेरक (कार्यप्रवर्तक किंवा शरीर सुदृढ करणारे) असून त्याचा माणसाच्या चयापचय क्रियेवर खोलवर परिणाम होत असतो. त्याच्या विविध कार्यामध्ये कर्बोदकांच्या चयापचयाचा (metabolism) समावेश होतो. आपल्या अन्नपदार्थातील ६० टक्के ऊर्जा (calories) कर्बोदकातून मिळते आणि पचनक्रिया पूर्ण होते तेव्हा त्याचे रूपांतर ग्लुकोजमध्ये किंवा साध्या साखरेमध्ये होते. ही साखर हळूहळू आतड्यातून रक्ताभिसरणात मिसळते आणि रक्ताभिसरणाद्वारे सर्व पेशींपर्यंत आणि ऊतींपर्यंत ( tissues ) जाऊन पोचते. ही साखर पेशींच्या – विशेषतः स्नायूंच्या – आतपर्यंत पोचवण्याच्या कामी इन्शुलिन मदत करते.



इथे यापैकी काही साखरेचे काही प्रमाणात ऊर्जा देण्यासाठी विघटन होते आणि काही साखर ग्लायकोजनच्या स्वरूपात भविष्यात उपासाच्या काळात वापरण्यासाठी म्हणून साठवली जाते. यकृतात साखर तयार होण्याच्या क्रियेला इन्शुलिन विरोध करते. अशा रीतीने इन्शुलिन दुहेरी कार्य करते. एक म्हणजे रक्तातील साखर ऊतींपर्यंत वाहून नेण्याच्या कामी मदत करते आणि दुसरे म्हणजे यकृतातील साखरेचे उत्पादन करण्यास विरोध करते. इन्शुलिनच्या या दोन्ही कार्यांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण सर्वसाधारण पातळीत राखण्यास मदत होते. मधुमेहामध्ये एक तर इन्शुलिनचे उत्पादनच होत नाही, म्हणजे प्रकार एकच्या मधुमेहात (Type 1 Diabetes Mellitus) जसे होते तसे किंवा प्रकार दोनच्या मधुमेहात असते त्याप्रमाणे इन्शुलिनची कमतरता असते. ही कमतरता वास्तविक किंवा सापेक्ष असू शकते. हा दुसऱ्या प्रकारचा मधुमेह (Type 2 Diabetes Mellitus) सर्वसाधारणपणे सर्वत्र आढळून येणारा मधुमेह आहे. (भारतात आढळणाऱ्या मधुमेही रुग्णांपैकी 96 % रुग्ण मधुमेहाच्या या उपगटात मोडतात.)


मधुमेहाच्या व्याधीत इन्शुलिनची वास्तविक किंवा सापेक्ष कमतरता असते. इन्शुलिन हे स्वादुपिंड या संप्रेरक ग्रंथीतील बीटा पेशीत निर्माण केले जाणारे संप्रेरक आहे. इन्शुलिनच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.



दुसऱ्या प्रकारच्या मधुमेही रुग्णात तयार होणाऱ्या इन्शुलिनचे प्रमाण अनिश्चित असते. स्वादुपिंड वेगवेगळ्या प्रमाणात इन्शुलिन तयार करते. काही जणांमध्ये, म्हणजे उंबरठ्यावरील मधुमेही आणि नुकतीच लागण झालेले मधुमेही यांच्यात इन्शुलिनचे प्रमाण मधुमेह न झालेल्या व्यक्तीमध्ये तयार होणाऱ्या इन्शुलिनपेक्षाही जास्त असते. तथापि, अशा व्यक्तीच्या ऊतींची इन्शुलिनशी असलेली संवेदनशीलता सामान्य व्यक्तीपेक्षा कमी असते. त्यामुळे त्यांना त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण सर्वसाधारण ( नॉर्मल ) पातळीत ठेवण्यासाठी सामान्य माणसापेक्षा जास्त इन्शुलिनची गरज भासते. मधुमेह होण्यापूर्वीच्या सुरुवातीच्या काळात स्वादुपिंडामध्ये जास्त इन्शुलिन तयार होते आणि स्रवले जाते आणि त्याद्वारे ऊतींची इन्शुलिनशी कमी झालेली संवेदनशीलता भरून काढण्यास मदत करते. इन्शुलिनशी असलेला हा प्रतिकार असाच चालू राहिला तर एक वेळ अशी येते की , स्वादुपिंडातील बीटा पेशी सतत वाढणारी इन्शुलिनची मागणी पुरी करण्यात असमर्थ ठरतात. या टप्प्यावर अशा व्यक्तींना इन्शुलिनची सापेक्ष कमतरता जाणवते आणि त्यांना मधुमेह होतो.


इन्शुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण पुढीलप्रमाणे नियंत्रित ठेवते



ऊतींमध्ये साखर पोचवण्यास मदत ➡️ यकृतातील साखर उत्पादनास विरोध ➡️ मधुमेहात इन्शुलिनची कमतरता असते ➡️ परिणामी ऊतींमध्ये साखरेचा शिरकाव कमी होतो आणि यकृतातील साखरेचे उत्पादन वाढते परिणामी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.


स्वादुपिंडात ‘ आयलेटस् ऑफ लँगरहॅन्स ‘ नावाच्या संप्रेरक ( hormone ) तयार करणाऱ्या पेशींची बेटे असतात. तिथे बीटा पेशी स्थित असतात. सामान्य परिस्थितीत या पेशी रक्तातील साखरेच्या पातळीचा सतत अंदाज घेत असतात आणि त्यानुसार इन्शुलिन निर्माण करण्याचा आणि ते स्रवू देण्याचा वेग बदलत असतात. जेव्हा रक्तातील साखर वाढते म्हणजे उदाहरणार्थ, जेवणानंतर तेव्हा त्या पेशी रक्ताभिसरणात जास्त इन्शुलिन सोडतात. उपाशी अवस्थेत जेव्हा रक्तातील साखर कमी होते तेव्हा त्या पेशी इन्शुलिनचे स्रवणे तात्पुरते स्थगित करतात.


स्थूलतेचा / लठ्ठपणाचा आणि इन्शुलिनची संवेदनशीलता कमी होण्याशी किंवा इन्शुलिनशी प्रतिकार करण्याशी संबंध असतो. बऱ्याच स्थूल व्यक्ती त्यांच्या स्वादुपिंडात जास्त इन्शुलिन तयार करून आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवतात आणि या दोषावर मात करतात. परंतु ज्या स्थूल व्यक्तींना बीटा पेशींचा दोष आनुवंशिकतेने मिळाला आहे अशा व्यक्ती, ऊतींकडून होणारी जास्त इन्शुलिनची मागणी पूर्ण करू शकत नाहीत. मागणी आणि पुरवठ्यात जेव्हा व्यस्त प्रमाण होते तेव्हा मधुमेह होतो. तथापि , बीटा पेशींचा दोष (आनुवंशिकतेने किंवा इतर कारणांमुळे निर्माण झालेला) नसलेल्या लठ्ठ व्यक्तींची, मागणीनुसार हवे तेवढे इन्शुलिन तयार करण्याची अमर्याद क्षमता असते. त्यामुळे अशा व्यक्ती लठ्ठ असूनही आणि इन्शुलिनशी प्रतिकार असूनही त्यांना मधुमेह होत नाही.


इथे हेही लक्षात घेतले पाहिजे की चेहरा एक मुखवटे अनेक मधुमेह अनेक मुखवटे घेऊन येतो. बालपणी व तरुणपणी मुखवट्याशिवाय येतो. तेव्हा मधुमेहाची सर्व चिन्हे दिसतात, तर वयाच्या तिशीनंतर येतो तेव्हा प्रारंभी पुष्कळदा काहीही चिन्हे नसतात. काही वेळेस त्यापासून उद्भवणाऱ्या दुष्परिणामांचा मुखवटा त्यावर असतो, तर काही वेळेस इतर असंबद्ध चिन्हांचा मुखवटा तो धारण करतो. म्हणून तिशी उलटली असली तर, लठ्ठपणा असेल तर, आनुवंशिकता असेल तर, मधुमेहाची तपासणी करून घ्या. लक्षणे सुरू होईपर्यंत थांबल्यास फार उशीर होईल.



मधुमेह होण्यासाठी लठ्ठपणा असणे ही काही आवश्यक गोष्ट नव्हे. बीटा पेशींचा तीव्र दोष असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत, त्यांचे वजन सामान्य माणसांइतकेच असले तरी त्यांना मधुमेह होतो. भारतात लठ्ठपणा आणि मधुमेह यांचा परस्पर संबंध पाश्चिमात्य देशांइतका प्रभावी नाही. लक्षात ठेवा, लठ्ठपणा आणि मधुमेह बहुधा बरोबरीने असतात, पण प्रत्येक लठ्ठ माणूस मधुमेही नसतो आणि प्रत्येक मधुमेही माणूस लठ्ठ नसतो.