WORLD BOOK DAY | पुस्तकांचं गांव.. वाचाल तर नक्कीच प्रेमात पडाल !

जागतिक पुस्तक दिनानिमित्त खास लेख
Edited by: रमा खटावकर
Published on: April 23, 2023 11:08 AM
views 402  views

पुस्तकांचे गाव...भिलार याबद्दल खूप ऐकले होते. प्रत्यक्ष भेट द्यायचा योग आला. याबद्दल आवर्जून सर्वांना माहिती द्यावी, असे वाटले, म्हणून फोटोही काढले. 


पूर्वी स्ट्रॉबेरीसाठी आणि सध्या त्याचबरोबर पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेले हे भिलार गाव महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणापासून आठ कि.मि. आंतरावर आहे. अवघ्या दोन कि.मि. विस्तार असलेल्या या छोट्याशा पण टुमदार गावाने भारतातील पहिले “पुस्तकांचे गाव” होण्याचा मान पटकावला आहे. पुस्तके आणि साहित्यासंदर्भातील ओळख असल्यामुळे याबरोबरच येणारा सुसंस्कृतपणा गावात फिरताना पदोपदी जाणवतो. 


गावातील काही घरांनी (प्रथम २५ घरे होती, आता ३० झाली आहेत.) आपल्या घरातीलच एका खोलीचे ग्रंथालय बनवले आहे. अतिशय नेटकेपणे ठेवलेली एकेका विषयावरील पुस्तके, तिथेच बसून वाचनाची उत्तम सोय, वाचनासाठी आवश्यक असे वातावरण, घरातील व्यक्तींचे प्रसन्न, अगत्यपूर्ण सहकार्य या गोष्टी अनुभवून रसिक वाचकाचे मन प्रसन्न होते. आपण स्वतः पुस्तकांच्या कपाटांमधून, रॕक्सवरून पुस्तके घेऊन हाताळू शकतो.  हे सर्व संपूर्णपणे निःशुल्क आहे.


प्रत्येक पुस्तकालयात सुबक अशी पुस्तकसूची, अभिप्राय वही, वर्तमानपत्रातील भिलारसंबंधित बातम्यांची कात्रणे असलेली चिकटवही असे सर्व ठेवलेले असते. कादंबर्या, विनोद, ऐतिहासिक , नियतकालिके, दिवाळीअंक, बोलकी पुस्तके, अशा ३० पद्धतींनी वर्गीकरण केले आहे. 


प्रकल्प सुरू झाला, त्यावेळी सुमारे १५,००० पुस्के होती, आता ही संख्या २५,००० झाली आहे. सर्व पुस्तके फक्त मराठीतलीच आहेत. पुस्तकविक्रीचे दुकान मात्र एकच आढळले. एक प्रकल्प कार्यालयही आहे. साहित्यविषयक कार्यक्रमांच्या सादरीकरणासाठी एक नाट्यगृहही आहे. 


या गावातून फिरताना गावातील भिंतींवर, घरांवर, पुस्तकांच्या संदर्भातलीच सुंदर सुंदर चित्रे, कार्टून्स दिसतात. आपल्या पु. लं.चं एक कार्टून तर सेल्फी पॉइंट म्हणून प्रसिद्ध झालं आहे. गावात कुठल्या घरात, कुठल्या विषयाची पुस्तके आहेत, त्याच्या locationचा एक नकाशाही लावला आहे. त्यामुळे आपले शोधणे सोपे होते. 


गावाबद्दल आणखी कुतूहल वाढले, आणि खालील माहिती मिळाली. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाने हा आगळावेगळा उपक्रम राबविला गेला आहे. ४ मे २०१७ रोजी मा. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. 


याआधी तीन दिवस एक बस करून चित्रकार इथे आले होते. त्यांनी सगळं गाव छानछान चित्रांनी भरून टाकलं.


ब्रिटनमध्ये “Hay on Wye” या नावाचे एक गाव आहे. पुस्तकांची दुकाने, व साहित्यसंदर्भातील उत्सव- उपक्रमांसाठी ते प्रसिद्ध आहे. या गावावरून भिलार- पुस्तकांचे गाव बनविण्याची प्रेरणा मिळाली, असा उल्लेख मिळतो. 

हवामान आल्हाददायक असल्याने, गावात फिरण्याचे श्रम आजिबात जाणवत नाहीत.

तरीही श्रमपरिहारासाठी प्रत्येकाच्या रुचीनुसार अल्पोपहार, तसेच भोजनगृहेही आहेत. अर्थातच तिथेही पुस्तकांची सोबत सुटत नाहीच. हंगाम असेल तर मधुर अशा स्ट्रॉबेरींचा पण आस्वाद घेता येईल. गावात फिरताना अनेक ठिकाणी स्ट्रॉबेरीची लागवड केलेलीही पहायला मिळाली.


“भारतातील पहिले” असा या गावाचा उल्लेख पाहिल्यावर गूगल सर्च केले, तेव्हा वरील ब्रिटनमधल्या गावाखेरीज library tourism म्हणून ओळखली जाणारी फ्रान्समधली आठ गावे अशाच वर्णनाची (book towns) आढळली. बाकी कुठेही असा उल्लेख नाही. 


तर मग याला अशियातील अशा प्रकारचे पहिले गाव म्हणण्यास हरकत नसावी.


प्रत्येक पुस्तकप्रेमीने एकदा तरी भेट द्यावी आणि पुस्तकांमधे हरवून जावे, असे हे गाव नक्कीच आहे.


- रमा खटावकर 

(फेसबूकवरून साभार )