
कुडाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सिंधुदुर्ग विभागीय कार्यालयाने नऊ कर्मचाऱ्यांवर केलेली नियमबाह्य निलंबनाची कारवाई अखेर मागे घेण्यात आली आहे. सेवा शक्ति संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे सिंधुदुर्ग विभागीय अध्यक्ष संदेश सावंत यांनी या प्रकरणी पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्यात आली.
या संदर्भात राणे यांनी रा.प. महामंडळाचे महाव्यवस्थापक आणि परिवहन मंत्री यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर, ज्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते, त्याच अधिकाऱ्यांच्या सहीने हे निलंबन आज, १९ ऑगस्ट २०२५ रोजी मागे घेण्यात आले.
सेवा शक्ति संघर्ष एसटी कर्मचारी संघ, सिंधुदुर्ग विभागाने या यशस्वी प्रयत्नांबद्दल पालकमंत्री ना. श्री. नितेश राणे आणि विभागीय अध्यक्ष संदेश सावंत यांचे आभार मानले आहेत.
या आंदोलनात भाजप कामगार नेते अशोक राणे, विभागीय उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर, जिल्हा भाजप सरचिटणीस बाळू देसाई, कुडाळ आगार कार्याध्यक्ष सुनील बांदेकर, अध्यक्ष दादा साईल, उपाध्यक्ष जयेश चिंचळकर आणि कुडाळ आगार सल्लागार रुपेश कानडे यांनी सक्रिय सहभाग घेतला.