Valentine's Day Special | किशोरावस्थेत वाढतोय प्रेमाचा 'गुंता' !

मनोविकारतज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांच्याशी केलेली खास बातचीत...
Edited by: प्रा. रुपेश पाटकर
Published on: February 14, 2023 10:30 AM
views 528  views

१३ ते १९ वर्षांपर्यंतचा काळ म्हणजे किशोरावस्था! मुले- मुली वयात येण्याच्या या काळात त्यांच्यामध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. स्वत:चा शोध घेण्याची प्रक्रिया सुरु होते. आत्मभान यायला लागते. स्वतःला सिद्ध करायची धडपड सुरू होते. मित्रांचा प्रभाव, गोष्टी मनाप्रमाणे झाल्या नाहीत तर निराशा येणे, नवे नातेसंबध निर्माण होताना त्या बदलांशी जुळवून घेणे या सगळ्याशी 'डील' करण्याचे हे वय असते. या कालावधीत घडणाऱ्या सर्वच चांगल्या वाईट घटनांचा मनावर परिणाम होतो आणि दीर्घकाळ राहतो. या अत्यंत संवेदनशील वयात प्रेमाची भावना आणि आकर्षण वाटणे नैसर्गिक असते. बदलत्या काळासोबत पिढी बदलतेय आणि किशोरवयीन मुलांमध्ये प्रेमाचा 'गुंता' वाढतोय... याच विषयावर मनोविकारतज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांच्याशी केलेली बातचीत...

-------------------------------------------------


प्रश्न-  आपल्याला एखाद्याबद्दल केवळ आकर्षण वाटतंय की प्रेम आहे हे या वयात कसे ओळखायचे? 

उत्तर- किशोरवयीन मुलां-मुलींमध्ये 'हार्मोनल चेंजेस' होत असतात, त्याचवेळी लैंगिक जाणिवा विकसित होत असतात, भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण वाटायला लागते. अशावेळी आकर्षण आणि प्रेम या दोन भावनांमध्ये गल्लत होऊ शकते. एखादी व्यक्ती अचानक तीव्रपणे आवडायला लागते. ती व्यक्ती का आवडायला लागते याचे कारण नसते. ही भावना मोह किंवा आकर्षणाची असते ज्याला इंग्रजीत इन्फॅच्युएशन म्हणतात. त्या व्यक्तीने सतत आपल्याशी बोलत राहावे, आपल्यासाठीच वेळ द्यावा असं वाटत राहते. त्या व्यक्तीविषयी अधिकाराची भावना निर्माण होते. पण प्रेम ही भावना अशी नसते. प्रेमामध्ये समोरच्याविषयी काळजी असते, त्याचे भलं व्हावं ही मुख्य भावना असते,इन्फॅच्युएशनमध्ये जी व्यक्ती आपल्याला आवडते ती आपलीच व्हावी ही भावना वरचढ ठरते. त्यामुळे अनेकदा या वयात समोरच्या व्यक्तीची भुरळ पडते पण ते प्रेम असेलच असे म्हणता येत नाही.



प्रश्न- ब्रेक अप झाल्यानंतर मुलांना डिप्रेशन येते, आत्महत्या केल्याच्या घटनादेखील आपण वाचतो हे कशामुळे घडते?

उत्तर- किशोरवयीन मुलांमध्ये ‘रिस्क टेकिंग बिहेव्हिअर’खूप जास्त असते. वयाची चिंता किंवा समाजाच्या बंधनांची भीती त्यांना वाटत नाही. त्यात चित्रपट, सोशल मीडिया, टीव्ही मालिका यांच्या माध्यमातून त्यांच्या कोवळ्या मनावर प्रेम,आकर्षण,जवळीक अशा भावनांचा भडिमार होत असतो. त्यामुळे अनेकदा आकर्षणाला या वयातील मुले प्रेमाची उद्दात भावना समजतात. 'हम तेरी बाहोमे मर जायेंगे' वगैरेसारखे डायलॉग ऐकत मोठ्या झालेल्या या मुला-मुलींना प्रेम सिद्ध करायचे तर फार मोठा त्याग वगैरे करावा लागतो असे वाटत असते. त्यात जर फसवणूक झाली किंवा आवडत्या व्यक्तीने नाही म्हटले,मन मोडले तर ते सहन होत नाही आणि मुले मानसिकदृष्ट्या खचतात. हे खरे प्रेम नाही हे समजण्याइतकी परिपक्वता त्यांच्याकडे नसते.मनातील या घालमेलीमुळे टोकाची पाऊले उचलली जातात.



प्रश्न- या वयात नकार पचवणे जड जाते का? नकार कसा स्वीकारावा? 

उत्तर- एका व्यक्तीच्या नकाराने आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे मूल्यांकन होत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. नकारामुळे आपला स्वाभिमान दुखावला जाता कामा नये. नकार मिळाला म्हणजे आपली प्रतिष्ठा गेली वगैरे अशा टोकाच्या विचारांमुळेच नकार पचवणे जड जाते. समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी भावना नाहीत इतका साधा विचार यामागे आहे. इथे पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते.आजकाल मुलांच्या तोंडून शब्द बाहेर पडताच ती वस्तू त्यांच्या समोर हजर असते. त्यामुळे मागेल ते लगेच मिळतेच ही प्रवृत्ती वाढली आहे. यातूनच मग मला समोरची व्यक्ती आवडते तर माझ्या प्रपोझचे उत्तर लगेच आणि सकारात्मक मिळालेच पाहिजे अशा अपेक्षा वाढतात.थांबायची किंवा नकार ऐकण्याची त्यांची तयारीच नसते. त्यामुळे पालकांनी लहानपणापासून आपल्या मुलांना 'संयम' शिकवला पाहिजे. वाटता क्षणी ती गोष्ट  देणे नव्हे, तर थोडा पुढचा-मागचा विचार करून संयमाने आपल्या इच्छांची पूर्तता करून घेणं (डिलेड ग्रॅटीफिकेशन) मुलांना शिकवायला हवं.  जीवनात पाहिजे ती प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळलेच असे नाही, पण त्याशिवायदेखील आयुष्य छान जगता येते हे मुलांना समजावणे गरजेचे असते.


प्रश्न- ब्रेकअपमधून बाहेर पडायला अनेकदा व्यसनांचा आधार घेतला जातो,हे कशामुळे होते?

उत्तर- आपल्याला त्रास देणाऱ्या विचारचक्रातून बाहेर पडायला हा आधार घेतला जातो. पुढचे काही तास त्या पदार्थांची नशा असल्याने मूळ प्रश्न विसरायला मदत होते. पण तो प्रश्न कायमचा सुटत नाही. तुम्ही जर ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर पडायला व्यसनांचा आधार घेत असाल तर याचा अर्थ तुम्हाला आयुष्यातील ताणतणावाचे व्यवस्थापन करायला जमत नाही. त्यासाठी चार सोप्या गोष्टी शिकाव्या लागतील. चिकित्सक विचार,सर्जनशील विचार,निर्णय क्षमता,समस्या निराकरण ही चार कौशल्ये शिकल्यावर स्ट्रेस मॅनेजमेंट उत्तम जमेल. नेमकी समस्या काय हे समजायला चिकित्सक विचार करता यायला पाहिजे आणि त्यातून बाहेर पडायचा मार्ग शोधण्यासाठी सर्जनशील विचार करता यायला पाहिजे. हे जमले की स्ट्रेस मॅनेज करायला व्यसनांचा आधार घ्यावा लागणार नाही.



प्रश्न-  मित्र-मैत्रिणींमध्ये ''कूल'' दिसण्यासाठी आजकाल कज्युअल रिलेशनशीपचे फॅड आले आहे, अशी नाती जुळवणे किती घातक आहे?

उत्तर- या वयातल्या मुलांवर 'पीअर प्रेशर' असते.जेव्हा एखाद्या ग्रुपमधील सगळेच एकच कृती करत असतात तेव्हा मुले या 'पीअर प्रेशर'ला बळी पडतात. आपण तसे वागलो नाही तर एकटे पडण्याची भीती असते,इतरांपेक्षा वेगळे दिसू अशी चिंता असते. त्यामुळे मग अनेकदा मनाला न पटणाऱ्या गोष्टी कराव्या लागतात.बाह्य दिखाऊपणा आणि आतला भावनिक ओलावा यात मुले गल्लत करतात. इतरांना खूश करायला मग मन मारून गोष्टी करत राहतात. आपण आपल्या आनंदचा रिमोट कंट्रोल इतरांच्या हाती देतो ते थांबवले पाहिजे. आपल्याला खरा आनंद कशातून मिळतोय हे शोधले पाहिजे. तुमची मतं,मूल्य जुळणाऱ्या व्यक्तींशी मैत्री केली पाहिजे.पटत नसलेल्या किंवा तुमच्या तत्त्वांना धरुन नसलेल्या गोष्टींना नकार द्यायला पाहिजे. वेळप्रसंगी ‘नाही’ म्हणायला शिकले पाहिजे.


प्रश्न- नाही म्हणणे अनेकांना जड जाते, नाही म्हणण्याचा आत्मविश्वास कसा आणावा?

उत्तर- ही समस्या वयाच्या प्रत्येक टप्प्यात भेडसावत असते. परंतु नात्यांचा गुंता वाढवायचा नसेल तर ठामपणे नकार देता येणे प्रत्येकाने शिकले पाहिजे.विशेषत: किशोरवयीन मुलींनी हे समजून घेतले पाहिजे की समोरच्या मुलाच्या मनात नेमके काय सुरु आहे? तुम्हाला आवडत नसताना एखादी व्यक्ती तुम्हाला फिरायला नेते आहे, तुमच्याशी शारिरीक जवळीक साधायचा प्रयत्न करत आहे तर समजून जावे त्या व्यक्तीचे तुमच्यावर प्रेम नाही,कारण इथे ती तुमच्या मनाचा, भावनांचा विचारच केला जात नाहीये. समोरची व्यक्ती तुमच्या भावनांचा आदर करत नसेल, तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करून मनाविरुद्ध गोष्टी करायला लावत असेल तर ते प्रेम नाही हे ओळखून मुलींनी वेळीच सावध व्हायला पाहिजे.  



प्रश्न- जर ब्रेकअप झाले असेल तर त्या त्रासातून बाहेर कसे पडायचे?

उत्तर- तुमचा ज्यांच्यावर विश्वास असेल त्यांच्याकडे जाऊन आपले मन मोकळे करा. नातेवाईक नसतील तर तुमच्या जवळचे मित्र असतील ज्यांच्याबद्दल तुम्हाला विश्वास असेल की त्यांना गोष्टी सांगितल्या तर त्याचे गॉसिप होणार नाही अशा मित्र मैत्रिणींची मदत घ्या.हे दु:ख, या नकारात्मक भावना कायमस्वरूपी टिकणाऱ्या नाहीत हे लक्षात ठेवा.त्यामुळे ब्रेक अप झाले आता आयुष्यात काहीच चांगले उरले नाही किंवा माझ्याच बाबतीत हे का घडले असे म्हणत स्वत:लाच दोष देत बसू नका. त्यातून सावरायला स्वत:ला वेळ द्या.जर या गोष्टी करूनही तुम्हाला नैराश्याने ग्रासले असेल,किंवा त्यातून प्रामाणिक प्रयत्न करूनही बाहेर पडू शकत नसाल तर मग मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, रिलेशनशीप काऊन्सिलर यांची न लाजता मदत घ्या.



प्रश्न- या वयात मुलं पालकांशी गोष्टी शेअर करत नाहीत, किंवा त्यांचे बोलणे लेक्चर वाटते...त्यामुळे पालकांनी या वयातील मुलांशी वागताना काय काळजी घ्यायला हवी?

उत्तर- पालकांनी उपदेश देणाऱ्याच्या भूमिकेत न शिरता मित्र-मैत्रिणीच्या भूमिकेत शिरले पाहिजे. त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत.पण अनेकदा पालक मुलांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात.आपण चांगले संस्कार द्यायला कमी पडलो असा विचार करणे योग्य नाही. तुमच्याशी कोणत्याही विषयावर मोकळेपणाने बोलतील असे वातावरण तुम्ही मुलांसाठी निर्माण केले पाहिजे. पालकांना कदाचित आपले म्हणणे, कृती पटणार नाही पण ते मला मारणार नाहीत किंवा पूर्णपणे चुकीचे ठरवणार नाहीत हा विश्वास त्यांना वाटला पाहिजे. तुम्ही संवादाची सगळी दारे बंद करून टाकली तर मुले तुमच्याशी मोकळेपणाने बोलणारच नाहीत. जर आई वडिलांना मुलांसाठी वेळ नसेल किंवा त्यांच्यात सारखी भांडणं होत असतील तर अनेकदा मुले बाहेर भावनिक आधार शोधतात. त्यांच्या या हळव्या मनस्थितीचा फायदा कोण कसा घेईल हे सांगता येत नाही. त्यामुळे पालकांनी मुलांना वेळ दिला पाहिजे. संवादातून समस्येवर मार्ग काढता येतो आणि तुम्ही त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी, त्यांना समजून घेण्यासाठी नेहमीच त्यांच्यासोबत आहात हे मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे.