
सिंधुदुर्ग : गणेशोत्सवाचा सण आला की घरोघरी उमटणारा एकच सुवास म्हणजे वाफाळलेल्या उकडीच्या मोदकाचा! आज बाजारात चॉकलेट, मावा, ड्रायफूट, आणि आईस्क्रीम मोदकांचा महापूर आला असला, तरी पारंपरिक उकडीच्या मोदकाची जागा कोणीही हिरावून घेऊ शकलेले नाही. बदलत्या जीवनशैलीत आणि आधुनिक खाद्यसंस्कृतीतही उकडीच्या मोदकाचा 'ट्रेंड' आजही तितकाच भक्कमपणे टिकून आहे.
गेल्या काही दशकांत आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींत प्रचंड बदल झाला. एकेकाळी ग्रामीण भागात चुलीवरचा स्वयंपाक ही दैनंदिन गरज होती; मात्र धुराचा त्रास म्हणून शहरात गॅस आणि मायक्रोव्हेव्ह आले. आज मात्र त्याच 'स्मोकी फ्लेवर'साठी लोक महागड्या हॉटेल्समध्ये गर्दी करत आहेत. दात घासण्यासाठीची राखुंडी आज 'चारकोल टूथपेस्ट' म्हणून आणि जुनी तेलमालीस 'स्पा थेरपी' म्हणून ब्रँडेड झाली आहे.
खाद्यपदार्थांच्या बाबतीतही हेच घडले. गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बाजारात झटपट मिळणारे नानाविध मोदक उपलब्ध झाले. परंतु, या सगळ्यात ताज्या नारळाचे आणि गुळाचे सारण, तांदळाच्या पिठाची सुबक कळी आणि त्यावर साजूक तुपाची धार असणाऱ्या 'उकडीच्या मोदका'चे महत्त्व तसूभरही कमी झाले नाही.
ग्रामीण भागात गणेशोत्सव आणि चुलीवरची उकड यांचे एक अतुट नाते आहे. गावाकडच्या मोठ्या एकत्र कुटुंबांमध्ये गणेशचतुर्थीच्या दिवशी चुलीवर आंधण ठेवून मोदक उकडण्याची पद्धत आजही कायम आहे. बांबूच्या किंवा आंबा-काजूच्या सुक्या फांद्यांच्या मंद आचेवर, हळदीच्या किंवा केळीच्या पानावर ठेवलेले मोदक जेव्हा उकडले जातात, तेव्हा मिळणारा सुवास आणि स्वाद कोणत्याही आधुनिक स्टीमरमध्ये मिळणे शक्य नाही.
गावाकडे मोदकाच्या कळ्या पाडण्यापासून ते चुलीची आच सांभाळण्यापर्यंत घरातील सर्व स्त्रिया एकत्र येतात. हा केवळ स्वयंपाक नसून कौटुंबिक जिव्हाळ्याचा उत्सव असतो. तेलकट किंवा प्रक्रिया केलेल्या आधुनिक मोदकांच्या तुलनेत वाफेवर शिजवलेला उकडीचा मोदक पचायला हलका आणि आरोग्यासाठी अत्यंत उत्तम मानला जातो.
शहरी भागात वेळ अभावी लोक रेडीमेड मोदकांकडे वळत असले, तरी बाप्पाला महानैवेद्य दाखवताना खरी पसंती उकडीच्या मोदकालाच दिली जाते. आजचे व्यावसायिक मेस आणि हॉटेल्सही याच पारंपरिक उकडीच्या मोदकांचे 'होम डिलिव्हरी' बुकिंग महिनाभर आधीपासून घेतात, यावरूनच या मोदकाची क्रेझ स्पष्ट होते. हजारो स्थित्यंतरे आली आणि गेली, तरीही ग्रामीण संस्कृतीचा गाभा असलेला आणि गणेशोत्सवाचा प्राण असलेला 'उकडीचा मोदक' आपला स्वाद, सुगंध आणि स्थान आजही अबाधित राखून आहे.
स्वप्नील परब
मुख्य उपसंपादक, दै. कोकणसाद














