LIVE UPDATES

असलदेत वटवृक्ष कोसळून तरूण जागीच ठार

दुचाकीवर कोसळला वटवृक्ष ; सहप्रवासी जखमी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 15, 2026 16:18 PM
views 222  views
#kokansadlive#news update#konkan update#death

कणकवली : तालुक्‍यातील असलदे येथे चालत्‍या दुचाकीवर वटवृक्ष कोसळला. यात प्रतीक प्रकाश वाळके (वय २८, रा.असलदे मधलीवाडी) हा जागीच ठार झाला. तर दुचाकीवरील अन्य एक जण जखमी झाला असून त्‍याला उपचारासाठी कणकवलीत आणण्यात आले आहे. दुपारी दोन च्या सुमारास ही घटना घडली.

प्रतीक आणि त्‍याचा मित्र दुचाकीवरून नांदगाव ते असलदे मधलीवाडी येथे दुचाकीवरून जात होते. यात दुपारी दोनच्या सुमारास जुनाट वटवृक्ष त्‍यांच्यावर कोसळला. यात प्रतीक जागीच ठार झाला. तर त्‍याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे.

 स्थानिकांनी तातडीने धाव घेऊन तसेच वटवृक्षाच्या फांद्या तोडून दोघांना बाहेर काढले. यातील जखमीला कणकवलीतील खासगी रूग्‍णालयात दाखल करण्यात आला आहे. वटवृक्ष जुनाट होता तोच आज कोसळला. यामुळे नांदगाव देवगड मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गाच्या क्राँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे.

 त्‍यामुळे अन्य वृक्ष तोड करताना हा जुना झालेला वटवृक्ष तोडावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. मात्र ठेकेदार कंपनीने हा वटवृक्ष तोडण्यास दिरंगाई केली. त्‍यामुळे एका तरूणाचा नाहक बळी गेल्‍याचाही आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला.