पर्यावरणाचे रक्षक अनंतात विलीन

Edited by: विनायक गांवस
Published on: January 08, 2026 15:06 PM
views 172  views

आज अतिशय धक्कादायक आणि वेदनादायक दु:खद बातमी ऐकायला आली. जागतिक स्तरावर आणि आपल्या देशातही ग्लोबल वाॅर्मीगची गंभीर समस्या निर्माण झाल्याने या पृथ्वीतलावर जीवसृष्टी श्वास घेण्यासाठी धडपडत आहे. अशावेळेस ज्यानी आपले सारे आयुष्य याच चळवळीसाठी वेचले ते जेष्ठ व श्रेष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आदरणीय डॉक्टर माधवराव गाडगीळ यांच्या निधनाची दु:खद बातमी सह्याद्री वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यां वैशालीताई पाटील यांच्याकडून समजली.

कोकणातील प्रकल्पांचा पर्यावरणावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी ऑक्टोबर २०१० मध्ये गाडगीळ सरांचा तीन दिवसाचा दौरा आयोजित केलेला होता. या तीनही दिवसांच्या दौऱ्यात गाडगीळ सर आणि त्यांच्या पुणे येथील टीम सोबत या जिल्ह्यातील जी काही मोजकीच पर्यावरणप्रेमी मंडळी होती. त्यात स्व.गोपाळराव दुखंडे, माजी केंद्रीय मंञी सुरेश प्रभू, वैशाली पाटील, सौ.गोडबोले, सुरेश गवस, अभिलाश देसाई, ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत, ओंकार तुळसुलकर, संदीप सावंत, डॉक्टर जयेंद्र परुळेकर, प्रवीण नाडकर्णी अशी मंडळी उपस्थित होती. सरांनी या तीन दिवसांत कळणे मायनिंगचा परिसर,असनिये, केसरी, दाणोली, डोंगरपाल, रेडी अशा गावात जावून तेथील ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा करून, त्यांच्या समस्या ऐकून वास्तव अहवाल तयार केला होता. या तीन दिवसांत गाडगीळ सरांचा दुर्मिळ सहवास लाभला हे माझे भाग्यचं होते.

मला आठवत, संस्थानकालीन गुरुत्वाकर्षणावर चालणारी आणि सावंतवाडी शहराला पाणी पुरवठा करणारी संस्थानकालीन नळयोजना केसरी फणसवडे याठिकाणी एका स्थानिक लोकप्रतिनिधींने या भागात एक प्रकल्प आणण्याचा घाट घातला होता. त्या ठिकाणी पहाणी करत असताना आमचे म्हणणे सरांनी ऐकून घेतले. याबाबत मी जे त्याना सविस्तर निवेदन दिलेले होते त्या संदर्भात एकदा सरांना मी फोन केला तेव्हा सरांनी मला सांगितले, "तुम्ही मांडलेला विषय अतिशय महत्त्वाचा असून मी प्रत्यक्ष पहाणी केली असल्याने माझ्या अहवाल ही गोष्ट  मी अधोरेखित केलेली आहे" देशातील एवढे थोर शास्त्रज्ञ माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या निवेदनाची दखल घेतात यावरून हे अधोरेखित होते की सर पर्यावरणाच्या बाबतीत किती गंभीर व संवेदनशील होते.

कळणे मायनिंगमुळे भकास झालेला डोंगर पाहून सर हळहळले. यावेळी मुद्दामहून उपस्थित असलेले माजी केंद्रीय मंञी मा.गाडगीळ सरांना आवाहन करताना म्हणाले होते," पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चीन युद्धाच्यावेळी हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्रीला हाक दिली होती तशीच हाक या सह्याद्रीच्या रक्षणासाठी या जिल्ह्यातील तमाम पर्यावरणप्रेमी आपणास देत असून या जिल्ह्यातील देवराई, पाणवठे, नदी-नाले, वन्यजीव, कोकणी मेवा आणि नैसर्गिक वनसंपदा जपली पाहिजे याचा विचार आपल्या अहवालात व्हावा अशी आग्रहाची मागणी प्रभूसाहेबांनी केलेली होती.

इकोसेस्निटीव्ह बाबत गैरसमज पसरला गेला आणि आदरणीय गाडगीळ सरांनी जो या सह्याद्रीच्या निसर्ग संपत्तीचे रक्षण करण्यासाठी अभ्यासपूर्ण अहवाल सादर केला होता जो भूमाफिया, आणि राजकीय नेत्यांसाठी अडचणीचा होता त्यावर पुनर्विचार करण्यासाठी कस्तूरीरंगन समिती नेमली आणि पुढचे सगळे महाभारत घडले. देवभूमी केरळमधला महाभयंकर पुर असेल किंवा माळीण गाव जे गाडले गेले ती दुर्दैवी घटना असेल याबाबत गाडगीळ सरांनी वेळोवेळी आपल्या परीने मुर्दाड शासनाला व राजकीय नेत्यांना सजग करण्याचा प्रयत्न केला.

देश एका अभ्यासू पर्यावरण तज्ज्ञाला मुकला. पर्यावरणाचा अतिरेकी विनाश पहाता सरांच्या मार्गदर्शनाची यापुढील काळातही नितांत गरज होती. आपले सारे आयुष्य ज्या चळवळीसाठी वेचले ती चळवळ यापुढील काळातही जीवंत ठेवणे हिच खरी आदरणीय सरानां श्रद्धांजली ठरेल. सरांच्या पहाणी दौऱ्यातील ते ऑक्टोंबर २०१० मधील तीन दिवस  माझ्यासाठी मंतरलेले होते. आदरणीय सरांना भावपूर्ण आदरांजली.


अँड. नकुल पार्सेकर

सामजिक कार्यकर्ते