
सावंतवाडी : येथील बाहेरचावाडा परिसरात भटक्या कुत्र्यांच्या उच्छादामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. घराबाहेर खेळत असलेल्या एका चार वर्षीय बालकावर या कुत्र्याने भीषण हल्ला चढवत थेट त्याच्या मानेचा चावा घेतला. मात्र, परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या समीरा खलील यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कुत्र्याच्या तावडीतून मुलाला सोडवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
बाहेरचावाडा येथे हा बालक आपल्या घराबाहेर खेळत होता. यावेळी एका भटक्या कुत्र्याने अचानक त्याच्यावर झडप घातली आणि मानेचा चावा घेतला. बालक वेदनेने आरडाओरडा करू लागताच सामाजिक कार्यकर्त्यां समीरा खलील यांनी तातडीने धाव घेतली. त्यांनी अत्यंत धैर्याने त्या कुत्र्याच्या तोंडातून मुलाची सुटका केली. हल्ल्यात मुलाच्या मानेला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून समीरा खलील यांनी क्षणाचाही विलंब न लावता मुलाला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या त्या बालकावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
सकाळपासून याच परिसरातील अन्य सहा जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व जखमी उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने नागरिक जखमी झाल्याने शहरात भटक्या कुत्र्यांच्या दहशतीचे वातावरण आहे. या घटनेनंतर 'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान'चे रवी जाधव आणि समीरा खलील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून निष्पाप बालकांचे जीव धोक्यात येत आहेत. शासनाने आणि नगरपालिकेने या भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. रुग्णालयात उपचार सुरू असताना रवी जाधव आणि समीरा खलील यांनी मुलाच्या कुटुंबाला सर्वतोपरी सहकार्य केले.










