मालवणी कवितांचो 'दादा'माणूस..! | 'जागर' कोकणच्या साहित्य रत्नांचा..!

Edited by: विनायक गावस
Published on: November 26, 2023 14:34 PM
views 676  views

कोकणचं पहिलं दैनिक कोकणसाद व कोकणचं नं. 1 महाचॅनल कोकणसाद LIVE च्या माध्यमातून 'जागर' कोकणच्या साहित्य रत्नांचा' हे विशेष सुरू आहे. याच सदराच्या पाचव्या पुष्पात 'चांन्याची फुला', 'आबोलेचो वळेसार', 'कोकण हिरवेगार' असे मालवणी काव्यसंग्रह लिहिणारे सुप्रसिद्ध मालवणी कवी गोविंद उर्फ दादा मडकईकर यांची खास मुलाखत आपल्या समोर घेऊन येत आहोत. त्यांनी आपल्या खास शैलीनं रसिकांच्या हृदयात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कोकणातली लोकसंस्कृती, सणवार, परंपरा, लोककला आणि इथला निसर्ग त्यांनी आपल्या काव्यातून उलगडला आहे. दैनिक कोकणसादचे संपादक संदीप देसाई व प्रतिनिधी विनायक गांवस यांनी घेतलेली ही खास मुलाखत.

दादा मडकईकर, मुलाखत

१.तुमचं बालपण शिक्षण कोकणात झालं. साहित्याकडे तुम्ही कसे वळला ?

माझं बालपण खुप कष्टाचं गेलं. वयाच्या चौदाव्या वर्षी वडिलांचं  निधन झालं. आम्ही सहा भावंडं त्यामुळे शाळा सोडावी लागली. नंतर काहीकाळ भुसारी दुकानात काम केलं. त्यानंतर बॅंकेत शिपाई म्हणून काम मिळालं. त्यावेळी फावला वेळ मिळायला लागला. आरपीडी शाळेत कविवर्य डॉ. वसंत सावंत यांच्यामाध्यमातून कोजागिरी कवी संमेलन भरवलं जायचं. त्यात मी सहभाग घ्यायला लागलो. मराठी कविता मी सुरुवातीला लिहीत होतो. मालवणी कविता खुप कमीजण लिहीत. सावंतवाडीचे तात्या भांगले मालवणी कविता लिहीत. पण त्याची कुठे प्रसिद्धी करत नसत. त्यांनी एकदा मला बोलावून मालवणी कविता ऐकवली. त्यानंतर मालवणीतली गंमत उमगली अन् 'खोल खोल दरीत गो चांन्याची फुला' ही पहिली मालवणी कवीता लिहीली‌. आंबोलीच वर्णन त्यात  केलं. ही कविता मी एका संमेलनात म्हंटली पण, त्या कवितेला कुणी विचारलं सुद्धा नाही. नंतर एका संमेलनात गोव्याच्या एका संपादकांनी या कवितेला पहिला नंबर दिला. रत्नागिरी येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन भरलं तेव्हा तीन हजार कविता मागवल्या होत्या. त्यातून पन्नास कवित्या काढल्या, त्यातील पाच कवितेत माझा नंबर आला. वीस हजार लोकांसमोर चांन्याची फुला ही कविता मी म्हंटली. त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दादा मडकईकर हे नाव पुढे आलं अन् माझी कविता गाजली. मात्र, दादा मडकईकर यापेक्षा मालवणीचा प्रचार आणि प्रसार हे धेय्य मी ठेवलं. जिथं बोलवलं जायच तिथं कसलीही अपेक्षा न ठेवता मालवणी कवितांचे कार्यक्रम केले. आज अनेक लोक मालवणीतून लिहू लागले याचा अभिमान वाटतो. मालवणी बीज रूजतय याचा आनंद आहे. प्रवाहासोबत राहिलो त्यामुळेच मी टीकू शकलो. अनेक लोकांनी मला पाठिंबा दिला, मदत केली त्यामुळेच मी लिहू शकलो. त्यांचे ऋण नेहमीच राहतील.

२. साहित्याकडे वळला असताना मालवणीत लिहीलत. मालवणीतून कविता लिहिल्या. तीन कवितासंग्रह लिहीलेत. हा प्रवास कसा होता ?

माझा हा प्रवास आनंददायी होता. समाजात वावरत असताना विषय मिळत गेले. मालवणी शब्दांतून वाक्य रचू लागली. इथल्या निसर्गाने मला लिहिते केलं. पदभ्रमणाची व सहलींची आवड असल्यामुळे जवळजवळ संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची मी फिरती केल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून माझ्या कवितेमध्ये इथला निसर्ग प्रामुख्याने सतत डोकावत असतो. इथली ऊन-सावली, वारा, पाऊस, डोंगर-दऱ्या, धुके-चांदणे, पशुपक्षी, फळे-फुले, नदी- नाले, इथल्या माणसांचे जीवनमान, इथला निळाशार सागर, या गोष्टींबरोबर इथल्या निसर्गातील संगीत सतत माझ्या तनामनात वाजत असते. त्यामुळे माझ्या छंदोबद्ध कवितांना मी संगीत न शिकताही हे संगीत गुणगुणताना माझ्या नकळत माझ्या कवितांना चाली लावल्या जातात. ही एक देवाची देणगीच आहे असे मी मानतो. माझ्या मागील तीनं काव्यसंग्रहांना चांगला प्रतिसाद मिळाला. आता चौथ पुस्तक प्रकाशित करायचा मानस आहे. लवकरच ते भेटीला येईल. मी गाणं शिकलो नाही पण अनुभवातून शिकत गेलो.

३. चांन्याची फुला, आबोलेचो वळेसार, कोकण हिरवेगार हे प्रकाशित झालेत. ही निसर्गाची नाव काव्यसंग्रहास देण्यामागची संकल्पना काय ? त्याला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला ? याबद्दल काय सांगाल

कोकणाचा आमचा एक ब्रॅण्ड आहे. आता माझं येणार पुस्तक आहे त्याच नाव 'सुरंगीचो वळेसार' असं आहे. आकर्षक नाव देता आली असती पण माझ्या निसर्गानं जे दिलं त्याच नाव पुस्तकाला द्याव असा मानस होता. या पुस्तकात तुम्हाला ४० कविता आणि ४०० अस्सल मालवणी म्हणी वाचता येणार आहेत. सिंधुबोली या माझ्या पुस्तकातही मालवणीतील काही दुर्मिळ शब्द संग्रह आहेत. 'अ' पासून 'ज्ञ' पर्यंतचे मालवणी बोली भाषेतील शब्द यात आहे‌त. आज शाळा, महाविद्यालयात मला बोलावलं जातं. त्यामुळे मालवणीचा प्रचार आणि प्रसार हा उद्देश साध्य होत आहे. लहान मुलं नवी, पिढी मालवणी लिहू लागली आहे. 

४. काव्यवाचन करणं ही तुमची खास शैली आहे. याचे गोवा, कर्नाटक महाराष्ट्रात तुमचे लाईव्ह शो होतात. मालवणी कवी म्हणून तुम्हाला वेगळं स्थान दिलं जातं. कोकणात ठिक आहे पण गोवा कर्नाटकातही तुम्हाला तेवढाच प्रतिसाद मिळतो त्याच राज काय ?

प्रत्येक भागात मालवणी माणसाचे उंबरे आहेत. बेळगांव सारख्या ठिकाणी सुद्धा मालवणीला मोठा प्रतिसाद मिळतो. गोव्यात साखळी, डिचोली, पेडण्यात आमचा बोली  भाषेचा प्रभाव दिसतो. पुण्यासह मुंबईत भांडूपमध्ये मोठ्या प्रमाणात कोकणी माणसं आहेत जी रसिक आहे. त्यांचा उदंड प्रतिसाद आम्हाला मिळतो. पुर्वी एकांकिका स्पर्धा होत. आता त्या होत नाही. त्यामुळे ही पिढी नरकासुराच्या मागे गेली.‌ या पिढीला आपल्या भाषेचं वैभव दाखवलं पाहिजे. त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे. नव्या पिढीला बोली भाषेत प्रचंड रस आहे, आवड आहे.

५.  कोकणची लोकसंस्कृती, सणवार, परंपरा, लोककला आणि कोकणचा निसर्ग आपल्या काव्यातून प्रतिबिंबित होतो. तुमच्या दृष्टीतला कोंकण कसा विषद कराल ?

मी निसर्गावर भर दिला आहे. मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. मुंबईत असलेला माणूस वर्षातून एकदा का असेना तो कोकणात येतोच. कोकणाशी त्याची नाळ जोडलेली आहे. इथले फणस, आंबे यांच्याशी त्यांच्या आठवणी आहेत. 'हिरवो माझो गाव' या कवितेत मी माझ्या दृष्टीतलं कोकण मांडल आहे‌. त्याला चाल लावली त्यामुळे लोकांना ती आवडत गेली‌.

६. तुमच्या मालवणी कवितांतली तुम्हाला भावलेली कविता कोणती ?

तारिया मामा, जत्रा, माझं गाव, आबोलेचो वळेसार, शिमगो, पयलो पावस, शालग्या आदी कविता कोकणवासियांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. तिन्ही कविता संग्रहात विविध परिस्थितीवर कविता आहेत. मला भावलेली कविता ही 'चांन्याची फुला' हीच आहे. महत्वाच म्हणजे मी कवितांना चाली दिल्या त्यामुळे लोकांच्या मनापर्यंत पोहचता आलं. हिंदी मराठी सिनेमा, शालेय कवितांच्या चाली मालवणी कवितांना दिल्यानं त्या श्रोत्यांना आवडल्या. मी संगीत भरपूर ऐकतो. त्यामुळे मालवणी चाली देखील सुचतात. 

७. तुम्ही मालवणी बोलीतील अनेक शब्दांचा व वाक्यप्रचार म्हणींचा संचय केलाय. ही संकल्पना कशी सुचली ? नव्या पुस्तकांच्या संकल्पा विषयी काय सांगाल ?

जे शब्द कालबाह्य होत आहेत असे शब्द त्यात आहेत. अनेक इंग्रजी शब्द बोलीत आल्यानं अस्सल मालवणी शब्द वापरले जात नाहीत. मी एकट्यानं काहीतरी केलं म्हणून हे बदलणार नाही. मात्र, मालवणी शब्द टिकून रहावे यासाठी तो शब्द संचय केला आहे. मराठीतून त्याच भाषांतर केल आहे. त्यामुळे कुणालाही ते सहज समजू शकतात. 'सांगल्यापेक्षा केल्ला बरा‌..!' या भावनेतून लिहीत राहिलो. केदार रागात मी मालवणी कविता म्हणत असल्यानं त्या अधिक श्रोत्यांना भावतात. मी जे साहित्य लिहीलं त्यात मालवणी शिव्यांचा वापर केला नाही. त्यामुळे सगळ्यांसमोर त्या सादर करता येतात. 

८. मालवणीकडे अनेक युवक कंटेंट क्रिएटर म्हणून वळतायत नव्या पिढीला काय संदेश द्याल ?

मालवणीला बरे दिवस आले आहेत. परंतु आमच्याकडे कलाकारांना व्यासपीठ मिळत नाही. एकांकिका स्पर्धा होत नाहीत. नाटक, एकांकिकांचा सराव करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. या गोष्टी होण आवश्यक आहे. राज्यकर्त्यांनी याकडे थोडं लक्ष द्यावं. युवा शक्तीचा वापर करून घेतला पाहिजे. नव्या पिढीला बोली भाषेत प्रचंड रस आहे. आपला माणूस मुळातच हुशार आहे फक्त त्याला दिशा दिली पाहिजे. येणार चौथं पुस्तक यात नव्या गोष्टी वाचायला मिळणार आहेत. तबलावादक किशोर सावंत आणि हार्मोनियम वादक निलेश मेस्त्रींच्या साथीनं माझ्या कार्यक्रमातून त्या ऐकण्यासाठीही मिळणार आहेत.