दरवर्षी नाताळाचा सण ख्रिस्त जन्माची आठवण सोबत घेऊन येतो. सर्वत्र उत्सवाचे नि जल्लोषाचे वातावरण निर्माण होते. अंधारात चाचपडणार्या, हालअपेष्टांनी गांजलेल्या, भुकेने व्याकूळ झालेल्या, तणावांनी दबलेल्या, भीतीने गांगरलेल्या, दु:खांनी पोळलेल्या, आपत्तींनी खचलेल्या तमाम पामरांसाठी हा सण आशेचा किरण घेऊन येतो. नाताळ येत राहतो नि ख्रिस्ताच्या आठवणींना उजाळा देत राहतो. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ख्रिस्ताने अवघ्या ३३ वर्षांच्या आयुष्यात घडविलेल्या अपूर्व क्रांतीच्या चित्रपटाचा ट्रेलर झळकवित नाताळ आपल्याला भेटत राहतो. संकटावरील विजयाचा जल्लोष होत राहतो.
मानवी मातेच्या पोटी अन् गुरांच्या गोठी जन्मलेल्या ख्रिस्ताने स्वत: दारिद्य्र भोगले अन् त्यातूनच तावून-सुलखावून निघत तो गरीबांचा कैवारी बनला. आपण देवपुत्र असल्याची पूर्वत: जाणीव असून देखील त्याने कधी शेखी मिरवली नाही. जराशा तथाकथित कर्तृत्वाने घमेंडी बनून शेफारून जाणार्यांनी त्यापासून बोध घ्यायला हवा. ख्रिस्त आपल्या मानवी मातापित्यांच्या आज्ञेत राहिला. बापासोबत सुतारकाम करीत वाढला, मात्र पास्काच्या (पास-ओव्हरच्या) सणाला जेरुसालेमला गेलेला लहानगा येशू, तिथल्या मंदिरात पंडितासोबत वादविवाद करण्यात गुंतला असताना, त्याच्या आईवडिलांशी त्याची ताटातूट झाली होती. नाझरेथ गावी परतू लागलेले जोसेफ-मेरी त्याला शोधता मेटाकुटीस आले. ते परत जेरूसालेमला आले, तेव्हा त्यांना पोरगेला येशू बुजूर्ग पारोश्यांशी तात्त्विक चर्चा करताना दिसला. मेरीने त्याला हटकले, बाळा, तू असं का केलंस? तुझे बाबा नि मी किती चिंतेत होतो?’
तेव्हा येशू निर्धाराने म्हणाला होता ‘मी माझ्या पित्याच्या मंदिरात सुखरूप होतो. तुम्ही उगाचच माझा शोध घेत होता. ‘त्या गरीब सुतार-दांपत्याला त्यातला अर्थ कळलाही नव्हता. अर्थात, तो सतत आई-बापाच्या आज्ञेत राहिला. क्रूसावर मरताना देखील तो आईची काळजी करीत होता. खस्ता खाऊन लहानचे मोेठे करणार्या आई-बाबांकडे वृद्धापकाळी बेपर्वाईने बघणार्या आणि वैयक्तिक स्वार्थासाठी भावंडांशी कृतघ्नतपणे वागणार्यांची प्रवृत्ती ख्रिस्त शिकवणीपासून कोसो मैल दूर असते, हे लक्षात घ्यावे. आपण समाजातील दीनदुबळ्या बांधवांचा विचार करीत नसतो तेव्हा ख्रिस्ताची ही शिकवणूक अन् त्याचा आदर्श आपण सोयिस्करपणे विसरलेलो असतो. आपल्या ऐश्वर्याचा बाजार मांडून बडेजाव करणार्या नि आपल्या दानधर्माची जाहिरात करणार्यांनी ‘आपल्या उजव्या हाताने दिलेले दान, डाव्या हाताला कळू नये’ हा ख्रिस्ताचा सल्ला आठवायला हवा.
मेंढपाळाच्या सान्निध्यात जन्मलेल्या येशूने गरीब कोळ्यामधून आपल्या शिष्योत्तमांची निवड केली होती. सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी, तो दीनदुबळ्या आणि लुळ्यापांगळ्यांच्या जनसमूहात वावरला होता. आपल्या दैवी सामर्थ्याने त्याने आंधळ्यांना डोळस केले होते. मुक्यांना बोलते केले होते. पांगळ्यांना चालण्याची शक्ती दिली होती. बहिर्यांना काम दिले होते. आजार्यांना रोगमुक्त केले होते. मनोरूग्णांना मुक्ती मिळवून दिली होती. जेरूसालेममधील भटकंतीत, छोटी-छोटी मुले देवाचे गुणगान करीत, त्याचे स्वागत करीत तेव्हा ख्रिस्त प्रसन्न होत असे. कारण मुले ही परमेश्वराची लाडकी लेकरं आहेत, असे तो लोकांना सांगे, ‘तुम्ही मुलांसारखे वागाल, तरच स्वर्गाची दारे तुमच्यासाठी खुली होतील, ही त्यांची शिकवणूक होती.
राग आपल्याला पापकृत्य करण्यास प्रवृत्त करतो, म्हणून आपण रागाला आवरले पाहिजे, असे ख्रिस्त निग्रहाने सांगत असे. ‘तुम्हाला परमेश्वराशी एकरूप व्हायचं असेल, त्याच्या श्रद्धेची भेट घ्यायची असेल पण त्याचवेळी तुमची कुणाशी रागारागी झाली असेल तर... थांबा! प्रथम त्या व्यक्तीला भेटून सलोखा करा नि मग देवाजवळ जा’ असं त्याचं ठाम म्हणणे होते. ख्रिस्ताने अनुयायांना स्वत: इतकेच शेजार्यावर प्रेम करायला सांगितले. इतकेच नव्हे, तर आपल्या शत्रूवर देखील प्रेम करायला शिकविले. जखमांनी घायाळ होऊन वेदनांनी तळमळत, क्रूसावर मरण पत्कारीत असताना, त्याने आपल्या मारेकर्यांना क्षमा केली होती. ‘हे बापा, तू त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात याची त्यांना जाणीव नाही.’ ख्रिस्त मानवी रूपात होता आणि त्यालाही मृत्यू यातना असह्य झाल्या होत्या. आपल्या हा दु:खाचा प्याला परमेश्वर पित्याने दूर, सारावा, असं त्यालाही वाटले होते, पण पित्याची इच्छा होती, ती त्याने शिरसावंद्य मानली व तो दु:खाचा प्याला रिचविला. मानवाला दु:खापासून मुक्त करण्यासाठी अखिल मानवतेचे दु:ख त्याने पचविले होते. भगवान शंकराने पचविले होते, तसेच!
उलट जीवनात आपण जराजराशा गोष्टींनी चिडत असतो. बाजूच्या सहप्रवाशाचा राग येईल अशा घटना क्षणाक्षणाला झिम्म भरलेल्या लोकलगाडीत घडत असतात. संकुचित वृत्तीची मंडळी घातपात करून निष्पाप जीवांचे बळी घेत असतात. अशा वेळी ख्रिस्ती शिकवणूक आठवायला हवी. ख्रिस्त शिकवणूकीतून तावून-सुलाखून निघालेले दिवंगत परमाचार्य पोप दुसरे जॉन पॉल किंवा ऑस्ट्रेलियन मिशनरी श्रीमती स्टेन्स यांच्यासारख्या विभूती आपल्या वैर्याला क्षमा करू शकतात.
शांती हीच सर्वांत मोठी संपत्ती आहे, हे ख्रिस्त आपल्या शिकवणुकीतून सांगत आला. शांतीनिर्मितीसाठी असीम त्यागाची गरज असते. परंतु आपण तर सुखासन्नता, मोहमायांना आणि चंगळींना इतके सोकावलेलो असतो की आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेतो. खर्याखुर्या नितळ सौख्याला पारखे होत राहतो. जीवन जगताना बहुसंख्यजण साधा, सोपा मार्ग स्वीकारतात आणि अवघड जागी जाऊन पोहचतात. उलट काट्याकुट्यांच्या मार्गावर वाटचाल करणारेच मोजकेच असतात. आपल्या पित्याच्या मंदिरात बाजार मांडणार्यांची ख्रिस्ताने एकदा भंबेरी उडविली होती. लोकांना प्रवचने देऊन बोधामृत पाजताना, स्वत:च्या फायद्यासाठी भक्तांना वेठीस धरणार्या धर्ममार्तंडांची, ख्रिस्त पुन्हा अवतरला तर चांगली हजेरी घेईल याबद्दल शंकाच नाही. ख्रिस्तावर कथा-कविता लिहिणारे स्वत:च्या वैयक्तिक हितासाठी कृतघ्नतेने वागतात. तेव्हा ते त्या देवपुत्राचा पराभव करीत असतात. ख्रिस्त मैत्रीला खूप महत्त्व देत असे. तुम्ही सगळ्यांनी एकमेकांशी जिवाभावाने, निर्व्याज प्रेमाने वागा!’ असे तो सांगत असे. आपण मात्र नाताळ नि इस्टरचे सण साजरे करण्यासाठी जागे राहतो, पण जगताना ख्रिस्तानुभव घेण्यास जागृत नसतो.
ख्रिस्ताचे स्त्री-दाक्षिण्य विलक्षण होते. स्त्रीच्या डोळ्यांतील अश्रू त्याला विरघळून टाकीत. म्हणून तर काना येथील लग्नात त्याने आपल्या आईचा आदेश पाळला आणि पाण्याचा द्राक्षरस तयार करून यजमानाची इज्जत राखतो. एका बदफैली स्त्रीला दगडाने ठेचून मारणार्या समूहाला त्याने आवाहन केले, तुमच्यापैकी आजपर्यंत कुणी पाप केले नसेल, त्याने पहिला दगड मारावा, ‘अन् ती त्वेषाने आसुसलेली गर्दी हळूच पांगली होती.
माग्दालेना नावाच्या त्या वारागंनेने ख्रिस्ताचे पाय श्रद्धेने धुतले नि पवित्र झाली. संत बनली. नाईमच्या विधवा बाईचा एकुलता एक मुलगा मरण पावला तेव्हा तिच्या शोकाने व्याकूळ झालेल्या ख्रिस्ताने त्यास जीवनाचे वरदान बहाल केले. ज्यू असून देखील सेमेरिटन बाईकडून तो पाणी प्याला आणि तिला त्याने जीवनाचे बोधामृत पाजले. आपला शिष्योत्तम पीटरची सासू तापाने ग्लानी येऊन बिछान्यावर तळमळत होती, तेव्हा ख्रिताने नुसत्या स्पर्शाने तिला बरे केले होते. आपला भाऊ लाजारस मरण पावल्याने शोकाकूल झालेल्या मेरी आणि माग्दालेना या बहिणींचा आक्रोश न साहवून त्याने लाजारसला मरणातून उठविले होते. कालवारीच्या असह्य आणि जीवघेण्या प्रवासात जड कु्रसाचे ओझे धडपडत वाहत असताना, त्याचा घामाने भरलेला चेहरा वेरोणिकाने पुसला तेव्हा तिच्या भक्तीची पावती म्हणून तिच्या रूमालावर त्याने आपला चेहरा उमटविला होता. कालवरीच्या रस्त्यावरून त्या अखेरच्या प्रवासात शोक करणार्या जेरुसालेमच्या स्त्रियांना तो म्हणाला होता, ‘जेरुसालेमच्या कन्यांनो, तुम्ही माझ्यासाठी शोक करू नका. आपल्या मुला-बाळांसाठी शोक करा.
क्रूसावर लटकलेल्या अवस्थेत दु:खाग्नीने पोळलेला असून देखील तो आपल्या शिष्यांना विनंती करीत होता. ‘तुम्ही माझ्या आईला घरी घेऊन जा. तिची काळजी घ्या. ‘ख्रिस्त करुणामूर्ती होता अन् म्हणूनच तो गांधीजी, साने गुरूजी, मदर तेरेसा यासारख्या विभूतींना भावला होता. कारूण्य, लीनता, प्रेम या त्रिसूत्रीत तो देवपुत्र मानवी जीवन जगला. त्याच्या शिकवणुकीची जपणूक करणे हेच तर त्याच्या सच्चा अनुयायाचे कर्तव्य ठरते.
ख्रिस्ताचे सारे जीवन माणसाला मुक्तीचा मार्ग दाखविणारे होते. युगानुयुगे त्या शिकवणुकीचा दीपस्तंभ मानवतेला मार्गदर्शन करील ही आशा करू या, आजच्या एकामागून एक कोसळणार्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात, घातपाताच्या घेर्यात, पद्धतशीर पिळवणुकीच्या जाळ्यात सापडलेल्या, भीतीने गांगरलेल्या आणि संकटांनी ग्रासलेल्या सर्वसामान्य माणसाला त्याची शिकवणूक खूप मोठा आधार आहे.