गतवर्षी २०२२ मध्ये अनेक राजकीय घटना घडलेल्या आहेत. याचा आढावा घेत असताना जून २०२२ मध्ये राजकीय स्थित्यंतरे झाली खरी त्याचे पडसाद उमटले ते जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या विधान परिषदेच्या जागेवरूनच. भाजपने कोल्हापूरची जागा जिंकली आणि खरे इथूनच या सरकारला गच्छंती लागली. मुन्ना महाडिक यांची जागा भाजपने महाविकास आघाडीच्या अतिरिक्त मतांच्या जोरावर जिंकली आणि ही खासदारकी जिंकल्यानंतर किंगमेकर ठरले ते देवेंद्र फडणवीस. आणि यानंतर मागे वळून पाहिले नाही. तब्बल सहावा उमेदवार प्रसाद लाड यांच्या रूपाने त्यांनी उभा केला आणि त्याचा मोठा फटका बसला तो काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पराभूत झाले आणि प्रसाद लाड यांनी विधान परिषदेची जागा जिंकली. यावेळी फडणवीस किंगमेकर ठरले. येथेच फडणवीस यांनी सुरुंग लावत हे सरकार अस्थिर असल्याचा दावा केला. यानंतर फडणवीस हे गप्प बसतील ते भाजपचे लीडर कसले. त्यांनी थेट सरकार पोखराला सुरुवात केले होते. महानाट्याचा पहिला अंक सुरू झाला तो म्हणजे एकनाथ शिंदे जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्या आमदारांना घेऊन थेट गुवाहाटीला गेले. यानंतर संपूर्ण देशभरातून एकच चर्चा सुरू झाली की, फडणवीस मुख्यमंत्री होणार आणि ठाकरे सरकार पडणार. म्हणता म्हणता आमदारांची संख्या ५० वर जाऊन ठेपली. उद्धव ठाकरेंनी २९ जूनला राजीनामा दिला, याच्या दुसऱ्या दिवशी ३० जूनला राज्यपालांना भेटत एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. यानंतर सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. गेल्या सहा महिन्यांत अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली.
सिंधुदुर्गचे माजी पालकमंत्री आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांना प्रवक्ते पदासह शिक्षण मंत्रीपद एकनाथ शिंदेंनी दिले, तर उदय सामंत यांच्या गळ्यात उद्योगमंत्र्यांची माळ घातली देवेंद्र फडणवीस यांनी. त्यांचे जवळचे शिलेदार रवींद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले. यानंतर काही दिवसातच रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची माळ पडली. रवींद्र चव्हाण यांनी पनवेल टू बांदापर्यंत मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी दौरा केला आणि डिसेंबर २०२३ पर्यंत हा महामार्ग पूर्ण होईल याची घोषणा केली.
या आधी जानेवारीच्या सुरुवातीला जिल्हा बँकेची निवडणूक फार गाजली होती. या निवडणुकीत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आपल्या नेतृत्वाखाली ही निवडणूक जिंकली आणि आपले कट्टर समर्थक असलेले मनीष दळवी यांना चेअरमन तर अतुल काळसेकर यांना व्हाईस चेअरमन केले. महाविकास आघाडीच्या हातातून जिल्हा बँक गेली. सतीश सावंत यांचा पराभव महाविकास आघाडीला चटका लावून गेला.
दीपक केसरकर यांना कोल्हापूर व मुंबईचे पालकमंत्री पद मिळाले. तर उदय सामंत यांना रायगड व रत्नागिरीचे पालकमंत्री पद मिळाले. १९ जानेवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, कुडाळ, वैभववाडी आणि देवगड या चार नगरपंचायतींच्या निवडणुका होऊन निकाल लागले. यामध्ये देवगड नगरपंचायत नितेश राणेंच्या हातातून सुटून महाविकास आघाडीकडे गेली. संदेश पारकर यांनी या विजयाचा जोरदार जल्लोष देवगडमध्ये केला, तर वैभववाडी जिंकत नितेश राणे किंगमेकर ठरले. दोडामार्गमध्ये भाजपने विरोधकांचा धुव्वा उडवला आणि ही नगरपंचायत ताब्यात घेतली. मात्र, कुडाळ नगरपंचायतीत काँग्रेस किंगमेकर ठरली आणि महाविकास आघाडीने ही नगरपंचायत भाजपच्या हातातून ताब्यात घेतली. यानंतर वेध लागले ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भाजपने तब्बल १८४ ग्रामपंचायती जिंकल्या. शिवसेनेला ७८ ग्रामपंचायतींवर समाधान मानावे लागले. शिंदे गटाकडे २७ ग्रामपंचायती गेल्या, तर उर्वरित ग्रामपंचायती गाव विकास पॅनेलकडे गेल्या. राष्ट्रवादीने एका ठिकाणी बाजी मारली तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. याचा परिणाम म्हणून कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात माजी खासदार निलेश राणेंनी यावेळी जोरदार मुसंडी मारली.
कणकवली, देवगड, वैभववाडीमध्ये नितेश राणे पुन्हा एकदा किंगमेकर ठरले, तर सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्लामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत शिवसेनेला धोबीपछाड दिला. राजकीय वर्ष अत्यंत नाट्यमय स्थितीमध्ये गेले असून भाजप जिल्ह्यात नंबर वन ठरला आहे. तर शिंदे गटाची राजकीय ताकद ही भाजपबरोबर गेल्याने भाजप आणि शिंदे गट हे जिल्ह्यात मजबूत झाले आहेत, तर शिवसेना महाविकास आघाडी यांचे अधःपतन झालेले पाहायला मिळत आहे.
- भरत केसरकर