LIVE UPDATES

११ वर्षांनंतरही रखडले सावंतवाडी रेल्वे टर्मिनस

• देवेंद्र फडणवीस, सुरेश प्रभूंनी केलेलं भूमीपूजन ; सरकारच अपयश ? • जबाबदार कोण ? ; कोकणवासीयांची तीव्र नाराजी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 27, 2026 16:03 PM
views 79  views

सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या भूमीपूजनाला आज २७ जून रोजी तब्बल ११ वर्षे पूर्ण झालीत. राज्याचे तत्कालीन अन् विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पहिली कुदळ इथे मारली.‌ तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंच्या उपस्थित हा जंगी सोहळा देखील झाला. मात्र, अद्यापही या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आलेलं नाही. नुकतच याला 'लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस' नाव देण्याची मंजूरी मंत्रिमंडळाने दिली. मात्र, हे फक्त नावापुरत टर्मिनस राहिल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोकण रेल्वेचे प्रवासी, प्रवासी संघटनांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

२७ जून २०१५ रोजी मोठ्या उत्साहात या टर्मिनसचे भूमीपूजन करण्यात आले होते. पुढील वर्षात याला एक तप होण्याची वेळ आली, तरीही हे टर्मिनस काही पूर्ण झालेलं दिसतं नाही. यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने अनेक आंदोलने केली, उपोषण केली. मुंबईसह दिल्लीतील बहुतांश लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधले‌. याप्रश्नी कोकणातील काही नेते सभागृहात गळे काढून रडले. मात्र, केवळ आश्वासनांचे गाजर कोकणवासीयांना दाखवलं गेल. आज कोकण रेल्वे मार्गावरील वाढती प्रवासी संख्या, विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता हे टर्मिनस पूर्ण होण आवश्यक आहे. ते कार्यान्वित झाल्यास कोकणासाठीच्या विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन अधिक प्रभावी होऊन प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा झाला असता. मात्र, फेज वनच्या कामानंतर फेज टूसाठीचा मुहूर्त नेत्यांना मिळाला नाही की कोकण रेल्वेला ? हा प्रश्न अनुत्तरित आहे. 

यात नुकताच सावंतवाडी रेल्वे स्थानकास 'लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस' असे नाव देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला असून त्यास अंतिम मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, हे फक्त नावापुरती टर्मिनसच ठरू नये अशीच अपेक्षा लोकांची आहे. येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणासाठी अधिक विशेष रेल्वे गाड्या उपलब्ध करून देण्याबरोबरच त्या गाड्यांसाठी सावंतवाडीत हक्काचे टर्मिनस उभारण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. केवळ आश्वासनांवर न थांबता प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून सावंतवाडी रेल्वे टर्मिनस लवकरात लवकर कार्यान्वित करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे विकासाचे केवळ ढोल बडवत न बसता या मातीत ११ वर्षांपूर्वी मारलेल्या कुदळीची जाणीव ठेवून हा प्रकल्प देखील पूर्णत्वास आणला पाहिजे. अन्यथा, घोषणा करायला कुणाच्या बापाचं काय जातं ? असं म्हणणाऱ्या नेत्यांनी हा प्रकल्प देखील मतांवर डोळा ठेवून केलेला एव्हेंट असल्याचे एकदाचे जाहीर करून टाकावे.

-विनायक गांवस

चीफ रिपोर्टर