
रत्नागिरी : मुंबई-गोवा आणि मिऱ्या-नागपूर या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या संगमावर वसलेल्या पाली बाजारपेठेतील बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. यामुळे पाली परिसरातील नागरिकांसह महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना तीव्र वाहतूककोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात पाली बाजारपेठेतील स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे विस्थापन होऊ नये, या उद्देशाने हा उड्डाणपूल मंजूर करण्यात आला होता. २०१७ मध्ये राष्ट्रीय महामार्ग विभागाने सुरवातीला ३५० मीटर लांबीचा आणि १७ खांबांचा पूल मंजूर केला होता; मात्र, २०२४ मध्ये या रचनेत बदल करण्यात आला. नव्या आराखड्यानुसार प्रत्येकी १० मीटर अंतरावर आणखी १७ खांब वाढवून एकूण ३४ ते ३५ खांबांचा हा पूल तयार करण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा उड्डाणपूल अखेर पूर्णत्वास येत असल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पुलावरील काँक्रिटीकरण आणि डांबरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, आता केवळ काही मीटर अंतराचे बाजूचे काँक्रिट रेलिंगचे काम बाकी आहे. हे काम आगामी आठवडाभरात पूर्ण होईल, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच पाली उड्डाणपूल वाहतुकीसाठी रितसर खुला केला जाऊ शकतो.
हा उड्डाणपूल चौपदरी केल्यामुळे त्याची रूंदी तब्बल ३५ मीटर झाली आहे; परंतु, येथील भूसंपादन केवळ ४५ मीटर रूंदीचे असल्याने पुलाच्या दोन्ही बाजूंना अवघे साडेपाच मीटर रूंदीचेच सेवारस्ते (सर्व्हिस रोड) उरले आहेत. याच अरूंद सेवारस्त्यावरून मिऱ्या-नागपूर हा दुसरा राष्ट्रीय महामार्ग जाणार असल्याने, भविष्यात येथे रहदारीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.










