
दोडामार्ग : पिकुळे येथील मधलीवाडी परिसरात शेतातील विहिरीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. मेघशाम विलास गवस असे मयत युवकाचे नाव आहे. पिकुळे (मधलीवाडी) येथील मेघशाम गवस हा युवक गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बेपत्ता झाला होता. शुक्रवारी सकाळच्या सुमारास एक व्यक्ती शेतात गेली असता तिला दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे त्यांनी इतरत्र शोध घेतला असता शेतातील विहिरीच्या पाण्यात तो बुडालेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती आशिष उमेश गवस (३८, पिकुळे- मधलीवाडी) यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहे.












