कवींच्या नजरेतील 'स्त्री प्रतिमा' जगणाऱ्या 'प्रमिता' !

जागर कोकणच्या साहित्य रत्नांचा..!
Edited by: संदीप देसाई
Published on: December 30, 2023 16:30 PM
views 90  views

कोकणचं पहिलं दैनिक कोकणसाद व कोकणचं नं. 1 महाचॅनल कोकणसाद LIVE च्या माध्यमातून 'जागर' कोकणच्या साहित्य रत्नांचा', हे विशेष अभियान हाती घेण्यात आलं आहे. या अभियान अंतर्गत जिल्ह्यातील अस्सल साहित्य रत्नांचा शोध घेत टीम कोकणसाद कोकणात साहित्य चळवळीला अधिक वृंधिगत करत आहे. याच विशेष अभियानाच्या १० व्या पुष्पात कणकवली ओसरगावच्या प्राथमिक शिक्षिका, कवयित्री व समीक्षा लेखिका प्रमिता तांबे यांची खास मुलाखत आपल्या समोर घेऊन येत आहोत. नवोदित असूनही साहित्य क्षेत्रात त्यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. इथली शिक्षकी परंपरा, कोकणचा निसर्ग, तळकोकणातील कवींच्या कवितेतील स्त्री प्रतिमा' हा विषय पीएचडीकरिता त्यांनी निवडला आहे. दैनिक कोकणसादचे संपादक संदीप देसाई यांनी त्यांची घेतलेली ही विशेष मुलाखत. 


तुमच्या लेखनाला प्रारंभ कधी व कसा झाला ?

साहित्यिक चळवळीतला माझा प्रवास हा अलीकडचा आहे. साहित्य चळवळीत मी नव्हते पण, सामाजिक चळवळीत कार्यरत होते. सत्यशोधक संस्थेच्या माध्यमातून माझ ते काम सुरु होत. व्याख्यान ऐकण अथवा महिलांसाठी गावागावात जाऊन व्याख्यानं देण हे काम चालू होत. त्यामुळे बोलायची सवय होती. वक्तृत्व स्पर्धा देखील मी गाजविल्या होत्या. मात्र, लिहिण्याची सवय नव्हती. लेखन करेन असं वाटलं नव्हत. यातच साहित्य क्षेत्रातील मित्रमंडळी भेटली अन् मी साहित्याकडे वळले. या साहित्यिकांच्या कविता, लेख माझ्या वाचनात आले. त्यातून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, मी जे बोलत आहे ते प्रत्यक्षात आपण लिहू शकतो याची जाणीव झाली. गुरुस्थानी असणाऱ्या इतर साहित्याकांनी मला ती जाणीव करून दिली. अन्  मी पहिली कविता लिहीली. त्याच सर्वांनी कौतुक केलं. 'तुझ्या आदर्शवादाला थोड बाजूला ठेव...!' अशी ती कविता होती. तिथून हात लिहिता झाला.


 तुमच्या लेखनाला प्रोत्साहन कस मिळत गेलं ?

जेव्हा कविता लिहिली त्यावेळी साहित्यिक मित्रमंडळीनी मला प्रोत्साहन दिल. त्यांच्या कविता वाचून त्यावर चिंतन करून मी कविता लिहिली होती. त्यांनीच माझ्यात व्यक्त होण्याचा आत्मविश्वास निर्माण केला. त्यांच्या पाठबळामुळे मी लिहू शकले. अजूनही मी शिकत आहे. मला नाउमेद होऊ दिल नाही, प्रोत्साहन देत खंबीर पाठींबा दिला. कुटुंबाने देखील ते स्वातंत्र्य मला दिल. म्हणूनचं मी लिहू शकले. 


अनेक साहित्यिकांच सुरुवातीच लेखन वृत्तपत्रात किंवा मासिकात प्रसिद्ध होत. मात्र आपल्या कविता आणि समीक्षा लेखन अगदी थेट 'कविता - रती, मुराळी, समाज प्रबोधन पत्रिका' अशा साहित्यिक नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाल. याविषयी काय सांगाल ?

प्रतिष्ठीत मासिक, नियतकालिकांमध्ये मला लिहिण्याची संधी मिळाली हे माझ भाग्य समजते. माझ्या सोबत असणारी साहित्यिक मंडळी एका उंचीचं लेखन करणारी असल्यानं मी लोकापर्यंत पोहचले. त्यांच्यासोबत राहण्याचा मला फायदा झाला. इतरांसोबत माझ मत व्यक्त करू लागले. त्यावेळी एका पुस्तकावर आस्वादात्मक लेख लिहिला. दुसरा लेख साहित्यिक अजय कांडर यांच्या काव्यसंग्रहावर लिहीला. नंतर समीक्षा लेखनाचाही प्रयत्न केला. मी काहीतरी लिहू शकते याची जाणीव यातून झाली. 


 तुमचं नातं विद्रोही परंपरेशी आहे. पण, तुम्ही आवाजी विद्रोही कविता न लिहिता अतिशय सघन आणि आजच वास्तव संयमी शब्दात मांडणारी व समग्र जगण्याचं भान व्यक्त करणारी कविता लिहिता. ही समज कुठून आली असं वाटतं तुम्हाला ?

ह मी स्वतः शिक्षिका आहे. मला लाभलेली कौटुंबिक पार्श्वभूमी देखील शिक्षकांची आहे. आमच्या कुटुंबात ११ शिक्षक आहोत. त्यामुळे समाजाशी जोडून घेण हे वंश परंपरागत चालत येत तस आहे. आम्ही प्राथमिक शिक्षक असल्यानं खेडोपाड्यात जाण होत. तेथील मुलं, त्यांचे आई-वडील यांच्याशी बोलताना त्यांची दु:ख, वेदना जाणवू लागल्या. त्यांच्यासमोर आपल दु:ख काहीच नाही हे जाणवल. त्यामुळे विद्रोही न लिहिता संयमी, शांत पणा येत गेला, तोच कवितेत उतरत गेला. 


भविष्यातील लेखनाविषयीच ध्येय काय आहे काय सांगाल ?

 धेय्य खूप मोठ आहे. सर्वसामान्य लोकांच्या वेदनांना आवाज फोडण हे मी माझ कर्तव्य समजते. शिक्षिका म्हणून ते मी करू शकत नाही. परंतु, साहित्याच्या माध्यमातून या वेदना मांडण्याचा प्रयत्न मी करत आहे. उच्चभ्रू लोकांना सामान्य लोकांशी जोडण हा माझा मुख्य हेतू आहे. यासह समीक्षा लेखन, पुस्तक परीक्षणं करत असताना वाचन म्हत्वाचं असल्यानं अधिक वाचन करण्यावर माझा भर आहे. यातून माझ्या लेखनात कशी भर पडेल, त्यात कशी सुधारणा होईल यावर माझा अधिक भर असेल. 


 तुमचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी "आहे भविष्य अपुल्या हाती " हे पुस्तक प्रकाशित आहे. हे संपादन असलेल लेखन का करावंस वाटल ?

माझी शिक्षकी सेवा हि खेडोपाड्यात झाली. इथला शिक्षक हा सातत्याने येथील विद्यार्थ्यांसाठी झटत असतो. दहावी, बारावी असेल किंवा अन्य परीक्षा आपला जिल्हा गुणवत्तेच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर आहे. याच्यामागे कोण असत तर तो शिक्षक. शहरातील मुलांना इतर क्लासेस आदि पर्याय असतात. मात्र, ग्रामीण भागात ती सोय नसते. तरीदेखील ग्रामीण भागातील विद्यार्थी घवघवीत यश संपादन करतात. यासाठी झटणारे शिक्षक नेहमी माझ्यासमोर होते. मात्र, ते प्रकाशझोतात कधीही नव्हते. या शिक्षकांच कौशल्य इतर शिक्षकांपर्यंत पोहोचावं त्याचा अध्यापनासाठी उपयोग व्हावा यासाठी हे पुस्तक मी संपादित केलं. पुरस्कार न मिळता देखील राष्ट्रपती पुरस्काराला पात्र असणारे शिक्षक या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळतील. 


'तळकोकणातील कवींच्या कवितेतील स्त्री प्रतिमा'. या विषयावर आपण पीएचडीचे संशोधन करत आहात. हाच विषय तुम्हाला संशोधनासाठी का घ्यावासा वाटला?

मी स्वतः तळकोकणातील आहे. त्यामुळे पीएचडी करायची तर ती आपल्या भागावर करायची हा हेतू होता. आपल्या भागाशी आपल नात वेगळ असत. कोकण आणि इथला निसर्ग याबद्दल बोलाव तेवढ कमी आहे. इथला जो सर्वसामान्य माणूस हा शेतकरी आहे. त्यांच कुटुंब स्त्री तोलून नेत असते. त्या स्त्रीच्या वेदना समजून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. ९० नंतरच्या कवींनी उभारलेल्या स्त्री प्रतिमा आहेत त्या समोर आणाव्यात, त्यावर संशोधन करावं इथल्या स्त्रीला साहित्य क्षेत्राशी कसं जोडून घेता येईल हा माझा उद्देश त्यात आहे. त्यातून मी हा विषय निवडला आहे. इथल्या कवींनी माझ्या भागातील स्त्रीचं दु:ख कसं मांडल याचा अभ्यास मी करत आहे. 


तुम्ही लेखनाबरोबरच साहित्य चळवळीशी जोडून आहात. समाज साहित्य प्रतिष्ठानच्या पदाधिकारी म्हणून चळवळीचे काय वेगळेपण सांगाल ?

 समाज साहित्य प्रतिष्ठान या नावातच सर्वकाही आहे. 'समाज' आणि 'साहित्य' हे वेगळ करता येत नाही हे अजय कांडर यांचं मत असून ते या संस्थेचे संस्थापक आहेत. या संस्थेच्या माध्यमातून माझ्यासारख्या नवोदित कवींना व्यासपीठ मिळवून देण्याच काम केलं जात आहे. डाव्या विचारणसरणीचे, व्यवस्थेत हस्तक्षेप करणारे हे कवी आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्याच काम यातून केलं जात. या संस्थेत कोषाध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे. साहित्य क्षेत्रासह सामान्य लोकांसाठी झटणाऱ्या लोकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याचं काम या प्रतिष्ठानच्याच्या माध्यमातून आम्ही करत आहोत.