कोकणचं पहिलं दैनिक कोकणसाद व कोकणचं नं. 1 महाचॅनेल कोकणसाद LIVE च्या माध्यमातून 'जागर' कोकणच्या साहित्य रत्नांचा', हे विशेष अभियान हाती घेण्यात आलं आहे. या अभियान अंतर्गत जिल्ह्यातील अस्सल साहित्य रत्नांचा शोध घेत टीम कोकणसाद कोकणात साहित्य चळवळीला अधिक वृंधिगत करत आहे. याच विशेष अभियानाच्या १२ व्या मालिकेच्या पुष्पात कुडाळ येथील प्रशासकीय अधिकारी तथा साहित्यिक कवी डॉ. सुधाकर ठाकुर यांची खास मुलाखत आपल्या समोर घेऊन येत आहोत. जगण्यातील ओथंबलेल्या भावनांना वाट मोकळी करून देणाऱ्या या कवींची दैनिक कोकणसादचे संपादक संदीप देसाई यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत.
कवी डॉ. सुधाकर ठाकुर
पुष्प १२
कविता लिहायला केव्हापासून सुरुवात केली ?
माझे वडील शिक्षक होते. ते ग्रंथालयातील पुस्तक आणून द्यायचे, त्यामुळे मला वाचनाचा छंद जडला. नंतर शाळेत तसेच शिक्षक लाभले. मराठी विषयाचे चांगले शिक्षक प्राथमिक, माध्यमिक शालेय जीवनात लाभले. त्यात भाषा हा माझा पहिल्यापासून आवडता विषय होता. वाचन हा माझा प्राण होता. आजही वाचना शिवाय चैन पडत नाही. सकाळच्या वेळेत लिखाण व नंतर फावल्या वेळेत वाचन करतो. प्रशासकीय सेवेत असलो तरी निर्मितीचा जो आनंद आहे तो वाचन आणि लेखनातून मिळतो. हा आनंद कलावंत व शेतकरी यांच्याच नशिबात असतो. कारण, ते काहीतरी निर्माण करत असतात. निर्मितीचा हा आनंद वेगळाच आहे.
कविता हाच प्रकार का आवडतो ?
कॉलेजमध्ये असताना गंमत म्हणून कविता लिहिल्या होत्या. नंतर वयाच्या ४० व्या वर्षात जुन्या कवीता वाचनात आल्या, त्यावेळी १८-२० व्या वर्षात आपण लिहीलं तर आता आणखीन चांगल लिहू शकेन असा विचार केला. अन् पुनश्च हरिओम सुरु झाला. अल्पक्षरावर माझा विश्वास अधिक असल्यानं कवितांकडे वळलो, हा प्रकार अधिक रूचला. 'अळवा वरच पाणी' हा माझा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले. फेसबुक पेजच्या माध्यमातून समाज माध्यमावर जवळपास ५०० कविता आपण पोस्ट केल्यात.
कवितेची सर्वसाधारण व्याख्या काय ?
कविता ही जाणवीतून येत नाही नेणीवेतून येते, अंतर्मनातून ती येते, मनाच्या गाभाऱ्यातून ती येते. अनेकांनी कवितेच्या वेगवेगळ्या व्याख्या केल्या आहेत. दाटून येणारं ओथंबत त्याप्रमाणेच कवितेच आहे. केशवसुतांनी याला 'झपुरझा' अवस्था असं म्हटलं आहे.
आजपर्यंत कोणती पुस्तके प्रकाशित झाली आहेत ?
लिहिताना मी वरवरच लिहीत नाही. 'अळवा वरचं पाणी' हा माझा पहिला काव्यसंग्रह आहे. जीवनावर भाष्य करणारा हा कविता संग्रह आहे. 'ओथंबून आले काही' यामध्ये मनात साचून राहीलेल्या गोष्टींना मोकळीक देणाऱ्या अशा कवितांचा समावेश आहे. 'माफीनामा' पूर्णतः वेगळा होता. यात स्वगत होत, परमेश्वराला उद्देशून तो लिहिला आहे.
कविता कशी सुचते ?
कविता हा एक अस्वस्थ अनुभव आहे. कविता हा माझा श्वास आहे. ही त्रास देणारी गोष्ट आहे, गंमतीगंमतीतली गोष्ट नाही. कविता ही कुठेही सुचते. अगदी रात्री, मध्यरात्रीही सुचते.
कोणत्या प्रकारचे वाचन करता ?
१९९० च्या पुर्वींच्या साहित्यिकांच साहित्य मी वाचतो. नंतरच्या काळातील साहित्य तेवढंस मनाला भिडत नाही, त्यामुळे जुनं साहित्य वाचतो. ते साहित्य अधिक भावत. ललित गद्य वाचतो. पाश्चात्य लेखकांचंही लेखन वाचतो.
आवडते कवी कोणते ?
चिं.त्र्य.खानोलकर तथा आरती प्रभू, ग्रेस, बा.सी.मर्ढेकर ही तीन माझी दैवत आहेत. त्यांच्या सारखा एखादा शब्द लिहायला जमावा यासाठी माझा प्रयत्न असतो. अजूनही ते शक्य होत नाही. पण, त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवावं या हेतून मी लिहितो.
लिहिण्याची वेळ कोणती ?
आपत्ती कधी येईल हे सांगता येत नाही त्याप्रमाणे कवितेच आहे. कधी सुचेल सांगता येत नाही. जे सुचत ते कागदावर उतरत जातो. नंतर त्याचा विस्तार करतो, अशा पद्धतीने कविता रचत जातो. बरंच लेखन हे पहाटेच्या वेळेस करतो. या काळातच बरचसं सुचत, नंतर कामाच्या व्यापात वेळ मिळत नसल्यानं पहाटेच्या वेळेतच सर्व होत.
वाचकांना काय वाचायला सुचवाल ?
कविता ही कारगीरी करून होत नाही. कार्यशाळा वगैरे होतात पऱंतु, कविता हा अंतरीचा आवाज असल्यानं ती कारागिरी करुन येत नाही. भावना महत्त्वाच्या आहेत. जे सुचत ते मांडून मोकळ व्हावं, यासाठी वाचन करणं खुप महत्वाच आहे. लोक, निसर्गाच्या मनाशी तुमच्या तारा जुळल्या पाहिजेत, तरच निर्मिती होऊ शकते. तंत्रज्ञान येत असताना आपण कलांपासून दुरावत आहोत. त्यामुळे साहित्य वाचायच असलं तर पुस्तकांकडेच वळल पाहिजे. सोशल मिडियामुळे फायदा होत असेल. पण, पुस्तकाविना आपण शुन्य आहोत.
तरुण पिढी वाचनापासून का दुरावली आहे ?
तरूणांसमोर प्रलोभन भरपूर आहेत. त्यामुळे त्यांची एकाग्रता राहत नाही. इतर क्षेत्राकडे तरूणांचा कल आहे त्यांचे आदर्श वेगळे आहेत. त्यासाठी प्रयत्न होण आवश्यक आहे. साहित्य क्षेत्रात आदर्श तरूणांसमोर निर्माण होतील तेव्हा ही नवी पिढी त्याकडे वळेल. अन्यथा ग्लॅमर, प्रसिद्धी व पैशाच्या मागे जातील. चांगुलपणाच्या दिशेने जाणार नाही.
कविता वाचणाऱ्यांची संख्या का कमी झाली आहे ?
माध्यम बदलली आहेत. धड इंग्रजी व धड मराठी मुलांना येत नाही. लोक मराठीपासून दुरावले आहेत. तसंच चांगल्या कविता आता निर्माण होत नाहीत. चांगल्या कविता नाहीत म्हणून वाचक नाही अन् वाचक नाही म्हणून कविता नाही असं दृष्टचक्र सुरु झालं आहे. कुणीही उठतो आणि कविता करतो. त्यामुळे कविता दर्जा ढासळेला आहे. खरे कवी, खरे लेखक मागे आहेत. तर बाकीचे प्रसिद्धीच्या मागे आहेत. जे व्यासपीठावर आहेत, पुरस्कार मिळवत आहेत. आता पुरस्कार कसे मिळवतात हे सांगायला नको. सगळ्या गोष्टी सगळ्यांना ठावूक आहेत. यात खरं सोनं खाणीत अडकून पडलं आहे.
कोकणची साहित्य संस्कृती अधिक वृद्धिंगत व्हावी यासाठी काय केलं पाहिजे असे आपणास वाटते
कोकणभुमी ही रत्नांची खाण आहे. मोठे साहित्यिक देखील या भुमीत होऊन गेलेत. हिमालयाच्या उंचीची माणसं या भुमीत घडून गेली. अजूनही पुढच्या काळात ती घडतील. विज्ञान, तंत्रज्ञानाच्या आहारी गेल्याने सामाजिक लिहायला लागले आहे. जीवन कसं आहे यापेक्षा ते कसं असावं या पद्धतीने त्यांनी लिहाव असं मला वाटतं. वास्तवादी लिहीण्यापेक्षा कसं वागल पाहिजे हे लिहीण अपेक्षित आहे. आवड असेल तर सवड मिळते याप्रमाणे मी प्रशासकीय सेवेत असलो तरी माझा छंद जोपासत आहे. जगाव कशाला याच काहीतरी कारण असावं तर तो माझा छंद आहे. छंदासाठी नोकरी आहे, नोकरीसाठी छंद नाही.