दक्षची विलक्षण कामगिरी

Edited by: दिपेश परब
Published on: August 20, 2025 17:58 PM
views 40  views

सावंतवाडी : अक्षरांची ओळ, रेषांची जोड, आणि सुंदर हस्ताक्षराच्या कलेतून गोव्याच्या चिमुकल्या दक्ष क्षितिज परबने थेट राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. विझ इंटरनॅशनल स्पेल बी अँड रायटींग विझर्ड आयोजित राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेत दक्षने तब्बल ३ लाख स्पर्धकांमध्ये बाजी मारत ७ वा क्रमांक पटकावला. केवळ १ ली इयत्तेत शिकणाऱ्या या चिमुकल्याने दाखवून दिलं की मेहनत, आत्मविश्वास आणि लेखनकलेवर प्रेम असेल तर वय कधीच अडसर ठरत नाही.

या यशाबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोवा सचिवालयात दक्षचा सत्कार सोहळा पार पडला. या प्रसंगी मुख्यमंत्री सावंत यांनी दक्षचे मनापासून कौतुक करत भविष्यात तो आणखी मोठं यश संपादन करेल असा विश्वास व्यक्त केला. दक्ष हा मूळ वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड गावचे सुपुत्र व सध्या सावंतवाडी येथील ॲड. क्षितिज परब व अनुराधा परब यांचा सुपुत्र तर ॲड. प्रकाश परब व कवीयत्री सौ उषा परब यांचा नातू आहे. कुटुंबाचा आणि शाळेचा अभिमान ठरलेला हा चिमुकला गोव्याच्या प्रत्येक घराघरात प्रेरणेचा किरण ठरत आहे. गोमंतकाच्या भूमीतून उमललेला हा अक्षरांचा लहानसा फुलोरा संपूर्ण देशात सुगंध दरवळतोय. दक्षचे हे यश केवळ कुटुंबापुरतेच मर्यादित नसून, संपूर्ण गोव्याचा व सिंधुदुर्ग चा अभिमान आहे.