शुध्द ऑक्सिजनचं महत्व आता नव्यानं सांगण्याची गरज नाही. सिमेंटच्या जंगलात राहणा-यांना तो आता शोधावा लागतो. ताणतणाव आणि धकाधकीच्या जीवनात तोच एक सर्वात मोठा आधार आहे. जगाच्या पाठीवर कुठेही शोधाल तर हा शुध्द ऑक्सिजन तुम्हाला भेटणार तो कोकण आणि गोव्याच्या निखळ, नितळ निसर्गात. त्यामुळं कोकणचं नंबर 1 महाचॅनेल कोकणसाद LIVE याच दिशेनं पर्यटनाच्या समृध्दीसाठी प्रयत्न करतंय. कोकणसाद LIVE च्या 9 व्या वर्धापनदिन दिनाच्या निमित्तानं 'ऑक्सिजन पर्यटन' हे अभियान आम्ही सुरू केलंय. याच अनुषंगानं आम्ही कोकणच्या अशाच शुध्द ऑक्सिजन देणा-या काही पर्यटनस्थळांची माहिती या मालिकेत देत आहोत. ज्येष्ठ पत्रकार, अनुभवी आणि अभ्यासु पर्यटन तज्ञ सुनील शेडगे यांची ही खास लेखमाला आजपासुन कोकणसाद LIVE च्या वाचकांसाठी...
---------------------------------
काही गोष्टी सतत तुमचा पिच्छा पुरवितात. जोवर त्या पुऱ्या होत नाहीत, तोवर त्या तुमची पाठ सोडत नाहीत. त्या तुम्हाला स्वस्थ बसू देत नाहीत. शांत राहू देत नाहीत. माझ्या रेडी ते रेवस 'बाईक भ्रमंती'ची गोष्ट त्यातलीच एक. सरत्या वर्षाच्या अखेरीस ती पुरी झाली. अन् सुटकेचा निःश्वास सोडला.
माझ्यासाठी जशी कोकणाची भुरळ, तशीच ती समुद्राचीही आणि तिथल्या शुद्ध ऑक्सिजनचीही. त्याच ओढीनं कोकणात कैकदा गेलो. मित्रांना अनेकदा कोकणी मुलूखात फिरवलं. घरच्यांनाही बहुतेकदा कोकण पर्यटन घडवलं. दैनंदिन व्यस्ततेतून, नोकरीच्या दिनक्रमातून उसंत मिळाली, की पहिली पावलं वळायची ती अर्थातच कोकणाकडं.
कळत्या वयात जेव्हा पुस्तकं हाती आली, तेव्हा कोकणातलं प्रादेशिक साहित्य अधिक भावत राहिलं. त्यातून कितीतरी पुस्तकं हातावेगळी होत राहिली. त्यातलंच चित्र सतत नजरेसमोर तरळत राहिलं. त्यामुळं कोकणवाटा धुंडाळण्यामागं कदाचित पुस्तकांचाही प्रभाव असावा. मग त्यातूनच समुद्रकिनाऱ्याची सफर बाईकवरुन पुरी करण्याच्या स्वप्नाचं बीज मनात पेरलं गेलं.
गोव्याच्या टोकाकडून महाराष्ट्राचा समुद्रकिनारा सुरु होतो. तो थेट मुंबईपर्यंत. मुंबईपासून पुन्हा समुद्र. तो गुजरातच्या टोकापर्यंत. त्यातला पहिला टप्पा पुरा करायचा. महाराष्ट्रातल्या गोव्याकडच्या टोकाकडून अर्थातच रेडी (जि. सिंधुदूर्ग) इथून सफरीचा आरंभ करायचा. रेवस (जि. रायगड) बंदरापर्यंत पोचायचं. तिथून मग मुंबईत गेट वे आॅफ इंडिया. ढोबळमानानं माझ्या मनानं ठरवलेलं नियोजन असं होतं. परिचितांपैकी फारसं कुणी या वाटेला गेलं नव्हतं. हे सारं अंतर बाईकवरुन पुरं करायचं. तेही एकट्यानं. ते करताना जलदुर्ग पाहायचे. बीचवर रेंगाळायचं. मंदिरात नतमस्तक व्हायचं. माणसांशी गप्पा मारायच्या. क्षणांना कॅमेऱ्यात कैद करायचं. जितकं मनात भरून घेता येईल तितकं घेत राहायचं. हेही आधीच पक्कं केलं होतं.
एरवी संगतीला कुणी न् कुणी असतं. या वेळी मात्र 'एकला चलो रे'. अर्थात एकटं का जायचं, याची कारणंही ठाऊक होती. त्यातले फायदे- तोटे माहिती होते. जोखमीची जाणीवही मनात मांडली होती. या साऱ्यात सफरीचा निर्धार पक्का होता. निश्चय ठाम होता. 'होम वर्क'ही खूप केला होता. 'हार्ड वर्क'ची खूणगाठ बांधली होती. त्यासाठी 'गुगल मॅप' कितीदा तरी 'सर्च' केला होता. माझ्या संग्रही असणारी पर्यटनाची पुस्तकं वारंवार चाळली होती. अंतर, आवाका, गती, पल्ला याची गणितंही डोक्यात तयार होती.
यातून एक यशस्वी सफर साकारली. रेडी ते रेवस. त्याला 'कोस्टल वे' म्हणूनही संबोधलं जातं. त्यासाठी ट्रॅव्हल्स बसमध्ये बाईक टाकून प्रवास झाला तो जवळपास 550 किलोमीटर. समुद्राचा काठ पकडून झालेली सफर होती ती 700 किलोमीटर. या भ्रमंतीला जोडून सुमारे 200 किलोमीटर ज्यादाचा प्रवास.
वाटेवर समुद्राची अखंड सोबत. निळ्या रंगाची संगत. जंगलवाटा, पल्लेदार वळणं, खाड्या अन् खारा वारा. शुभ्र वाळूचे किनारे. चार 'जेटी'तून पैलतीर. शेवटी परदेशी बनावटीच्या 'रो पॅक्स'मधून मुंबईत. तेरेखोल, यशवंतगड, मालवण, देवगड, विजयदुर्ग, आंबोळगड, पूर्णगड, रत्नदुर्ग, हर्णे, बाणकोट, कोर्लई, रेवदंडा, अलिबाग इथले किल्ले. रमणीय बीच, प्राचीन मंदिरं, वाटेवरचा निसर्ग अन् आणखीही खूपकाही.
(क्रमश:)