"बाबा,मी आपल्या बागेतील सुपारी गोळ्या केल्यात. त्या मी विकणार आहे. आणि त्याचे आईस्क्रीम आणणार आहे. माझ्या कष्टाचे आईस्क्रीम!" राई आनंदाने म्हणाली.
"नाही बाळा, तसे करू नकोस. कष्ट करून मिळवलेली प्रत्येक गोष्ट चांगलीच असते असे नाही. जी वस्तू व्यसनासाठी वापरली जाते, ती वस्तू निर्माण करून आपण समाजाचे नुकसान करतो. माझ्या बाबांनी जेव्हा शेती हा व्यवसाय म्हणून निवडला तेव्हा त्यांना एका शेतीतज्ञ माणसाने सल्ला दिला होता की त्यांनी सुपारीची लागवड करावी. पण बाबांनी सुपारी हे व्यसनाचे पीक म्हणून त्याची लागवड केली नाही.
आपल्या बागेत काजूची झाडे आहेत. पण माझ्या बाबांनी त्याची बोंडे कधी विकली नाहीत कारण त्यांची दारू बनवली जाते," मी म्हणालो.
"मग बाबा, आपल्या बागेत सुपारीची झाडे का लावलीत?" राईने विचारले.
"त्यांची खोडे मंडप घालायला उपयोगी पडतात म्हणून काही झाडे वाढू दिलीत आपण," मी म्हणालो.
"पण आपण सुपारी विकली नाही, म्हणून काय फरक पडणार? इतर लोक विकतातच ना," राईने विचारले.
"असाच प्रश्न मी माझ्या बाबांना केला होता. त्यावर ते म्हणाले होते की आपली नीतिमत्ता इतर काय करतात, यावरून ठरवायची नसते. आपण धार्मिक हिंदू आहोत. धार्मिक वर्तन हे इतर काय करतात यावरून ठरवायचे नसते. माझ्या वर्तनाने देवाला काय वाटेल यावर ठरवायचे असते.
गीता हा आपला धर्मग्रंथ आहे. तिचा तिसरा अध्याय कर्मयोग आहे. त्यात तिचा उपदेश आहे की कोणतीही अपेक्षा न ठेवता कर्म कर. प्रत्येक कर्म ही देवाची पूजा म्हणून कर. प्रत्येक कामाचे फळ देवाला अर्पण कर. आपल्याला जर माहीत आहे की अमुक एक व्यवसाय समाजघातक आहे आणि तरीही तो आपण करणार असू तर त्यात ज्यास्त पैसे कमावणे हाच हेतू आहे. त्यात आपला स्वार्थ आहे. स्वार्थ आहे म्हणजे आपण ते कर्म देवाला अर्पण करणार नाही आहोत. ती देवाची पूजा नाहिये. त्यामुळे सगळी समाजविघातक कामे ही धार्मिक नाहीत. तो स्वधर्म नाही, तो लोभधर्म आहे.
गीता सांगते, काम करणे हाच यज्ञ आहे!" मी म्हणालो.
"पण यज्ञ म्हणजे अग्नीला आहुती देतात ते ना? माझ्या अंकलिपीत यज्ञाचं चित्र होतं!" राई म्हणाली.
"तो होम. पण प्रत्येक यज्ञ म्हणजे अग्नीत आहुती देणे नव्हे! आपण जेवतो तो सुद्धा यज्ञ होऊ शकतो. 'वदनी कवळ घेता...' ऐकलेस ना? त्यात 'उदरभरण नोहे, जाणीजे यज्ञ कर्म' आहे," मी म्हणालो.
"म्हणजे आपण काहीही केले तरी त्याला यज्ञ म्हणता येते का?" तिचा पुन्हा प्रश्न.
"नाही. जे आपण करू ते देवासाठी करतोय असा भाव असेल तर तो यज्ञ! आपण जर फक्त जगण्यासाठीच खात असू (जीभेला चांगले लागते म्हणून नव्हे) आणि आपल्या संपर्कातील सगळ्यांच्या भल्यासाठीच आपले जीवन वाहणार असू तरच जेवण म्हणजे यज्ञ!" मी म्हणालो.
"म्हणजे कसं?"
"'संत सावता माळी नावाचे एक संत होऊन गेले. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव वगैरे होते ना, त्यांच्याच काळात. हे सावता माळी विठ्ठलाचे भक्त होते. त्यांचे गावदेखील पंढरपूरच्या जवळच होते. आणि गम्मत म्हणजे ते कधी पंढरपुरला गेलेच नाहीत.'
"आणि तरीही ते विठ्ठलाचे भक्त?" तिने आश्चर्याने विचारले.
"हो. ते म्हणायचे, 'कांदा मुळा भाजी अवधी, विठाबाई माझी'. त्यांना भेटायला संत ज्ञानेश्वर, संत नामदेव वगैरे मंडळी त्यांच्या शेतात आली होती.
जीवंतपणा म्हणजे देव. जीवंतपणा म्हणजे विठ्ठल. मग झाडांना पाणी देणे म्हणजे त्याच्यावर अभिषेक करणे. त्यांना खत देणे म्हणजे नैवेद्य दाखवणे. मोटेने विहीरीचे पाणी काढणे म्हणजे नमस्कार घालणे. मोट, मोटेचा नाडा वगैरे म्हणजे त्यांच्या पूजेचे साहित्य.
शेताचे काम ही त्यांची साधना बनली होती. जी काही भाजी, धान्य त्यांच्या शेतात पिके, तो विठ्ठलाचा प्रसाद म्हणून ते स्विकारत. शेत कमी पिकले म्हणून त्यांची कुरकुर नसे कारण प्रसाद हा थोडा मिळाला काय आणि जास्त मिळाला काय, तो देवाने दिलेला आहे अशी त्यांची धारणा असे. आणि पीक जास्त आले तर ते गोर गरिबांना वाटत. आपल्यातला प्रसाद इतरांना वाटावा म्हणूनच तर देवाने दिलाय असा ते विचार करीत.
विनोबा भावे म्हणतात, शेती करणे हे मन निर्मळ करण्यासाठी महत्वाचा उपाय आहे," मी म्हणालो.
"म्हणजे तू हॉस्पिटलमध्ये नोकरी करतोस ती पण पूजा ना?" राईने विचारले.
"नाही बाळा. तसे म्हटले तर प्रत्येकजण कर्मयोगी म्हणावा लागेल. ती माझी नोकरी आहे. तिथे मला चांगला पगार आहे. मी तिथे पगारासाठी जातो. उद्या पगार मिळाला नाही, तर मी तिथे जाईन का?"
"पण तू तिथे लोकांना चांगले तपासतोस ना!"
"हो. त्यासाठीच तर मला पगार मिळतो. मी त्यांना योग्य तर्हेने तपासलेच पाहिजे, नाहीतर ती चोरी होईल.
संत सावता माळीं जसे त्यांच्या झाडापेडात देव पहात तसा मी पेशन्टना देव म्हणून पाहू शकलेलो नाही.
काही अडचणीची परिस्थिती येत नाही, तोपर्यंत प्रामाणिकपणे नोकरी करणारा आणि कर्मयोगी सारखेच दिसतात."
"अडचणीची परिस्थिती म्हणजे कशी?"
"तुला मंगळवेढ्याच्या संत दामाजीपंतांची गोष्ट सांगतो. ते बिदरच्या बादशहाच्या नोकरीत होते. त्यांच्याकडे सारा गोळा करण्याचे काम होते. त्याकाळी राजाला टॅक्स द्यायचा म्हणजे म्हणजे शेतात पिकवलेले धान्य द्यायचे. त्यामुळे जमा झालेल्या धान्याचे गोदाम दामाजींच्या ताब्यात असे. दामाजी आपले काम प्रामाणिकपणे करीत. सरकारी खजिन्यात जितके जमा करायला हवे तितकाच सारा ते जनतेकडून घेत. आपल्या अधिकाराचा वापर करून आपल्यासाठी जास्त घेत नसत. एकदा देशात दुष्काळ पडला. पीक आलेच नाही. लोकांची उपासमार होऊ लागली. लोक मरू लागले. त्यावेळी दामाजींच्या ताब्यात असलेल्या गोदामात धान्य होते. पण ते त्यांच्या मालकीचे नव्हते. ते बादशहाचे होते. ते लोकांना दिले तर बादशहा संतापणार आणि शिक्षा करणारे हे साहजिकच होते. शिक्षा मृत्युदंडाची देखील होऊ शकली असती. पण दामाजीपंतांनी वाटेल ती शिक्षा भोगण्याची तयारी केली. त्यांच्यासमोर जनता जनार्दन उपाशी होता. त्यांनी कोठारे उपाशी नारायणासाठी खुली केली."
"बाबा, तू लोकांना चांगले सांगाण्यसाठी लिहितोस ना. त्याचे तुला पैसे कुठे मिळतात. तुझे लिहिणे कर्मयोग म्हणता येईल ना."
"'नाही. लिहिणे हे माझे निष्काम कर्म झालेले नाही. जेव्हा लेखक गौरांग महाप्रभूंसारखा होईल तेव्हाच त्याचे लिखाण हा कर्मयोग होईल."
"काय केले गौरांग महाप्रभू यांनी?"
"गौरांग प्रभू हे बंगाल मधील संत. ते विद्वान होते. त्यांनी विविध दर्शनांचा अभ्यास केला होता. त्यांनी 'न्याय दर्शन' वर ग्रंथ लिहिला होता. त्यांचे एक मित्र होते रघुनाथ आचार्य. ते देखील विद्वान होते. एकदा ते दोघेही त्यांच्या गुरूंच्या पाठशाळेत चालले होते. गुरूंची पाठशाळा नदीच्या पलीकडे होती. त्यामुळे दोघेही नावेतून पैलतीरी जात होते. दोघांची वाटेत चर्चा सुरू झाली. गौरांगांनी लिहिलेल्या ग्रंथाचे हस्तलिखित सोबतच होते. रघुनाथ ते चाळू लागले. जसजसे ते तो ग्रंथ चाळू लागले तसतसे त्यांच्या चेहर्यावरचे भाव निराशेत बदलत गेले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गौरांग महाप्रभूंचा ग्रंथ इतका उत्कृष्ट झाला होता की आपला ग्रंथ कोणी वाचणार नाही हे त्यांच्या लक्षात आले. मित्राला झालेले दुःख पाहून गौरांग महाप्रभूनी क्षणाचाही वेळ न लावता आपले हस्त लिखित नदीत सोडून दिले. अशी मनाची स्थिती जेव्हा होईल तेव्हा माणूस निष्काम कर्मयोगी झाला असे समजायला हवे!"
.....
डॉ. रुपेश पाटकर