LIVE UPDATES

महिलांच्या स्वप्नांना आर्थिक बळ देतेय ‘स्वप्नपूर्ती’ योजना

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे पाठबळ
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 22, 2026 07:37 PM
views 31  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सिंधुदुर्ग : आपला छोटासा व्यवसाय असावा, स्वतःच्या पायावर उभे राहावे, घरच्या संसाराला हातभार लावत स्वतःची ओळख निर्माण करावी, असे स्वप्न अनेक महिलांच्या मनात असते. मात्र या स्वप्नांच्या आड सर्वात मोठी अडचण उभी राहते ती आर्थिक पाठबळाची. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी महिलांच्या स्वप्नांना आर्थिक पाठबळ देणारी ‘स्वप्नपूर्ती’ योजनेमुळे आज महिलांचे व्यवसाय करण्याचे स्वप्न सत्यात उतरले आहे. 

 जिल्हा बँकेच्या या स्वप्नपूर्ती  योजनेतून आज ब्युटी पार्लर, चहाचे दुकान, ई-सेवा केंद्र, बांबू काम, शेळीपालन, पुरणपोळी व्यवसाय, मालवणी मसाले अशा विविध व्यवसायांच्या माध्यमातून महिला आता आर्थिकदृष्ट्या सक्रिय होत आहेत. कुणी घरातूनच व्यवसाय सुरू केला, कुणी छोट्या दुकानातून सुरुवात केली, तर कुणी आपल्या पारंपारिक कौशल्याला बाजारपेठेशी जोडले. महत्त्वाचे म्हणजे ‘मला काहीतरी स्वतःचे करायचे आहे’ या इच्छेला आर्थिक बळ मिळाले ते जिल्हा बँकेचे  आणि त्या इच्छेचे रूपांतर प्रत्यक्ष व्यवसायात उतरले.


महिलांच्या हाताला काम मिळणे, त्यांच्यामध्ये व्यवसायाचा आत्मविश्वास निर्माण होणे आणि कुटुंबाच्या उत्पन्नात त्यांचा वाटा वाढणे हा या प्रयत्नाचा उद्देश आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी महिलांना विविध बँकिंग सुविधा आणि स्वयंरोजगाराच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन यापूर्वीही केले आहे. महिलांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधावी आणि जिल्हा बँक त्यांच्या पाठीशी राहील, अशी त्यांची भूमिका आहे. 

महिलांना व्यवसायाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रमांना चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रयत्नांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाची जोड मिळत असल्याने महिलांसाठीच्या उद्योग-व्यवसायाच्या संधींकडे जिल्हा बँकेने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. महिलांना केवळ आर्थिक मदत नव्हे, तर व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण निर्माण करणे, त्यांना बँकिंग व्यवस्थेशी जोडणे आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या वाटचालीतील महत्त्वाचा भाग आहे.  

‘स्वप्नपूर्ती’सारख्या योजनांमधून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न दिसून येतो. एखाद्या महिलेला कर्ज मिळणे ही केवळ बँकेची व्यवहारातील नोंद नसते. त्या कर्जातून उभा राहणारा व्यवसाय म्हणजे एका कुटुंबासाठी अतिरिक्त उत्पन्न, एका महिलेच्या हाताला काम आणि पुढच्या पिढीसाठी आत्मविश्वासाची शिदोरी असते. सिंधुदुर्गातील महिलांकडे पारंपारिक कौशल्याची मोठी ताकद आहे. मालवणी मसाले, पुरणपोळी, घरगुती खाद्यपदार्थ, बांबू काम यांसारख्या व्यवसायांमध्ये स्थानिक कौशल्याला व्यावसायिक रूप देण्याची क्षमता आहे. याच कौशल्याला जिल्हा बँकेने आर्थिक पाठबळ दिल्याने आज उभे राहिलेले छोटे व्यवसाय भविष्यात मोठे होऊन रोजगारनिर्मितीचे केंद्र बनणार आहेत.

आज एका महिलेने सुरू केलेला छोटा व्यवसाय उद्या तिच्यासोबत आणखी दोन महिलांना रोजगार देऊ शकतो. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला दिलेले हे प्राधान्य स्थानिक पातळीवर स्वयंरोजगाराला चालना देत आहे. महिलांच्या स्वप्नांना ‘स्वप्नपूर्ती’च्या माध्यमातून मिळालेला आधार आहे.