मंगल नाईक-जोशी सावंतवाडी : मनुष्य आणि पर्यावरण यांचे अतूट नाते आहे. पर्यावरणातील प्रत्येक घटक पर्यावरणासाठी गरजेचा असल्याने या प्रत्येकाला सृष्टीवर राहण्याचा अधिकार आहे. साप, गांडूळ, वृक्ष, नद्या हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत, असे शालेय पाठ्यपुस्तकातून फार पूर्वीपासून विद्यार्थ्यांना शिकविले जात असूनसुध्दा मनुष्याने स्वार्थासाठी पर्यावरण संहार करण्यास सुरुवात केल्यामुळे जागतिक स्तरावर 'पर्यावरण दिन' साजरा करण्याची गरज भासू लागली. अलीकडच्या ५० ते ६० दशकांत जगात ही पर्यावरण संरक्षण चळवळ वाढत आहे.
पर्यावरणात सभोवतालच्या प्रत्येक सजीव-निर्जीव घटकाचा यामध्ये पशू-पक्षी, माणूस यांच्यासद दगड, माती, खनिजे, वृक्ष, नद्या, समुद्र, इ. सर्व घटकांचा समावेश होतो.
संत तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वीच वृक्षवेली, वनचर हे माणसाचे सखेसोयरे असल्याचे सांगून ठेवले आहे. संत तुकारामांनी पक्ष्याप्राण्यांच्या सहवासात बसून अभंग निर्मिले.
संयुक्त राष्ट्रसंघाने सन १९७२ मध्ये स्वीडनमधील 'स्टॉकहोम' येथे पर्यावरण परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत जगातील ११९ देश सहभागी झाले. यावेळी जागतिक स्तरावर प्रथमच पृथ्वीच्या संरक्षणाबाबत निश्चित कार्यक्रम हाती घेण्यात आला. यावेळी ५ जून हा दिवस
'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आले. जगातील जल-वायू प्रदूषण थांबविणे, जागतिक तापमानवाढ कमी करणे, वृक्षसंवर्धन करणे, ओझोनचा क्षय थांबविणे अशा उद्देशांसाठी पर्यावरण दिन साजरा केला जात आहे.
भारतात पर्यावरणविषयक जनसामान्यांमध्ये काही पर्यावरण विषयक चळवळी विशेष गाजल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील 'चिपको' आंदोलन, 'भागीरथी बचाओ', ओडिशातील बालीपाल, 'गंधमर्दन' टेकड्यांमधील आदिवासी लोकांची चळवळ, पश्चिम घाटातील 'अपिको' चळवळ, गुजरातमधील 'नर्मदा बचाव' आंदोलन ही काही भारतातील उदाहरणे आहेत.
पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. निसर्गातील या सग्यासोयऱ्यांशिवाय माणसाचे जगणे अवघड, कष्टप्रद म्हणण्यापेक्षा सर्वस्वी अशक्यच आहे. माणसाला त्याच्या बुद्धीच्या जोरावर केलेल्या प्रगतीमुळे आपण सार्वभौम असून आपणांस कुणाचीही गरज नसल्याचा झालेला आंतरिक भ्रम दुर्देवी आहे.
जगण्यासाठी लागणारे पिण्याचे पाणी निसर्ग देतो. जगण्यासाठी अत्यावश्यक असणारा प्राणवायू निसर्ग देतो. जगण्यासाठी लागणारे अन्नधान्य-मांस निसर्ग देतो. अंगावरच्या पोशाखासाठी लागणारा कच्चा माल निसर्ग देतो. निवारा बांधण्यासाठी लागणारे दगड, खडी, इ. निसर्ग देतो. अन्न शिजविण्यासाठीची उष्णता निसर्गच देतो. याची आम्हां मानवांना जाण नसल्यामुळे या पर्यावरणाची फार मोठी हानी झाली ही गोष्ट निर्विवाद सत्य आहे. त्याचे आम्हाला काहीही पडलेले नाही.
पर्यावरणाचे महत्त्व ओळखलेली हाताच्या बोटावर मोजण्याइतकी माणसे याबाबत सजग आहेत. म्हणूनच, स्वार्थासाठी मोठमोठ्या प्रकल्पांच्या नावाखाली सुंदर निसर्गाचा विनाश करण्याचा प्रयत्न होतो, त्यावेळी विरोधासाठी प्राणाची तमा न करता निधड्या छातीने सर्वात पुढे उभी राहतात.
निसर्गशक्तीने सुरेख संतुलन करून दिले आहे. वृक्षांनी स्वत: चे अन्न सुर्यप्रकाशाच्या सहाय्याने स्वत: तयार करायचे. यासाठी प्राणीमात्रांकडून उत्सर्जित होणारा कार्बन डायऑक्साईड वापरायचा. या प्रक्रियेत आपण प्राणीमात्रांना आवश्यक असणाऱ्या प्राणवायूचा ऑक्सिजनचा पुरवठा करायचा. यामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कधी वाढले नव्हते. अलीकडच्या काही दशकात बेसुमार वृक्षतोडीमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढले. यामुळे वैश्विक तापमानवाढ होऊ लागली. याचे प्रमाण असे वाढले की आता जगातील हिमनद्या वितळू लागल्या आहेत. मध्येच कुणी ज्योतिषी जगबुडी येणार असल्याचे भाकित वर्तवतात. ती जगबुडी जादूची नव्हे तर हीच मानवनिर्मित असेल !
जागतिक तापमानवाढीस कारणीभूत असणारी हवेतील पाण्याची वाफ, कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि इतर वायूमुळे पृथ्वीच्या भूपृष्ठाचे आणि वातावरणाचे तापमान वाढते, त्याला 'हरितगृह परिणाम' म्हणतात. या वायूंना हरितगृह वायू म्हणतात. या वायूंचे उत्सर्जन थांबले पाहिजे. सर्वच देश आर्थिक प्रगतीसाठी या वायूंचे उत्सर्जन करीत आहेत. अविकसित, विकसनशील देशांसाठी ही गरज आहे; परंतु, विकसित देशांचीही थांबण्याची तयारी नाही. पर्यावरणाचे महत्व सर्वच जाणतात; परंतु त्याच्या संवर्धनासाठी एक पाऊल मागे येण्यास कोणताही देश तयार नाही.
आपण प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर पर्यावरणाची बूज राखायला हवी. आपल्यासाठी शिवाय पुढील प्रत्येक पिढीसाठी प्रचंड संपत्ती ठेवण्याच्या इराद्याने माणूस प्रचंड धन कमावतो. बंगला, वाहने, सोने, इ. या संपत्तीमध्ये स्वच्छ, सुंदर ,हरीत पर्यावरण मागे ठेवण्याची जबाबदारीसुद्धा आपली आहे, हे लक्षात ठेवायला हवे.
जागतिक पातळीवरील निर्धारीत कार्यक्रमानंतर आजपावेतो भारतात पर्यावरण संवर्धनाबाबत शासकीय पातळीवर विविध योजना, कायदे अंमलात आणले आहेत. याचा अंमल परिणामकारक होणे आवश्यक आहे. केवळ एक दिवस 'पर्यावरण दिन' साजरा करून इप्सित साध्य होणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने मनापासून पर्यावरण संवर्धनात खारीचा हातभार लावला पाहिजे.
रोजगार, उद्योग करण्याची इच्छा असल्यास पर्यावरणपुरकतेस प्राधान्य द्यायला हवे. अशाच उद्योग-व्यवसायांची उभारणी व्हायला हवी. फक्त स्वत: च्या पिढीचा विचार न करता भविष्य समोर ठेवले पाहिजे.