GOOD NEWS | अपराधी बनले उद्योजक | सात जणांनी उभारले व्यवसाय !

सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांचा खास लेख
Edited by: प्रशांत सातपुते
Published on: January 01, 2023 08:54 AM
views 580  views

परिविक्षाधीन व शिक्षा भोगून आलेल्या मुक्त बंद्यांचे समाजात पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडून व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुदान दिले जाते. शिवाय संबंधित व्यवसायासाठीचे प्रशिक्षण देखील दिले जाते. याचाच लाभ घेतलेले जिल्ह्यातील 5 परिविक्षा आणि दोन मुक्तबंदी अशा सातजणांनी आपला व्यवसाय उत्तमरित्या उभारुन चरितार्थ चालवत आहेत.

जिल्हा परिविक्षा अधिकारी बी.जी. काटकर यांनी याबाबत माहिती दिली.अपराधी परिविक्षा अधिनियम 1958 (अधिनियम क्र.20) नुसार न्यायालयामध्ये खटले दाखल असतात. न्यायालयाकडून अशा आरोपींना सुधारण्याची संधी दिली जाते. जिल्हा परिविक्षा अधिकारी यांच्या देखरेखीखाली सोडण्यात येते. परिविक्षा अधिकारी गृहभेट करुन त्या व्यक्तींचा अहवाल न्यायालयात देत असतो. त्याची पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने रोजगारासाठी 25 हजार अर्थसहाय दिले जाते. सुरुवातीला हे अनुदान 20 हजार होते. 14 ऑक्टोबर 2016 मध्ये शासन निर्णय निर्गमित करुन यात 5 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.  

अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीपासून परावृत्त करण्यासाठी परिविक्षा अधिकारी त्याला रोजगारासाठी आवश्यक मार्गदर्शन करत असतो. त्यांच्या  चांगल्या वर्तणुकीचा अहवाल देखील न्यायलयात देवून त्याची शिक्षा या कार्यालयाच्या देखरेखीखाली आणले जाते. जिल्ह्यातील परिविक्षाधीन अश्विनी चोपडेकर यांनी शिवणकाम, हेमंत पाठलेकर यांनी गॅरेज, संजय पाठलेकर यांनी शिवणकाम, दिगंबर म्हापणकर यांनी कुक्कुटपालन आणि गणपत म्हापणकर यांनी वेल्डींग व्यवसाय सुरु केला आहे. तसेच  मुक्तबंदी लक्ष्मण न्हावी यांनी केश कर्तनालय, शरद हरमलकर यांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. 



गणपत म्हापणकर - किरकोळ मारहाणीच्या आरोपाखाली माझ्यावर खटला दाखल झाला होता. जिल्हा  महिला  व बालविकास  कार्यालयातर्फे मला पुनर्वसनासाठी सहकार्य आणि 25 हजाराचे अनुदान मिळाले.  मी गवंडी काम करत होतो. मिळालेल्या अनुदानातून वेल्डींग व्यवसाय सुरु केला असून त्यातून मला चांगला फायदा होत आहे. 

दिगंबर म्हापणकर- माझ्यावर मारहाणीचा खटला होता. न्यायालयाच्या आदेशाने आणि जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाच्या  मदतीवर कुक्कुटपालन व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला 100 कोंबड्या होत्या. त्या वाढवून 600 केल्या, कुडाळ, परोळा, मालवण  या ठिकाणी बाजारात कोंबड्या विकून नफा कमवित आहे.



जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ- जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीकडून कैद्यांच्य पुनर्वसनासाठी अनुदान मंजूर केले जाते. दुग्ध व्यवसाय, शेळीपालन,कुक्कुटपालन, शिवणकाम,बेकरी, स्क्रीन प्रिटींग, इलेक्ट्रीशीयन आदी व्यवसायांसाठी हे अनुदान तसेच प्रशिक्षण दिले जाते. मुक्त होणारे बंदी यांनी  यासाठी संपर्क करावा. 



यासाठी परिविक्षा अधिकारी एम.ए. सावंत, महिला बंदी कल्याण अधिकारी व्ही.व्ही. जांभोरे हे काम करत आहेत. यंदाच्या वर्षासाठी तेजस ठाकूर यास कुक्कुटपालन व्यवसायासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. चुकून झालेल्या अपराधासाठी पुन्हा नव्याने पुनर्वसनाची संधी देत महाराष्ट्र शासनाने कुटुंब उभे करण्याची योजना महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून पुढे आणली आहे. यातून अपराध्यांना गुन्ह्यापासून परावृत्त करुन समाजात सामान्य जीवन जगण्यासाठी संधी मिळत आहे. यामधून मानवतेची शिकवण देत ही योजना अपराध्यांना यशस्वी उद्योजक बनवत नवी ओळख पुढे आणत आहे.

           - प्रशांत सातपुते 

          जिल्हा माहिती अधिकारी.  सिंधुदुर्ग