...तेव्हा जगात सर्वात श्रीमंत आपणच वाटायचो !

Edited by: जुईली पांगम
Published on: August 06, 2023 18:03 PM
views 541  views

Friendship day म्हणजे नेमके काय हो? घरातील मोठी माणसे म्हणतात की आमच्या वेळी असले काही फॅड नव्हते बुवा! आता सर्रास शाळा काॅलेज मधली मुले हा फ्रेंडशिप डे साजरा करतात आणि हो आमच्या हातात पण एक रिबीन बांधतात. कुणी चाॅकलेट वाटतात. कुणी पार्ट्या करतात. 

        माझा अनुभव सांगायचा तर मी जेव्हा ज्युनियर काॅलेजात म्हणजे अकरावीत गेले तेव्हा प्रथम या फ्रेंडशिप डे ची तोंड ओळख झाली. नंतर अकरावी बारावी आणि सिनियर काॅलेजची तीन वर्षे फ्रेंडशिप डे मोठ्या थाटात साजरा देखील केला. काॅलेजच्या मुलामुलींमधे केवढा तो उत्साह असायचा. सर्वजण एकमेकांना फ्रेंडशिप बेल्ट बांधायचे. शुभेच्छा द्यायचे. चाॅकलेट, आईस्क्रीम खाणे व्हायचे. आणि बेल्टनी पूर्णपणे भरलेला तो हात घेऊन घरी येताना काय तो रुबाब असायचा. आपल्या जवळ इतके सारे मित्रमैत्रिणी आहेत या कल्पनेनेच अभिमानाने ऊर अगदी भरून यायचा. जगात सर्वात श्रीमंत आपणच असे वाटायचे अगदी! 

        हे सगळे जरी खरे असले तरी मैत्रीची इतकी त्रोटक व्याख्या असू नये असे आता वाटते. मैत्रीला वयाचे बंधन असू नये. लहान थोर सर्वांशी मैत्री करावी. गरीब श्रीमंत, काळा गोरा किंवा जाती धर्माचा कोणताही भेदभाव असू नये. कारण हा समाज आहे म्हणून आपण आहोत. सामाजिक भान प्रत्येकाने जपायलाच हवे. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था आपल्या उपयोगी पडत असतात. त्यामुळे कृतज्ञ भावनेने जगाला सामोरे गेले पाहिजे. मैत्रीचे एक अतूट नाते सर्वांशी जोडले पाहिजे. आज त्याची सर्वांना नितांत गरज आहे. 

        इतकेच नव्हे तर मी म्हणेन की चंद्र, सूर्य, ताऱ्यांशी, नदी, नाले, ओढ्यांशी,झाडे, वेली, फुले, फळे, अगदी वाऱ्यावर डोलणाऱ्या शेतीशी देखील आपले एक मैत्रीचे नाते असावेच की! निसर्गाने आपल्याला काय नाही दिले? आपल्याला जगवले, हसवले, सांभाळले, जपले. तसेच पुस्तके हेदेखील आपले खूप चांगले मित्र असतात. पुस्तक वाचनातून आपलं व्यक्तिमत्त्व संपन्न होतं. विचार प्रगल्भ होतात. मग ही पुस्तके मित्रांपेक्षा कमी आहेत का? 

        आज असा एक व्यापक दृष्टिकोन ठेवून आपण फ्रेंडशिप डे साजरा करूया! बेल्ट बांधायला हरकत नाही. पण मनापासून हे नाते जपण्याचा प्रयत्न करूया. समस्त मानवजातीशी, प्राणीमात्रांशी, निसर्गाशी असणारा आपला ऋणानुबंध जोपासूया!सर्वांशी स्नेहपूर्ण वागणूक ठेवूया!

 Happy friendship day to all! 


✍🏻 स्वप्ना गोवेकर, सावंतवाडी