‘न खाई भोगी तो सदा रोगी’ | जाणून घ्या भोगीचं महत्व

संपूर्ण भारतात साजरा होतो हा सण..
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: January 14, 2023 11:56 AM
views 307  views

‘न खाई भोगी तो सदा रोगी’ हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थच आहे की आनंद घेणारा वा उपभोगणारा!. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. भोगी हा उपभोगाचा सण आहे. या दिवशी काय करतात हे आपण सविस्तर जाणून घेऊ या..  


या दिवशी सकाळी घर आणि सभोवतीचा परिसर स्वच्छ करावा. दारासमोर रांगोळी काढावी. घरातील सर्व लोकांनी अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करावे. या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे. 


भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे. या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी येतात.

 

का करतात भोगी साजरी.. 

इंद्र देवाने धरतीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती, म्हणून पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी, या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते. 

 हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. या पदार्थांमधून उष्णता येते, ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं. 

 

संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. या सणाला देशभरात वेगवेगळी नावे आहेत. तामिळनाडूत हा सण “पोंगल” तर आसाममध्ये “भोगली बिहू” नावाने ओळखा जातो. पंजाबमध्ये “लोहिरी “, तर राजस्थानमध्ये “उत्तरावन” म्हणून साजरा केला जातो.