भाविकांचं श्रद्धास्थान | गुढीपाडव्याला साजरा होणारा श्री सातेरी शांतादुर्गा देवीचा जत्रोत्सव

'कोकणसाद'च्या शानदार विशेष पुरवणीचा थाटात होणार प्रकाशन सोहळा
Edited by: संदीप चव्हाण
Published on: March 21, 2023 19:58 PM
views 247  views

म्हापण : गुढीपाडव्याच्या मंगल मुहूर्तावर म्हापण इथल्या श्री शांतादुर्गा देवीचा जत्रोत्सव मोठया उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्तानं कोकणचं पहिलं दैनिक कोकणसाद शानदार विशेष पुरवणी प्रकाशित करत आहे. या जत्रोत्सवात मान्यवरांच्या हस्ते या पुरवणीचं शानदार प्रकाशन करण्यात येणार आहे. 

चैत्री पाडवा म्हणजे गुढीपाडवा. हिंदू संस्कृतीतील एक मंगलमय दिवस. चैत्री पाडवा हा दिवस साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानला जातो. ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती करण्यास प्रारंभ केला असा उल्लेख पुराणात आहे. या दिवशी सर्वत्र गुढ्या उभारून त्यांची पूजा करून आनंदोत्सव साजरा केला जातो. गुढी आणि दारावरचे तोरण आनंदाचे प्रतीक आहे. या गुढीला ‘ब्रह्मध्वज’ असेही संबोधले जाते.

वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण हे अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेले व वारुळातून प्रकट झालेली श्रीदेवी शांतदुर्गा जागृत देवस्थान असलेले गाव. हिंदू नववर्षदिनी  म्हणजेच गुढीपाडव्याला या मंदिरात मोठी यात्रा भरते. सिंधुदुर्ग, गोवा, मुंबई, बेळगाव, कोल्हापूर, पुणे अशा अनेक ठिकाणाहून तसेच खेड्या-पाड्यातील देवीचे भक्तगण यात्रोत्सवाला हजेरी लावून देवीचे दर्शन घेतात. यावर्षी बुधवार, २२ मार्च रोजी ही यात्रा होत असून येथे पारंपरिक पद्धतीने म्हणजे आगळ्या-वेगळ्या संस्कृतीचे व एकोप्याचे दर्शन घडविणारा गुढीपाडवा उत्सव साजरा होतो.

कोकणच्या धार्मिक व निसर्गरम्य भूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेल्या समुद्रकिनाऱ्याला लागूनच वसलेले वेंगुर्ला  तालुक्यातील म्हापण  हे छोटेसे गाव. या गावाला मिळालेला एक महान वरदहस्त तो म्हणजे या गावातील स्वयंभू वारूळातून प्रकट झालेली व नवसाला पावणारी अशी ख्याती असणारे श्री देवी शांतादुर्गा देवस्थान. हे देवस्थान एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी चैत्र गुढीपाडव्याला येथे मोठी यात्रा भरते. हिंदू नववर्षाचे येथे आगळ्या-वेगळ्या पद्धतीने स्वागत केले जाते. बाहेरच्या ठिकाणी असलेले म्हापणवासीय तसेच माहेरवाशीनी गुढीपाडव्याला न चुकता या उत्सवाला हजेरी लावतात. पाडव्या दिवशी तर देवीच्या मुखवट्यावर एक प्रकारचे विलक्षण तेज असते.

देवी महात्म्यात देवीची अनेक रूपे सांगितली जातात.त्यातील शांतादुर्गा-सातेरी हे एक रूप आहे. म्हापणच्या सातेरी देवीचे महात्म्य अनन्यसाधारण आहे. याची प्रचीती अनेक भाविकांना आली आहे व येत आहे.

धन्य धन्य ग्रामनिवासी

प्रेमी वागविते एकमेकांशी

अशा या म्हापणवासी

भक्तीमळा शिंपण्याकामी

स्वयंभू सातेरी वारूळातूनी

 प्रकट होईल भक्तांलागी...!

अशा काव्यपंक्तींतून ज्याची शक्ती आगाध असलेल्या म्हापण गावातील श्रीदेवी शांतदुर्गा देवीचे म्हापणवासीयांशी अतूट नाते वर्णिले आहे.

शतकानुशतके हिंदू वर्षाच्या प्रारंभीच्या दिवशी श्रीदेवी शांतादुर्गा सातेरी मंदिरात हा ग्रामोत्सव होत आहे. या उत्सवापूर्वी देसरुड होऊन वायंगणी शेतीच्या सुगीच्या मोसमात हा उत्सव येतो. ग्रामअर्थ-तंत्र आणि या उत्सवाचा संबंध आहे.

घाटावरील सुगी आणि कोकणपट्टीवरील सुगी यात मोसमी फरक आहे. आंबा, काजू, कोकम व रब्बी (वायंगणी) भात शेती, वसंत ऋतूचा बहार अशा नैसर्गिक व कोकणच्या आर्थिक संपन्नतेला  सुरुवात पाडव्यानेच होते. म्हणूनच म्हापणमध्ये गुढीपाडव्या दिवशी गावचे चारी सिमधडे दिवपाल म्हणून आणि ग्रामदैवतांना नवसाचा नैवेद्य दाखविल्याशिवाय अन्नग्रहण करीत नाही आणि वायंगणी धान्य त्या दिवसानंतर वापरायला सुरुवात होते. कोचरे, केळुस, पाट-मायनेवाडी (कोचरे -निवती) या सभोवतालच्या चार सीमांना एकच माणूस जाऊन हा नैवेद्य दाखविला जातो. म्हणून त्याला ‘दादरा’ असे संबोधतात.

दादरा कार्यक्रमाला या उत्सवात फार महत्त्व आहे. आता क्वचित अवसार येतो. मात्र दादरा ही संकल्पना आहे तशीच पार पडली जाते. अजूनही दादराच्या कार्यक्रमाला गावातील सर्वजण आवर्जून उपस्थित राहतात. महाशिवरात्रीनंतर शेजारच्या गावात पावणे मंडळींत जाणे, वस्ती करणे, जेवण, पाणी पिणे हे म्हापणवासीयांना वर्ज्य आहे. परंतु कामानिमित्त जे बाहेर गेलेले असतात त्यांना हे शक्य नसले तरी गावात राहणारे तसेच उत्सवाची कामे करणारे बहुतांशी लोक असून देवीच्या श्रद्धेपोटी हे पाळतात. गेले कित्येक वर्षात या कालावधीत हे सर्व पाळणारा म्हापणवासीय विवाह, गृहप्रवेश व अन्य मंगल कार्येही शिवरात्रीपासून गुढीपाडव्यापर्यंत करीत नव्हता. कारण या काळात नातेवाईकांची गैरसोय होऊ नये हे तो पाहत होता. एवढे व्रतस्थ जीवन महिनाभर संपूर्ण गावात पाळत होता. 

गुढीपाडव्या दिवशी नवसाचा नैवेद्य संपूर्ण गावाकडून अर्पण करण्यासाठी अख्ख्या गावातील जनसमुदाय मंदिरात लोटत असतो. भर दुपारी १ वाजता रखरखत्या उन्हात तेही तान्हुल्यांसह व्यक्तिगत व्रत, गावातील बारा-पाच जातीच्या सामूहिक व्रतास्थित विलक्षण आणि त्यातूनच घडलेला गावातील संस्कार किती भक्कम होता हे आजही लक्षात येते ते गावातील वातावरणावरून.

गावात व्यक्तिगत वाद आहेत, परंतु सामाजिक व सार्वजनिक वाद आतापर्यंत तरी पुढे आले नाहीत. सार्वजनिक, राजकीय किंवा सामाजिक जीवनातील गावातील गेल्या ५० ते ६० वर्षांतील इतिहास पाहता एकही प्रसंग नाही की जेणेकरून गाव चर्चेला गेला किंवा गावाला काही गालबोट लागले.

म्हापण गावच्या अनेक शतकांपासूनच्या पूर्वजांनी जे सामाजिक, आर्थिक भान ठेवून नीतीनियम तयार केले त्याची जोपासना काल-परवापर्यंत झाली. त्याचे प्रकटीकरण म्हणजे श्री देवी सातेरी शांतादुर्गा व तिचा गुढीपाडवा उत्सव. हे मर्म परंपरा व परस्पर प्रेम जर म्हापणच्या आजच्या पिढीने आत्मसात केले आणि म्हापणने या स्वरूपाची ओळख या पाडव्यानिमित्त केली तर हीच सामाजिक शांतता व आपुलकी आताच्या अशांतीच्या काळातही पुढे शतकानू शतके राहील, याचा विचार आजच्या युवा पिढीने केला, तरी श्रीदेवी शांतादुर्गा उर्फ सातेरी देवीचा पाडवा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा केला असे म्हणता येईल.