थेंब थेंब पाणी वाचवा !

पाणी अडवा, पाणी जिरवा !
Edited by: विनायक गावस
Published on: July 08, 2023 11:10 AM
views 445  views

'पाणी म्हणजे जल, अन् जल हे जीवन आहे' या वाक्यावरून पाण्याचं या सृष्टीवर काय महत्व आहे ते जाणवतं. कारण पृथ्वी वरील सर्व सजीवांचे जीवन पाण्यावरच अवलंबून आहे. पृथ्वी वरील सर्व जीवांना जिवंत राहण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण सदा सर्वकाळ योग्य व पुरसे ठेवावे लागते. या पाण्याचा वाढता अपव्यय पाहता व भविष्यात पाण्यासाठी निर्माण होणारी युद्ध परिस्थिती लक्षात घेता सावंतवाडीतील निवृत्त प्राचार्य गिरीधर परांजपे यांनी एक संकल्पना मांडली. गेल्या सहा वर्षांपूर्वी त्यांच्या योजनेचा शुभारंभ झाला अन् ही योजना आज महाराष्ट्रभर पोहचली आहे. शाळा, कॉलेज, महाविद्यालयापासून शासकीय विभागांसाठी अभ्यासाचा विषय बनली आहे. ती योजना म्हणजे, ''पाणी अडवा, पाणी जिरवा'' अत्यावश्यक जीवन योजना‌. ही योजना आज काळाची गरज बनली आहे. 


ब्रह्मांडातील 'असंख्य ग्रह गोल, तारे, नक्षत्रापैंकी फक्त पृथ्वीवरच प्राणी व वनस्पती स्वरुपात सजीव सृष्टी आहे आणि म्हणूनच 'पृथ्वी' एक अनमोल रत्न आहे. पृथ्वीवरील या सजीव सृष्टीचे स्त्रोत 'पाणी' हे तुमचे आमचे, सर्वांचे जीवन आहे.म्हणूनच पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान आहे. पाणी समस्या ही खरी जीवन समस्या असून फार गंभीर स्वरुपाची आहे. भविष्यात जर तिसरे महायुद्ध किंवा देशांतर्गत युद्ध झाले, लढाया झाल्या तर त्या पाण्यावरुनच आणि पाण्यासाठीच होतील हे त्रिवार सत्य आहे. म्हणूनच पृथ्वीवरील जीव सृष्टीसह मानव जातीच्या कल्याणासाठी या समस्येकडे आतापासूनच गांभीर्याने पाहिले पाहिजे. पृथ्वीच्या पोटातील जलसाठे कमी कमी होत असून पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. हे असेच चालू राहिल्यास भविष्य काळात पृथ्वीवरील सर्वच जीवसृष्टी धोक्यात येईल. आपण पाणी निर्माण करू शकत नाही ते परवडणारेही नाही. अशावेळी आहे ते पाणी जमिनीवर किंवा जमिनीत साठवून ठेवणे आवश्यक आहे. पावसापासून मिळणारे ८०% पाणी वाहून जात शेवटी समुद्राला मिळून खारट होते. त्याचा काहीही उपयोग करता येत नाही. त्यामुळे ते पुन्हा जीवसृष्टीसाठीही वापरता येत नाही आणि म्हणूनच पावसापासून मिळणारे जास्तीत जास्त पाणी जमिनीत अडवून ठेवणे, जमिनीत मुरविणे म्हणजे पाणी निर्माण करण्यासारखेच आहे. पाण्याची बचत, पाण्याचा कमीतकमी वापर शक्य त्या ठिकाणी शुद्धीकरणाने पुनर्वापर करणे हे सुद्धा पाण्याची निर्मिती करण्यासारखेच आहे.


वाढते प्रदूषण, हवाई हल्ले, तेल जहाजांना लागणाऱ्या आगी, जंगलातील वणवे, ब्रह्मांडाचा शोध घेणारे प्रयोग, त्यातून निर्माण होणारे ग्लोबल वॉर्मिग, पर्यावरण असंतुलन, जंगलतोड, पृथ्वीच्या पोटातील कैक किलोमीटर खोलवर जाणाऱ्या कोळसा व इतर खनिजांच्या खाणी या रुपाने पृथ्वीवर अत्याचार होत आहेत. त्यात भर म्हणून आणखीन एक अत्याचार नलिका कूप विहिरी म्हणजे Borewell च्या रुपाने डोकेवर काढत आहे. प्रत्येक जण वैयक्तिक स्वार्थासाठी आपापल्या जागेत बोअरिंग विहिरी मारतात त्यामुळे पृथ्वीच्या पोटातील पाण्याची पातळी खूपच खालावलेली आहे. सध्या तर ५०० फूटांपासून ते अधिक खोल बोअरिंग मारली जातात, म्हणजेच एक प्रकारे पृथ्वीच्या पोटात हजारो इंजेक्शने देऊन अत्याचार करून पाण्याचा प्रचंड प्रमाणात उपसा केला जात आहे. एक बोअरिंग मारल्यावर पाणी पुरत नाही, मग दुसरी बोअरिंग मारतात मग, तिसरी बोअरिंग आणखी १०० फुट अधिक खोल मारावी लागते अशी चार-पाच बोअरिंग विहिरी मारल्या जातात. त्यापासून नंतर मिळणारे पाणी बंद होते व बोअरिंग फुकट जाते‌. तसेच या हजारो बोअरिंगचा दुष्परिणाम म्हणून आजूबाजूच्या परिसरातील विहिरी, शेत विहीरी आटतात, पाण्याची पातळी खाली जाते तसेच विहिरीतील झरे मार्ग बदलतात. एवढेच नव्हे तर त्यामुळे पृथ्वीच्या पोटातील थंडाई कमीकमी होत असून याचा परिणाम म्हणून पृथ्वीवरील वातावरणात बदल होत आहेत ऋतू बदलत आहेत. अवेळी पाऊस, गारपीट, थंडी, वादळी वारे, धुळीची वादळे, महापूर यासारख्या अनियमित गोष्टी सातत्याचे घडताना आढळतात. या सर्वांवर उपाय म्हणून ३०० फुटाहून अधिक खोलनलिका कुप विहिरी (Boring well) मारण्यास कायद्याने बंदी करून हा अत्याचार थांबविला पाहिजे. तरच भविष्यातील ओढवणारा अनर्थ टाळता येईल. बोअरिंग विहिरीमुळे विहिरीचे झरे आटत असून त्यांचा मार्ग बदलल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य ओढवून माणसे, जनावरे पिण्याच्या पाण्याविना तळमळून मरत आहेत. हे विदारक दृश्य आज सर्वत्र दिसत आहे. १५० ते २०० इंच पर्यंत पाऊस पडत असूनही पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातही पाण्याचे दुर्भिक्ष्य ओढवते हे विदारक सत्य असून त्याची खंत वाटते. सर्व सामान्य विहिरी २० फुटांपासून ५० ते ६० फुट एवढ्याच खोल असतात. त्यामुळे पृथ्वीच्या वरच्या कवचातील साठलेले पाणी झऱ्याच्या रुपाने विहिरींना येते. परंतु, बोअरिंगमुळे विहिरीच्या पाण्याचे झरे देखील खोलवर जाऊन दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. भविष्यात ओढवणाऱ्या या संकटावर मात करण्याचा साधा, सोपा, सरळ, निर्धोक व बिन खर्चिक मार्ग म्हणजेच "पाणी अडवा पाणी मुरवा" ही योजना युद्धपातळीवर देशभर राबविणे हाच एकमेव पर्याय असून त्याला दुसरा पर्याय नाही.


काय आहे पाणी अडवा पाणी जिरवा योजना ?


शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, ग्रामपंचायत, नगरपालिका नगर परिषद, ग्राम विकास मंडळ, सामाजिक संस्था, सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग, रेल्वे, एस्. टी. यासह पर्वत रांगा, डोंगर टेकड्या, ओसाड प्रदेश या सारख्या ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या-त्या ठिकाणी ५' x ३' x २ (५ फुट लांब, ३ फुट रुंद व २ फुट खोल) मापाचे किंवा ५x२x२' (५ फुट लांब, २ फुट रुंद २ फुट खोल) मापाचे खड्डे (चर) खणून त्यात पाणी अडवून ते पाणी जमिनीत मुरविणे हाच एकमेव मार्ग असून त्याला पर्याय नाही. ही योजना म्हणजे एक राष्ट्रीय मोहीम म्हणून तात्काळ राबविणे अत्यावश्यक आहे. अन्यथा भविष्य काळात फार मोठ्या नैसर्गिक आपत्तीला संपूर्ण मानव जातीला तोंड द्यावे लागेल अशी भीती निर्माण झालेली आहे. या देशव्यापी अभियानात शासनाच्या, खाजगी शाळांच्या प्राथमिक शाळांचा, माध्यमिक शाळांचा, उच्च माध्यमिक व महाविद्यालयांचा, सार्वजनिक संस्थांचा, वन विभागाचा, वनसंस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका नगरपरिषद ग्रामसभा, रो. ह. योजना या सारख्या सर्व संस्थांचा सक्रीय सहभाग लाभला पाहिजे तरच हे शक्य आहे. ५' x ३'x२' मापाचा एक खड्डा (चर) खणल्यास त्यात ३० फुट घन फुट पाणी साठेल किंवा ५' x २' x २' मापाचा एक खड्डा (चर) खणल्यास त्यात २० घन फुट पाणी मावेल. याप्रमाणे पावसाळ्यात जून ते सप्टेंबर- ऑक्टोबर या काळात किमान २० वेळा एक खड्डा पाण्याने पूर्ण भरून ते पाणी जमिनीत मुरविल्यास सुमारे ६०० घन फुट ते ४०० घन फुट पाणी एका खड्ड्यापासून जमिनीत मुरविले जाईल. ही योजना सर्व स्तरावर राबविल्यास अब्जावधी घनफुट पाणी जमिनीत मुरवून भविष्य काळात सुजलाम् सुफलाम् भारत बनेल यात शंकाच नाही. हे पाणी मुरविणे म्हणजेच एक प्रकारे लहानसे धरणच तयार केल्यासारखे होईल आणि तेही फुकट, बिन खर्चिक. ही योजना प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालये यांच्या बरोबरच प्राधान्याने डोंगर उतार, टेकड्या, पर्वतरांगा, मोकळी मैदाने, शाळेचा परिसर, क्रीडांगणे तसेच जंगलातील जमिनीवर ही योजना राबविल्यास डोंगरावरून दऱ्याखोऱ्यात वाहून फुकट जाणारे पाणी अडविले जाईल. ते पाणी त्याच जमिनीत मुरेल, जमिनीची धूप थांबेल व जमिनीत मुरलेले पाणी झऱ्याच्या रुपाने विहिरींना मिळेल व खऱ्या अर्थाने राज्य सुजलाम् सुफलाम् होईल !शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणी तसेच ग्रामपंचायती, ग्रामसभा, सरकारी कार्यालये, एस्.टी. डेपो, रेल्वेस्टेशन यांच्या जागेचा वापर केल्यास विद्यार्थ्यांना, कर्मचाऱ्यांना तसेच सर्वसामान्य लोकांनाही पाण्याचे व पाणी अडवण्याचे महत्व समजेल. सुजलाम् सुफलाम् भारत घडविण्यास प्रत्येक नागरिकाचा सहभाग घेता येईल, थोडीशी खबरदारी आणि काळजी घेतल्यास अशा प्रकारचे खड्डे (चर) खणून त्यातील पाणी अडवून जमिनीत मुरविण्यास कोणत्याही प्रकारचा धोका नाही. हे खड्डे पाण्याने पूर्ण भरले असता त्यात एखादा विद्यार्थी किंवा जनावर किंवा प्राणी पडून त्याला जीव गमवावा लागेल अशीही फारशी शक्यता नाही. पावसाच्या पाण्यात डास निर्माण होत नाहीत. त्यामुळे ही योजना बिनधोक आहे.प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालयांमध्येही ही योजना राबविल्यास ती धोकादायक नाही कारण, पावसाळ्यात मैदानांचा खेळासाठी वापर केला जात नाही. शिवाय हे खड्डे किंवा चर शाळेच्या पटांगणाच्या कडेला (कुंपणाजवळ) मारायचे आहेत. त्यामुळे विद्यार्थी जीवितास कोणताही धोका संभवणार नाही. असे वाटते.


जलप्रेमींसाठी घोषवाक्य !

•पाणी अडवा पाणी जिरवा जीवनाची वणवण थांबवा.

•असेल पाणी शेतात तर पीक येईल हातात.

•जिरेल पाणी जमिनीत झरे उमलतील विहीरीत.

•पाने फुले पक्षी प्राणी यांचा आधार फक्त पाणी.

•बचत करु पाण्याची काळजी घेऊ सृष्टीची.

•थेंब थेंब पाणी वाचवा सृष्टीचे या जीवन फुलवा.

•करा नियोजन पाण्याचे कल्याण होईल सर्वांचे.

•पाणी अनमोल आहे.


         प्रतिज्ञा

मी भारताचा नागरिक प्रतिज्ञा करतो की, "मी यंदाच्या पावसाळ्यात ५ फूट लांब 3 फूट रुंद व 2 फूट खोल मापाचा किमान एक तरी खड्डा खणून त्यातील पाणी जमिनीत मुरवून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्याच्या राष्ट्रीय मोहिमेत सक्रीय सहभाग देईन"

जय हिंद ! जय महाराष्ट्र !!




  • गिरीधर विश्वनाथ परांजपे,

          माजी प्राचार्य, सावंतवाडी