
कणकवली : संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित केलेल्या २३ जून या 'आंतरराष्ट्रीय विधवा दिना'निमित्त, महाराष्ट्र शासनामार्फत प्रस्तावित राज्य एकल महिला धोरणाच्या अनुषंगाने कणकवली नगरपंचायत येथे “एकल महिला दिवस” साजरा करण्यात आला. 'विधवा' या शब्दाऐवजी “एकल महिला” ही सन्मानजनक संज्ञा वापरून शहरातील महिलांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमात महिलांच्या समस्या, अडचणी, अपेक्षा आणि शासनाकडून आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरवात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष श्री. संदेश पारकर, मुख्याधिकारी श्रीम.गौरी पाटील,उपनगराध्यक्ष श्री. सुशांत नाईक, नगरसेविका श्रीम. सुमेधा अंधारी, नगरसेवक श्री. जयेश धुमाळे,श्री.रुपेश नार्वेकर, श्री.संकेत नाईक,श्री.लुकेश कांबळे, प्रशाकीय अधिकारी श्री. अमोल अघम, सहा. प्रकल्प अधिकारी श्री.अमोल भोगले, रुचिता ताम्हणकर, ध्वजा उचले, जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग निरीक्षक कोमल माने, महिलां बाल विकास, सिंधुदुर्गच्या सहा. बाल संरक्षण अधिकारी, स्वानंदी शिरसाट, कणकवली पोलीस स्टेशन समुपदेशक केंद्राच्या समुपदेशक, रोजा खडपकर, श्रीम रिया सांगेलकर, सखी वन स्टॉप सेंटरच्या श्रीम अँड मिनाक्षी नाईक, सीमा साळगावकर, नंदिनी मोंडकर, विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग च्या श्वेता सावंत, मिलिंद रासम व शहरातील एकल महिलां मोठया संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष श्री.संदेश पारकर म्हणाले, खरं तर राज्य व केंद्र सरकारच्या आणि नगरपालिकेच्या अनेक योजना आहेत. पण या योजनांबद्दल समाजाचं प्रबोधन त्या ठिकाणी होणे गरजेचे असून या महिलांना नेमकं आपल्याला नगरपंचायत व राज्य शासनाकडून या “एकल महिला” दिनानिमित्त काय फायदे होणार आहेत, याबाबतीची जागरूकता, प्रबोधन या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कारण एक आकस्मिक संकट हे माझ्या महिला भगिनींवर आलेले असत व अश्या अनेक अडचणींना, आव्हानांना त्या ठिकाणी प्रसंगी सामना करत असताना, त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने जर त्या ठिकाणी राज्य शासन, नगरपंचायत उभी राहिली तर त्यांच्या त्या ठिकाणी ज्या वेदना आहेत, दुःख , समस्या आहेत ह्या कुठेतरी कमी होतील. आणि त्यांना एक भक्कम असा आधार त्या निमित्ताने त्या ठिकाणी मिळेल. तसेच आजचा हा कार्यक्रम फक्त एक दिवसाचा कार्यक्रम न राहता या सर्व एकल महिलांचा शाश्वत विकास होणे गरजेचे आहे व त्यासाठी आजच्या कार्यक्रमास उपस्थित सर्व संबधीत महिलांसाठी करणारी कार्यालय, त्याचे मार्गदर्शन करणारे अधिकारी व नगरपंचायत यांनी यांची जबाबदारी घेत अश्या सर्व महिलांना आपण एकत्र करत त्यांना "कशा पद्धतीने मदत करता येईल व महाराष्ट्र शासन आणि कणकवली नगरपंचायतीचा माद्यमातून त्याच्या अडचणी सोडवत सक्षम महिला बनवूया असे ते म्हणाले.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी श्रीम. गौरी पाटील म्हणाल्या की, आजपासून आपल्याला 'विधवा" हा शब्द आतापर्यंत वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या वापरत आलेलो आहोत. त्याच्याऐवजी आपण आता 'एकल महिला' हा शब्द वापरणार आहोत. कारण तुम्ही एकल असला तरी तुम्ही सक्षम आहात. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःचे अस्तित्व निर्माण व्हावं, तुमची स्वतःची एक ओळख निर्माण व्हावी, यासाठी आपण आजपासून आपल्याला 'एकल महिला' हा शब्द आपल्यासाठी वापरला जाणार आहे. आज आपल्याला शासनाच्या महिलांनासाठी असलेल्या योजनायांची माहिती दिली जाईलच तसेच एकल महिलांसाठी रोजगार, स्वयंरोजगार व उपजीविकेच्या संधींबाबत झालेल्या या चर्चा व तुमच्या अडचणी, सूचना एकत्र करून शासनापर्यत पोचवणार आहोत. हे सर्व करत असताना तुम्ही बचत गट च्या माद्यमातून एकत्र यावे नवीन कौशल्ये शिकावी व स्वयं रोजगारच्या माद्यमातून स्वावलंबी बनावे यासाठी लागणारे सहकार्य आपण नगरपंचायत माद्यमातून करू असेही त्या म्हणाल्या,
उपनगराध्यक्ष श्री सुशांत नाईक म्हणाले की, आज एकल महिलांना अनेक अडचणी आहेत त्या तुम्ही आमच्यापर्यंत घेऊन यावे, यासाठी हा कार्यक्रम शासनाच्यावतीने आयोजित केला आहे. यामध्ये आपल्याला अनेक विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करतील. संजय गांधी निराधार योजना व अश्या विविध योजना यांचा लाभ घेताना अनेक अडचणी येत असतात. त्या वर आज चर्चा करावी. या अनुषंगाने काही सूचना आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात किंवा तुमच्या ज्या अडचणी असतील त्या मांडाव्या तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे नगरपंचायत प्रशासनाचं आणि नगरसेवक म्हणून आमचंही काम आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या पाठीशी कायम ठाम आहोत. तुमच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आमच्याकडून १००% केला जाईल असे आश्वासन त्यांनी उपस्थित महिलांना दिले.
यावेळी जिल्हा उद्योग केंद्र, सिंधुदुर्ग यांच्या कडून उद्योग ,व्यवसायसाठी सुरु असलेली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP), बीज भांडवल योजना अश्या रोजगार व उपजीविकेसाठी उपयुक्त योजनांची माहिती दिली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यलय, सिंधुदुर्ग याच्या कडून महिला व बालकासाठी असलेले कायदे याची माहिती देण्यात आली. तसेच मिशन शक्ती – केंद्र शासन, राज्य शासनाच्या महिला व मुलीसाठीच्या शासकीय महिला वसतीगृह, महिला संरक्षण गृह, महिलांकरिता महिला समुपदेशन केंद्रे, नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृह, महिला सक्षमीकरण केद्र, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, मनोधेर्य योजना, सखी वन स्टोप सेंटर अश्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. सखी वन स्टोप सेंटर याच्या कडून महिला हेल्प लाईन – संकटग्रस्त महिलांसाठी केंद्र पुरस्कृत संकटग्रस्त महिलांसाठी सखी One stop crises Centres योजना याची सविस्तर माहिती दिली. कणकवली पोलीस स्टेशन समुपदेशन केद्राकडून महिला समुपदेशन विषयी माहिती देण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या कडून राबविण्यात येणाऱ्या कायदेविषयक विविध योजनांची माहिती उपस्थित महिलांना देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात उपस्थित महिलाच्या अडचणीवर चर्चा व सूचना, निवेदन घेण्यात आली. त्याच शंका समाधान करण्यात आले. कार्यक्रमचे सूत्र संचालन व आभार सहा. प्रकल्प अधिकारी अमोल भोगले यांनी मानले.










