
कुडाळ : कुडाळ नगरपंचायत प्रशासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या गणेश घाटाचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले असून, येत्या गणेश चतुर्थीपूर्वी हा घाट कुडाळवासीयांच्या सेवेत दाखल होणार आहे. स्थानिक नगरसेविका सौ. नयना मांजरेकर यांनी प्रेस नोटद्वारे ही माहिती दिली असून, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण काम करूनच हा घाट नागरिकांच्या सेवेत समर्पित केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
या प्रकल्पाचे भूमिपूजन २९ ऑक्टोबर २०२५ रोजी आमदार निलेश राणे यांच्या शुभहस्ते पार पडले होते. त्यानंतर भंगसाळ नदीच्या पाण्याची पातळी नोव्हेंबर २०२५ अखेर खाली गेल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. धरण कक्ष पाटबंधारे, उपविभाग सावंतवाडी यांच्याकडून संभाव्य पाणी टंचाई नियोजनाच्या दृष्टीने बंधाऱ्यावर प्लेट्स घातल्या गेल्याने, संरक्षण भिंतीचे बांधकाम करताना पाण्यामुळे अपेक्षित गती राखण्यास काही मर्यादा आल्या होत्या. मात्र, या सर्व अडचणींवर मात करत काम वेगाने पुढे नेण्यात आले.
कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर व स्थानिक नगरसेविका नयना मांजरेकर यांच्याकडून या कामाचा सातत्याने पाठपुरावा आणि स्थळ पाहणी केली जात आहे. गणेश घाटाच्या सभोवती सुरू असलेले सुशोभीकरणाचे काम हे पर्यटन विभागांतर्गत सुरू आहे. या सुशोभीकरणाची कामे देखील वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

"गणेश घाट सुशोभीकरणाचे काम तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचे आहे. त्यामुळे कामाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि दीर्घकालीन टिकाऊपणा यालाच नगरपंचायत प्रशासनाने प्राधान्य दिले आहे," असे मांजरेकर यांनी स्पष्ट केले. कामाच्या प्रगतीवर प्रशासनाचे बारीक लक्ष असून, कामात दोष आढळल्यास संबंधित ठेकेदारावर नियमानुसार कारवाई प्रस्तावित केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. काम आधीच नियोजित पद्धतीने आणि जलदगतीने सुरू असल्याने, या कामाबाबत कोणालाही 'अल्टीमेटम' किंवा इशारा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी अप्रत्यक्षपणे सुनावले आहे.
स्थानिक नगरसेविका नयना मांजरेकर यांनी सांगितले की, "मी या भागातील स्थानिक रहिवासी तसेच नगरसेविका असल्याने, कुडाळवासीयांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन याच घाटावर होत असल्यामुळे या कामाबाबत मी अधिक जागरूक व दक्ष आहे. येत्या गणेश चतुर्थीमध्ये आपला गणेश घाट कुडाळवासीयांच्या सेवेसाठी नक्कीच उपलब्ध असेल, याची खात्री मी देत आहे."
नगरपंचायत प्रशासन विकासकामांबाबत पूर्णपणे कटिबद्ध असून, नागरिकांना एक उत्कृष्ट दर्जाचा घाट मिळणार असल्याचे या प्रेस नोटद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.











