
सिंधुदुर्गनगरी : ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेने सुरू केलेले कामबंद आंदोलन शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे मागे घेण्यात आले असून, जिल्ह्यातील सर्व ग्रामरोजगार सहाय्यकांनी आज, २४ जून २०२६ पासून पुन्हा कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नुकतीच मंत्रालयात रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या प्रतिनिधींशी बैठक झाली. संघटनेच्या मागण्यांवर शासनाने सकारात्मक भूमिका घेत गंभीरपणे विचार करण्याचे मान्य केले आहे. बैठकीत ग्रामरोजगार सहाय्यकांना किमान १ हजार मॅनडेज निर्मिती करणाऱ्यांना ८ हजार रुपये मानधन व प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तसेच ग्रामरोजगार सहाय्यकांचे मासिक मानधन थेट त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा करण्याबाबत निर्देश देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय ग्रामरोजगार सहाय्यकांना कामाच्या स्वरूपाचा विचार करून विमा संरक्षण देण्याबाबतही चर्चा झाली आहे. शासनाच्या ३ ऑक्टोबर २०२४ च्या निर्णयानुसार महाराष्ट्रात मासिक वेतन प्रणाली लागू करण्याबाबत सकारात्मकता दर्शविण्यात आली असून, देशभरात लागू होणाऱ्या ‘GRAM’ प्रणालीच्या अनुषंगाने २८ व २९ जून रोजी दिल्ली येथे होणाऱ्या बैठकीत अंतिम धोरणात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. शासनाच्या या सकारात्मक भूमिकेचा आदर करून संघटनेने आंदोलन मागे घेतल्याचे स्पष्ट केले असून, पुढील प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरू राहणार असल्याने ग्रामपंचायत व रोजगार हमी योजनेशी संबंधित कामांना गती मिळणार आहे.











