LIVE UPDATES

कारवाईचा धडाका; पण वाहनच नाही

भेसळी विरोधात एफडीएची मोहीम वेगात | सिंधुदुर्गात क्लास-१ अधिकारी दुचाकीवरूनच छापे | रिक्त पदांमुळे कामकाजावर ताण
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 24, 2026 19:55 PM
views 27  views

सिंधुदुर्गनगरी : राज्यात भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने धडक कारवायांचा सपाटा लावला असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र या मोहिमेला मूलभूत सुविधांच्या अभावाचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्यातील एफडीएचे सहाय्यक आयुक्त (क्लास-१) आणि अन्न सुरक्षा अधिकारी यांना चारचाकी शासकीय वाहन उपलब्ध नसल्याने संपूर्ण जिल्हाभर दुचाकीवरून प्रवास करत कारवाया कराव्या लागत आहेत. त्यातच वाहनचालकासह अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने विभागाची दमछाक होत आहे.

मे महिन्याच्या अखेरीस अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी नियुक्त झालेले तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळीविरोधातील कारवायांना गती दिल्यानंतर सर्वत्र धाडसत्र सुरू झाले आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ विकणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल होत असून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकतेच एमपीएससीमार्फत रुजू झालेले सहाय्यक आयुक्त ललित गायकवाड यांनीही कारवाईचा धडाका लावला आहे. बेकरी, हॉटेल्स, खाद्यपदार्थ विक्रेते, फूड स्टॉल्स यांच्यावर तपासणी मोहीम राबवून विविध ठिकाणांहून अन्नपदार्थांचे नमुने संकलित करण्यात येत आहेत. हे नमुने मुंबईतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जात असून नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह गुन्हेही दाखल केले जात आहेत.

मात्र या कठोर कारवायांमागे विभागाची संघर्षकथा दडलेली आहे. ऑक्टोबर २०२५ च्या आकृतिबंधानुसार चारचाकी वाहन, वाहनचालक आणि नमुना सहाय्यक ही पदे व्यपगत झाल्याने विभागाकडे आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. परिणामी, लांब अंतरावरील कारवाया, अचानक मिळालेल्या तक्रारींची पडताळणी आणि धाडसत्रासाठी अधिकाऱ्यांना दुचाकीवरच अवलंबून राहावे लागत आहे.

विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. जिल्ह्याचा विस्तीर्ण भौगोलिक परिसर, दुर्गम भाग आणि खराब हवामानात कारवाया करणे अधिकाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

याशिवाय नमुना सहायक, प्रमुख लिपिक, वाहनचालक आणि शिपाई ही महत्त्वाची पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदाऱ्या पडत आहेत. त्यामुळे कारवायांचा वेग कायम ठेवताना प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे.

रिक्त पदांचा तपशील- नमुना सहायक, प्रमुख लिपिक, वाहनचालक, शिपाई

'दुचाकीवरूनच संपूर्ण जिल्हाभर छापे!'-भेसळीविरोधातील मोहिमेत आघाडीवर असलेले सहाय्यक आयुक्त ललित गायकवाड हे आजही संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुचाकीवरून फिरत कारवाया करत आहेत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचून नमुने संकलित करणे, तपासण्या करणे आणि तक्रारींची पडताळणी करणे हे काम ते मर्यादित साधनसामग्रीत करत आहेत. मात्र पावसाळ्यातील अडचणी आणि वाढत्या कारवायांचा व्याप लक्षात घेता विभागाला तातडीने चारचाकी वाहन व आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. "भेसळखोरांवर कारवाईचा वेग कायम ठेवायचा असेल तर एफडीएला प्रथम सक्षम करावे लागेल," अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.