जि.प. सभापती निवड उद्या ; राजकीय हालचालींना वेग

दुपारी ३ वाजता विशेष बैठकीत प्रक्रिया ; इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: March 24, 2026 20:24 PM
views 26  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर आता विषय समिती सभापती निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या दि. २५ मार्च  दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणाऱ्या विशेष बैठकीत विविध सभापती पदांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

या बैठकीत दोन विषय समिती सभापती, महिला व बाल विकास सभापती तसेच समाज कल्याण सभापती पदांची निवड होणार असल्याने जिल्हा परिषद सत्तेची पुढील रचना स्पष्ट होणार आहे. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर आता सभापती दालनंही खुली होणार असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

सभापती पदांसाठी इच्छुकांनी आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून महायुतीतही अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. दोन विषय समिती सभापती पदांसाठी वैभववाडी तालुक्यातील कोळपे मतदारसंघाचे प्रमोद रावराणे, कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक मतदारसंघाचे मनोज रावराणे तसेच दोडामार्ग तालुक्यातील माटणे मतदारसंघाचे रामा गवस यांची नावे चर्चेत आहेत.

महिला व बाल विकास सभापती पदासाठी सुप्रिया मेस्त्री, अवनी तेली आणि सुप्रिया वालावलकर यांच्यात चुरस रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर समाज कल्याण सभापती पदासाठी सुमेधा पाताडे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, सभापती निवडीनंतर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेत नव्या सभापतींना खातेवाटप केले जाणार आहे. त्यामुळे उद्याची निवड प्रक्रिया ही केवळ पदनियुक्तीपुरती मर्यादित न राहता जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरण ठरवणारी ठरणार असल्याचे मानले जात आहे.