
कणकवली : कुडाळ - मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने येथील श्रीधर नाईक चौक येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ६२ दात्यांनी रक्तदान केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वैभव नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच रक्तदात्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी एस.एस.पी.एम. मेडिकल कॉलेज पडवेच्या विद्यार्थ्यांनी जागतिक टीबी दिनानिमित्त टीबी सारख्या गंभीर आजारावर उपचारासंदर्भात जगजागृती करण्यासाठी पथनाट्य सादरीकरण केले.
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले, वैभव नाईक यांनी आपल्या राजकीय जीवनात अनेक संघर्ष केले आहेत. त्या संघर्षावर मात करत, आव्हानांचा सामना करत त्यांनी महाराष्ट्रात आपली राजकीय कारकीर्द उभी केली. दोन वेळा ते आमदार राहिले. कणकवली उपनगराध्यक्ष, शिवसेना जिल्हाप्रमुख अशी अनेक पदे त्यांनी भूषविली. त्या सर्व पदांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.आज अनेक आंदोलने जिल्ह्यात उभी राहत आहेत. त्या आंदोलनांचे नेतृत्व वैभव नाईक तितक्याच ताकदीने करीत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न ते करीत आहेत.जनतेसाठी वैभव नाईक यांची धडपड सुरु असून ते नक्कीच पुन्हा एकदा विजयी होऊन आमदार होतील.
उपनगराध्यक्ष सुशांत नाईक म्हणाले, गेल्या २० वर्षाच्या राजकारणात वैभव नाईक यांनी अनेक चढउतार पाहिले. बलाढ्य शक्तीसमोर निवडणूका लढवून त्यांनी अनेक वेळा विजय देखील संपादन केला. जास्तीत जास्त लोकांशी संपर्क ठेवला तर तुम्ही कुठचीही निवडणूक जिंकू शकता, या वैभव नाईक यांच्या राजकीय नीतीनुसार आम्ही सुद्धा काम करत असून त्यामुळेच आम्हाला कठीण असलेल्या कणकवली नगरपंचायत निवणुकीत यश आले. कालचे आंबा - काजू शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्यासाठी सरकारने आणि प्रशासनाने इतर मार्गाने वाहतूक वळवून चाल खेळली होती. त्यामुळे नांदगाव येथे बसून काय होणार नाही, हे वैभव नाईक यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी राजू शेट्टी यांना सांगून आंदोलनाची दिशा बदलण्यास लावली. त्यानंतर कणकवलीच्या दिशेने पायी चालत येत आंदोलन करण्यात आले. वैभव नाईक यांच्या या खेळीमुळे प्रशासनाला झुकावे लागले आणि शेतकऱ्यांना ठोस आश्वासन मिळून आंदोलन यशस्वी झाले. त्यामुळे वैभव नाईक राजकारणात अचूक टायमिंग साधण्याचे काम करतात, हे पुन्हा एकदा दिसून आले.
शिवसेना महिला आघाडीप्रमुख नीलम पालव म्हणाल्या, वैभव नाईक हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेले रक्तदान शिबीर जिल्ह्यातील रुग्णांना नवजीवन देणारे आहे. वेगवेगळ्या प्रश्नांनी जिल्ह्यातील जनता त्रस्त आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रश्नांवर आंदोलन आणि मोर्चाच्या माध्यमातून वैभव नाईक आवाज उठवीत आहेत. जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे वैभव नाईक यांच्या कार्याची जनता नक्कीच दखल घेऊन त्यांना पुन्हा आमदार आणि नामदारही करेल.
यावेळी वैभव नाईक यांच्यासह कणकवलीचे नगरसेवक संकेत नाईक, जयेश धुमाळे, माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, तालुका संघटक राजू राठोड, महिला तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, प्रसाद अंधारी, राजवर्धन नाईक, माधवी दळवी, दिव्या साळगावकर, विलास गुडेकर,अनंत राणे, रोहित राणे, संजय पारकर, रोहिणी पिळणकर, रचना खांदारे, नवजीवन ब्लड बँकेच्या अध्यक्षा भाग्यश्री पवार, उपाध्यक्षा सुप्रिया पवार, प्रा.डॉ. राजेश जगताप, प्रा. मंदार सावंत, गुरु पेडणेकर, प्रमोद सावंत, नितीन राऊळ, बाबी गुरव, दीपेश परब, अरुण परब, सचाभाई, रवी भंडारी, अक्षय गुरव, लक्ष्मण हन्नीकोड, बाळा आर्डेकर, स्वप्नील खांदारे, रवींद्र कदम, शुभम परब आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा गुरव यांनी केले.











