
कणकवली : कणकवली येथील श्री देव काशिविश्वेश्वर देवस्थानात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात दररोज हरिकीर्तन, आरती आणि श्रींची पालखी मिरवणूक यांसारखे भक्तिमय कार्यक्रम होणार आहेत.
उत्सवादरम्यान दररोज सायंकाळी 6 वा. ह.भ.प. किरण पारकर (रा. आंब्रड) यांचे हरिकीर्तन होणार असून सायंकाळी 7.50 वाजता आरती आणि रात्री 8.30 वाजता श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. गुरुवार 26 मार्च रोजी श्रीरामनवमी निमित्त सकाळी श्रींची पूजा व अभिषेक होईल. सकाळी 10.30 वाजता श्रीराम जन्माचे कीर्तन, दुपारी 12 वाजता श्रीराम जन्म सोहळा पार पडणार आहे. दुपारी 2 ते 4 या वेळेत सुंठवडा प्रसाद वाटप करण्यात येणार असून त्यानंतर पालखी मिरवणूक व भजनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी 4 वाजता लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत, श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर संचालक सिद्धेश कलिंगण यांचे ‘करंडक उध्दार’ हे महान पौराणिक दशावतारी नाट्य सादर करण्यात येणार आहे. यादिवशी रात्री 7.50 वाजता दैनंदिन आरती, तर रात्री 9.30 वाजता श्रींची पालखी मिरवणूक व त्यानंतर हरिकीर्तन होणार आहे.
शुक्रवार 27 मार्च रोजी रात्री 9.30 वाजता श्रींची पालखी काढण्यात येणार असून त्यानंतर हरिकीर्तन व लळीत कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होणार आहे. या उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष श्री देव काशिविश्वेश्वर देवस्थानच्या वतीने केले आहे.











