
सावंतवाडी : मळगाव ते सोनुर्ली रेल्वे ट्रॅकच्या दरम्यान एका २५ ते ३० वर्षीय तरुणाचा धावत्या ट्रेनमधून पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वेत्ये पुलाच्या अलीकडे हा मृतदेह आढळून आला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. =
सोमवारी रात्री ८ वाजेपासून ते १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. हा तरुण कोणत्यातरी ट्रेनमधून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. अद्याप या मृतदेहाची ओळख पटलेली नाही.
रेल्वे ट्रॅकमन राजन मोहन पारकर (रा. नेमळे, सावंतवाडी) यांनी या घटनेची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सध्या आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस उपनिरीक्षक लोहकरे, पोलीस हवालदार धोत्रे अधिक तपास करत आहेत. संबंधित मृताचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असून त्याच्याबाबत काहीही माहिती मिळाल्यास किंवा कोणाचा नातेवाईक बेपत्ता असल्यास तातडीने सावंतवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.












