LIVE UPDATES

टोकाची भूमिका घ्यायला तयार, सोडणार नाही

पक्ष, झेंडा, धर्म बघणार नाही : पालकमंत्री नितेश राणे
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 05, 2026 15:10 PM
views 195  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : देशातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ज्याप्रमाणे मोठे प्रयत्न सुरू आहेत त्याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा बनावट दारू, ड्रग्स, मटका, जुगार, बीफ व्यापार पूर्णपणे नष्ट करण्याचा आमचा निर्धार आहे. केवळ किरकोळ विक्री करणाऱ्यांवरच नाही, तर मुख्य सूत्रधारांवर कारवाई केली जात आहे. गुन्हेगार हे गुन्हेगार असून त्यांचा पक्ष, झेंडा, जात, धर्म न बघता कठोरातील कठोर कारवाई केली जाईल. अवैध धंदे मुक्त सिंधुदुर्ग करेपर्यंत मी स्वस्त बसणार नाही. कुठल्याही टोकाला जाण्याची माझी तयारी असून मागे हटणार नाही असे विधान पालकमंत्री नितेश राणेंनी येथे केले . सावंतवाडी येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

पालकमंत्री श्री. राणे म्हणाले, मटका, जुगार, गोवा बनावटी दारू, बीफचा व्यापार करणाऱ्यांना सोडणार नाही. ते आमच्यासाठी गुन्हेगार आहेत.  मागील एका वर्षात गांजा फुकणाऱ्यांसह गांजा विकणाऱ्यांवरही कारवाई झालीय. सगळे धागेदोरे आमच्याकडे असून नक्षलमुक्त देश, महाराष्ट्राच्या दिशेने जात असताना सिंधुदुर्ग देखील ड्रग्स, मटका, जुगार मुक्त करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, राज्याच्या प्रमुखांनी वक्तव्य केल्यानंतर अणूऊर्जा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी देखील ते स्पष्ट केले असून पर्यावरणाला हानी होणारे  काहीही सिंधुदुर्गात येणार नाही. रोजगारासाठी तरूण सिंधुदुर्गच्या बाहेर गेला असून त्यांना परत आणणे  देखील आवश्यक आहे. मात्र, आंदोलनांमुळे सिंधुदुर्गची, देवगडची  प्रतिमा खराब होऊ नये, गुंतवणूकदारांनी इथे येताना सकारात्मकाताही दाखवली पाहिजे याचीही काळजी घेतली पाहिजे. पर्यावरणाला हानीकारक प्रकल्प येणार नाही, हीच आमची भूमिका आहे. मात्र, राणे द्वेषापाई होणारा विरोध ही भूमिका तरुणांचे भविष्य अंधारात टाकणारी आहे. देवगडातील तरूण जागरूक असून तरूण जागरूक असल्यास विकास होतो. आज झालेल्या आंदोलनाच कौतुक असून या तरूणांना देवगडमध्येच नोकऱ्या मिळतील हा माझा शब्द आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच आदर्श शहर बनवण्यासाठी १८ प्रकारच्या सुविधा देताना दर्जेदार क्रीडा संकुल उभारण्यावर आमचा प्रयत्न आहे. आरोग्याच्या दृष्टीने चांगला जिमखाना तयार करण्यासाठी आवश्यक सुचना दिल्या आहेत. निधी देण्यासाठी मी नगराध्यक्षांच्या पाठीमागे आहे. आजची मुलं मोबाईलमध्ये अडकली असून त्यांना खेळाकडे वळवण्यासाठी आमचा मानस आहे. नागरिकांनी देखील त्यात सहभागी होणं आवश्यक आहे. नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोंसले यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. तर सावंतवाडी शहराला पुर्णवेळ मुख्याधिकारी लवकरच  मिळेल. सिंधुदुर्ग जिल्हा ५५ टक्के शासकीय क्षमतेवर काम करत आहे. बरीच रिक्तपद असून ही पद भरण्यासाठी सरकार सज्ज आहे. येणाऱ्या काळात ही रिक्तपद दिसणार नाही. सावंतवाडीला हक्काचा मुख्याधिकारी मिळेल अशीही माहिती त्यांनी दिली. 

...तर 'त्या' ठेकेदाराला सोडणार नाही !  

५७ कोटींच्या नळपाणी योजनेच्या काम वेळेत काम पुर्ण करण्यासह दर्जेदार काम करण्याच्या सुचना मी दिलेल्या होत्या. दर्जात कोणतीही कसूर झालेली दिसली तर आम्ही कोणालाही सोडणार नाही. आमचे कुणाशीही लागेबांधे नाहीत. अशा ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची तयारी आमची आहे. कामात क्वालिटी न ठेवली गेल्यास त्यावर निर्णय घेऊ. या संदर्भात मंत्रालयात मी बैठक बोलावली असून संबंधित ठेकेदारासमक्ष   मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी मिळून या कामाचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेऊ अशीही माहिती त्यांनी दिली. तर दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या बंधूवर झालेल्या चाकू हल्लेखोरावर करवाईसाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कालच दोडामार्गमध्ये आढावा घेतला आहे. तेथील कायदा, सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाल्यामुळे मी त्यांना कार्यवाहीचे आदेश दिलेत. देवेंद्र फडणवीसांच सरकार असताना कुठेही कायदा सुव्यवस्थेचा भंग होऊ देणार नाही, पालकमंत्री म्हणून मी काळजी घेईन असाही विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, सभापती दिपाली भालेकर, मोहिनी मडगावकर, निलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.