LIVE UPDATES

रत्नागिरी विमानसेवेचा मार्ग मोकळा

२५ एकरांवर उभे अत्याधुनिक टर्मिनल
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 05, 2026 16:10 PM
views 46  views
#kokansadlive#news update#konkan update#

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांच्या विमान प्रवासाच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला आता अखेर यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. रत्नागिरी विमानतळाच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, 'डीजीसीए'ची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर येथून व्यावसायिक विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांशी रत्नागिरीचा संपर्क हवाई प्रवासाने अधिक वेगवान होणार असून जिल्ह्याच्या विकासाला नवे बळ मिळणार आहे.

सुमारे १०० कोटी रुपयांच्या खर्चातून २५ एकर जागेवर उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक टर्मिनल इमारतीचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. अंतर्गत सजावट अंतिम टप्प्यात असून, मुख्य रस्त्यापासून टर्मिनलपर्यंतचा १,७०० मीटरचा संपर्क रस्ता तसेच धावपट्टी ते टर्मिनलदरम्यानचा ३२७ मीटरचा मार्ग पूर्ण झाला आहे. आता केवळ पार्किंगचे मार्किंग आणि काही किरकोळ कामे शिल्लक आहेत. या विमानतळावरून ७२ आसनी विमानांची उड्डाणे होणार असून, एकाच वेळी चार विमानांच्या पार्किंगची सुविधा उपलब्ध असेल. व्यावसायिक विमानांसाठी भारतीय तटरक्षक दलाच्या धावपट्टीचा वापर केला जाणार असून, इतर सर्व विमानतळ संचालन तटरक्षक दलाच्या संरक्षण भिंतीबाहेरून केले जाणार आहे. या प्रकल्पाला महत्त्वाचे वळण देणारा तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्यात सामंजस्य करार होणार आहे. या करारानंतर व्यावसायिक विमानसेवेचा मार्ग अधिक सुकर होणार असल्याचे सांगितले जात आहे.  सध्या अलायन्स एअर कंपनीसोबत विमानसेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून, येत्या डिसेंबरअखेर सर्व कामे पूर्ण करून 'डीजीसीए'ची अंतिम परवानगी मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. परवानगी मिळाल्यानंतर रत्नागिरीहून नियमित व्यावसायिक उड्डाणे सुरू होतील.  विमानसेवा सुरू झाल्यानंतर मुंबईसह प्रमुख शहरांपर्यंतचा प्रवास कमी वेळेत शक्य होणार असून, पर्यटन, उद्योग, व्यापार, मत्स्य व्यवसाय आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.