
सावंतवाडी : पालकमंत्री, आमदार, नगराध्यक्ष या खुर्च्या काटेरी आहेत. इथे काम करण्यासाठी वेळ दिला जाता नाही. खुर्चीवरून खाली खेचण्याचा एकतर्फी कार्यक्रम केला जातो. मात्र, हटणार नाही ही भूमिका ठेवा पदाला न्याय द्या, टीकेकडे दुर्लक्ष करून सावंतवाडीच्या विकासावर लक्ष केंद्रित करा असे, आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांना केले. सावंतवाडी नगरपरिषद आयोजित पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज स्मृती जिल्हास्तरीय 'नगराध्यक्षा चषक' स्पर्धेनिमित्त दिलेल्या भेटीदरम्यान श्री. राणे बोलत होते.
पालकमंत्री राणे म्हणाले, आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात तरुण पिढी मोबाईलमध्ये व्यस्त असताना, इनडोअर गेम्सना प्रोत्साहन देण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून तरुणांना मोबाईल बाजूला ठेवून मैदानात उतरण्याची आणि आपला व्यक्तिमत्त्व विकास करण्याची उत्तम संधी मिळेल. यासाठी आवश्यक सावंतवाडीचा स्पोर्ट जिमखाना अधिक सुसज्ज आणि दर्जेदार करण्यासाठी नगरपरिषदेने तातडीने नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार करावा, राज्य सरकारच्या माध्यमातून यासाठी सर्वतोपरी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही मंत्री श्री. राणे यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, आम्ही आमच्या तरुणपणी नेहमी मैदानावर असायचो. खेळ आपल्याला बरेच काही शिकवतो. बुद्धिबळातून जसे डोके चालवायचे कळते, तसेच संघभावनेतून एकजुटीने कसे जिंकायचे याचा बोध मिळतो. समाजात आणि राजकारणातही खेळाडूवृत्ती असणे आवश्यक आहे. जसे खेळाडू आपला संघ जिंकवण्यासाठी प्रयत्न करतात, तसेच आपण सर्वांनी आपला जिल्हा आणि देश जिंकवण्यासाठी प्रयत्न केले, तर विकास अजिबात दूर नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक उत्तम खेळाडू आहेत. अशा स्पर्धांमधून संधी मिळाल्यास भविष्यात आपल्यातूनही विश्वनाथ आनंद किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन पटू निर्माण होऊन ते देशाचे प्रतिनिधित्व करू शकतील. अशा गुणवंत खेळाडूंना पुढे जाण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल.
दरम्यान, आज समाजात पदावर बसलेल्या व्यक्तीचे कौतुक करण्याऐवजी केवळ टीका करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. परंतु, धीरुभाई अंबानी यांनी म्हटले होते की, 'तुम्ही यशस्वी होत आहात हे कशावरून समजायचे? जेव्हा तुमच्यावर सर्वाधिक टीका होते!' त्यामुळे टीकेकडे अजिबात लक्ष देऊ नका. वाकड्या आणि आव्हानात्मक रस्त्यावर ड्रायव्हिंग करायलाच खरी मजा येते. पालकमंत्री म्हणून मी आणि राज्य सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. बॅडमिंटनसोबतच इतर सर्व खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोंसले, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, युवराज लखमराजे भोसले, माजी जि.प. अध्यक्षा रेश्मा सावंत, माजी सभापती प्रमोद सावंत, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, नगर परिषद सभापती मोहिनी मडगांवकर, दिपाली भालेकर, नगरसेवक अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, नगरसेविका नीलम नाईक, सुकन्या टोपले, दुलारी रांगणेकर, सुनिता पेडणेकर, माजी नगरसेवक उदय नाईक, दिलीप भालेकर, केतन आजगांवकर, मधुकर देसाई, नंदू प्रभू देसाई, जोवेल डिसिल्व्हा, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, संतोष गांवस यांच्यासह प्रशासकीय अधिकारी वैभवकुमार अंधारे, नगर अभियंता तुषार सरडे तसेच पालिकेचे इतर अधिकारी, कर्मचारी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खेळाच्या मैदानातही फटकेबाजी
यावेळी पालकमंत्र्यांनी सहभागी खेळाडूंना आणि आयोजक टीमला पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर बुद्धिबळ व कॅरम स्पर्धेला देखील भेट दिली. यावेळी कॅरम खेळण्यासह बॅट मिंटन खेळण्याचा आनंदही पालकमंत्री नितेश राणे यांनी लुटला. नागरिकांनी देखील आरोग्य जपण्यासाठी खेळाकडे वळावं असाही संदेश दिला.











