
दोडामार्ग : घोटगे येथे झाड तोडताना वुड कटर लागून झालेल्या अपघातात पायाच्या मांडीवरील रक्तवाहिनी कापली गेल्याने साटेली- भेडशी येथील नागेश लाडू मयेकर ( वय - ४०) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर त्याला साटेली - भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी तातडीने हलविण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. त्याच्या या अकाली निधनाने साटेली-भेडशी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
हसतमुख आणि मितभाषी स्वभावामुळे नागेश साटेली - भेडशी व पंचक्रोशीत चांगलाच परिचित होता. त्याचा मित्रपरिवारही मोठा होता. लहानपणापासूनच अत्यंत हालाखीत लहानाचा मोठ्या झालेल्या नागेशने मोठ्या मेहनतीने स्वतःचा संसार उभा करत कुटुंबाला मोठा धीर दिला होता. महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्याने सुरवतीला साटेली भेडशी येथे दुचाकी पायलीटिंगचे काम केलं. त्यानंतर काही काळ पत्रकारिताही केली. पदवी शिक्षण पुर्ण केल्यावर तो एका गोव्यातील खासगी कंपनीत तो कामाला होता. मात्र सुट्टीच्या दिवशी तो शेती बागायती व अन्य मेहनतीची, कष्टाची कामे करायचा. मंगळवारी सकाळी तो घोटगे शेतावरील झाड कापण्यासाठी गेला असता तिथं काम करत असताना त्याचा दुर्दैवी अपघात झाला. झाडाची फांदी कापत असताना ती फांदी तुटल्यावर आडवी आली आणि त्याचबरोबर कटरवरील नागेशचे नियंत्रण सुटले. चालु स्थितीतिल तो वुड कटर त्याच्या मांडीला कापून गेला. यात पाय आणि मांडीच्या रक्तवाहिन्या कापल्या गेल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. शिवाय घाव ही मोठा असल्याने आरोग्य केंद्रात दाखल करेपर्यंत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याच अवस्थेत नागेशचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघातानंतर घोडगे येथून ग्रामस्थांनी साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखलही केले. मात्र त्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवल्याने वैद्यकीय अधिकारी जगदीश पाटील यांनी त्याला मृत घोषित केले. सामाजिक कार्यात, अडलेल्या लोकांना मदत करणं, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अग्रस्थानी असायचा. त्याच्या या दुर्दैवी एक्झिटने हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात पत्नी, सातवीत शिकणारा मुलगा, एक भाऊ, बहिण, भावजय असा परिवार आहे.