
सिंधुदुर्गनगरी : गावराई सिद्धार्थनगर येथील सुंदर भगवान कदम (३८) या तरुणाने शाळेमागील फणसाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुंदर कदम हा मनमिळावू स्वभावाचा होता. कालपासून तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला होता. दरम्यान आज दुपारी २ च्या सुमारास घरच्यांना शाळेमागील परिसरात फणसाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला. ही घटना लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच सिंधुदुर्गनगरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेतला आहे. दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेचा पुढील तपास सिंधुदुर्गनगरी पोलिस करत आहेत.










