
वैभववाडी : तिथवली काझीवाडी येथील अय्युब उमर इसफ (वय ७५) या वृद्धाचा मृतदेह आज (ता.१४) सकाळी साडेआठच्या सुमारास गावातील तलावात आढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अय्युब इसफ हे शेळीपालन व्यवसाय करीत होते. शुक्रवारी दुपारी सुमारे पावणेचार वाजण्याच्या सुमारास त्यांनी घरामागील माळरानावर बकऱ्या चरायला सोडण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत ते घरी परत येणे अपेक्षित होते; मात्र ते परतले नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. शोध घेऊनही ते आढळून न आल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजन पाटील, हरेश जायभाय आणि रणजित सावंत हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने परिसरात शोधमोहीम राबविली. मात्र रात्रीपर्यंत त्यांचा काहीच मागमूस लागला नाही. आज सकाळी सात वाजल्यापासून पुन्हा शोध सुरू करण्यात आला असता गावातील तलावात इसफ यांचा मृतदेह आढळून आला. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.
तलावाच्या काठी त्यांची चप्पल आढळून आली. आंघोळीसाठी तलावात उतरल्यावर पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी अबिद अली उमर काझी यांनी पोलिसांत खबर दिली असून पुढील तपास सुरू आहे.










