
कुडाळ : मुंबई - गोवा महामार्गावरील वेताळबांबर्डे पुलाजवळ शनिवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास एका कारला भीषण अपघात झाला. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी कार महामार्गालगत असलेल्या सखल भागात जाऊन पलटी झाली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार मुंबईवरून गोव्याच्या दिशेने प्रवास करत होती. वेताळबांबर्डे पुलाजवळ रस्त्याची लेन अचानक अरुंद होते. अंधार असल्याने आणि रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. परिणामी, कार महामार्गाच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन उलटली. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य केले. विशेष म्हणजे, याच वळणावर सलग दुसऱ्या दिवशी अपघाताची घटना घडली आहे. महामार्गाचे काम अर्धवट असल्याने आणि दिशादर्शक फलकांचा अभाव असल्यामुळे येथे सातत्याने अपघात होत आहेत. या धोकादायक वळणामुळे वाहनचालकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
वारंवार होणाऱ्या अपघातांनंतरही संबंधित ठेकेदार आणि महामार्ग प्रशासन ढिम्म का? असा सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहेत. "प्रशासन कुणाच्या मृत्यूची वाट पाहत आहे का?"
"महामार्गाचे हे काम पूर्ण कधी होणार?" अशा संतप्त प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत. दररोज होणाऱ्या या अपघातांकडे प्रशासनाने डोळेझाक केल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.











