
सावंतवाडी : पावसाळा तोंडावर आलेला असतानाच शहराच्या हद्दीवर कोलगाव येथील स्वागत कमान परिसरामध्ये जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने वाहनधारक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाचे लक्ष वेधूनही या समस्येकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याने स्थानिक नागरिकांमधून व प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता असून प्रशासनाला जाग येणार कधी ? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
कोलगाव येथे शहराच्या सीमेवरील या भागात ही धोकादायक परिस्थिती कायम आहे. मागील वर्षीही या साचलेल्या पाण्यामुळे रात्रीच्या वेळी दोन ते चार दुचाकींचे गंभीर अपघात झाले होते. रात्रीच्या अंधारात अचानक समोर साचलेले पाणी दिसत नसल्याने आणि समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर दिव्यांमुळे पाण्याचा अंदाज येत नाही. यामुळे दुचाकी घसरून अपघात होत आहेत अशी माहिती स्थानिकांनी दिली. शेजारी असलेल्या मातीच्या ढिगामुळे पाणी रस्त्यावर साचुन राहत आहे. सध्या या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना दुचाकीस्वारांची मोठी कसरत होत आहे. याचसोबत रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांनाही या साचलेल्या घाण पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे. पावसाचा जोर वाढण्यापूर्वी या पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्काळ योग्य ती उपाययोजना करावी, अन्यथा येथे होणाऱ्या कोणत्याही लहान-मोठ्या अपघाताला प्रशासनच जबाबदार असेल, असा इशारा वाहनधारकांनी दिला आहे.











