
देवगड : अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे उरलेले आंबा पीक मोठ्या प्रमाणात खराब झाले असून प्रक्रियेस अयोग्य ठरत असल्याने आजपासून कॅनिंग सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दांडेकर आंबा कॅनिंग, पुरळचे संचालक मिलिंद दांडेकर यांनी दिली.
कॅनिंगसाठी येणाऱ्या आंब्यामध्ये बिटकी, फुटका, कोवळा, झाडपिका तसेच लासा अशा प्रकारच्या आंब्याचे प्रमाण मोठे असल्याचे त्यांनी सांगितले. हा आंबा नाशवंत व प्रक्रियेस अयोग्य असल्याने मोठ्या प्रमाणात माल टाकून द्यावा लागत आहे. त्यामुळे कॅनिंग प्रक्रियेसाठी योग्य दर्जाचा माल उपलब्ध होत नसल्याने कॅनिंगला अपेक्षित दर मिळत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कॅनिंग कंपन्यांकडून पुढे ज्या मोठ्या कंपन्यांना माल पाठविला जातो, त्या कंपन्याही मालाची गुणवत्ता तपासूनच खरेदी करतात. खराब किंवा दर्जाहीन माल असल्यास तो स्वीकारला जात नाही. त्यामुळे स्थानिक स्तरावर चांगल्या प्रतीचा आंबा मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे दांडेकर यांनी नमूद केले.
यावर्षी कॅनिंग आंब्याला सुरुवातीला ६० रुपयांपर्यंत दर मिळाला होता. मात्र हंगामाच्या अखेरीस तो घसरून किमान २० रुपयांपर्यंत खाली आला. दरम्यान, यंदाचा आंबा हंगाम जवळपास संपुष्टात आला असून उरलेला मालही पावसामुळे खराब झाल्याचे चित्र आहे.
“शेतकऱ्यांनी कॅनिंगसाठी चांगल्या दर्जाचा माल द्यावा. प्रक्रियेस योग्य माल मिळाल्यास मोठ्या कंपन्यांकडून मागणी वाढेल आणि त्याचा थेट फायदा स्थानिक शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे भविष्यात कॅनिंग आंब्याला चांगला दर मिळण्यास मदत होईल,” असे आवाहन मिलिंद दांडेकर यांनी केले.
“आम्ही गेली ३२ वर्षे या व्यवसायात आहोत. मात्र सध्या कॅनिंगसाठी येणाऱ्या मालापैकी जवळपास अर्धा माल खराब अवस्थेत असतो,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.











