
वेंगुर्ला : आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पाण्याला तसेच निसर्गातील विविध घटकांना विशेष महत्त्व आहे. आपल्या पूर्वजांनी ज्या परंपरा जपल्या, त्याच परंपरेनुसार जलपूजन करून गावामध्ये समृद्धी आणि विकास नांदावा, या धार्मिक व आत्मीय भावनेतून आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पाण्याचा वापर आपण आपल्या गरजेपुरताच आणि काटकसरीने करणे अत्यंत आवश्यक आहे. आज अनेक ठिकाणी पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असल्याने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन, संवर्धन आणि जपणूक करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. गावातील ग्रामस्थ, पदाधिकारी आणि अधिकारी यांनी परस्पर समन्वयाने काम केल्यास निश्चितपणे चांगले परिणाम मिळतील असे प्रतिपादन जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी वजराट येथे केले.
यावेळी ग्रामपंचायत पंचायत अधिकारी प्रवीण भोई, ग्रामपंचायत सदस्य प्रियांका केरकर, रसिका मेस्त्री, नम्रता देसाई, नयना धुरी, शामसुंदर पेडणेकर, प्रविण कांदे, चेतन नाईक, सोसायटी चेअरमन मनोहर परब, प्रेमानंद भोसले, सामाजिक कार्यकर्ते नितीन चव्हाण, नितीन परब, साईप्रसाद केरकर, मकरंद गोंधळेकर, ग्रा. प. कर्मचारी प्रवीण गावडे, पूर्वा कांदे यांच्यासहित, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
तालुक्यातील वजराट ग्रामपंचायतच्या वतीने वजराट व देवसु या महसुली गावात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत जल महोत्सव कार्यक्रम संपन्न झाला. सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत ते मुख्य जलस्रोत अशी प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी मुख्य जलस्रोताचे पूजन करून विद्यार्थिनी व महिलांच्या जलकलशातुन वाजत गाजत हे जलकलश ग्रामपंचायत येथील मुख्य कार्यक्रम स्थळी आणण्यात आले. मुख्य जलकलशात हे जल अर्पण करून जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते मुख्य जलकलशाचे पूजन करण्यात आले.
यानंतर प्रमुख मान्यवर पंचायत समिती सभापती शंकर घारे यांच्या हस्ते वृक्षपुजन करून मुख्य जल कलशातुन वृक्षाला जल अर्पण करण्यात आले. तसेच मान्यवर जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, सुचिता वजराटकर, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, सरपंच अनन्या पुराणिक, उपसरपंच दीपिका राणे, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागीय अभियंता प्रफुल्लकुमार शिंदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते वृक्षाला जलअर्पण करण्यात आले.
यानंतर मुख्य व्यासपीठावर दीपप्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. ग्रामपंचायतच्या वतीने मान्यवरांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी यांचाही ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच जनसुविधे अंतर्गत बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायतच्या सभागृहाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण यांनी केले.
अग्रगण्य ग्रामपंचायत म्हणून वजराट ग्रामपंचायतीचा उल्लेख करावा लागेल. या ग्रामपंचायतीने शासनाच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्प मार्गी लावले आहेत. जलजीवन मिशनच्या माध्यमातून विविध कामे सुरू असून, या कामांमध्ये सर्वांच्या सहकार्याने प्रगती होताना दिसत आहे. विकासकामांसाठी सर्वांनी एकजुटीने आणि सकारात्मक भावनेने काम करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीच्या विविध योजना आणि शासनाच्या विविध विकास योजना गावामध्ये उत्साहाने राबविल्या गेल्या पाहिजेत.
जलसंवर्धनाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा. ग्रामपंचायत पाणीपुरवठा करत असली तरी प्रत्यक्ष नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी करतात. त्यांना अनेकदा नागरिकांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आज या कर्मचाऱ्यांचा करण्यात आलेला सन्मान निश्चितच कौतुकास्पद आहे. असे सभापती शंकर घारे म्हणाले.










