LIVE UPDATES

'त्या' मुलाला कणकवली पोलिसांनी केले नातेवाईकांच्या स्वाधीन

कणकवली पोलिसांची तत्परता; ओरोस रेल्वे स्थानकावर सापडला होता मुलगा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 05, 2026 13:46 PM
views 286  views

कणकवली : ओरोस रेल्वे स्थानक परिसरात आढळून आलेल्या बारा वर्षीय मुलाचा कणकवली पोलिसांनी तत्परतेने शोध घेत त्याला सुरक्षितपणे नातेवाईकांच्या स्वाधीन केले. कणकवली पोलिसांच्या या तत्परतेचे कौतुक होत आहे. लवेश गुरुदास गुरव (वय १२, इयत्ता सातवी, रा. सांताक्रुझ, मुंबई) हा मुलगा ओरोस रेल्वे स्थानकावर आढळून आला होता. त्याने आपले गाव कणकवली असल्याचे सांगितल्यानंतर एका स्थानिक रिक्षाचालकाने त्याला कणकवली पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले.

यावेळी कणकवली पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांनी तत्काळ हालचाली सुरू करत मुलाच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मुलाने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याच्या गावातील संबंधित व्यक्तींशी संपर्क साधला. त्यानंतर मुलाचे नातेवाईक रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील वाकेड येथे राहत असल्याची माहिती मिळाली.

कणकवली पोलिसांनी वाकेड येथील स्थानिक पोलीस पाटील तसेच संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधून मुलाच्या नातेवाईकांशी संपर्क केला. त्यानंतर शुक्रवारी रात्री सुमारे ११ वाजता लांजा-वाकेड येथील त्याचे काका विजय कृष्णा गुरव आणि गावचे पोलीस पाटील जयवंत सावंत यांच्या स्वाधीन लवेश गुरव याला करण्यात आले. पोलिसांच्या तत्परतेमुळे बारा वर्षीय मुलाला सुरक्षितपणे त्याच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचविण्यात यश आले.