LIVE UPDATES

मिनी काश्मीरमध्ये 'मूळशी पॅटर्न' ?

ग्रामस्थांनी उधळून लावली जमीन मोजणी | रिकाम्या हाती परतले अधिकारी
Edited by: विनायक गांवस
Published on: May 20, 2026 19:42 PM
views 57  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरशिंगे गावातील जैवविविधतेने नटलेली अब्जावधी रुपयांची सामाईक जमीन हडपण्याचा मोठा डाव काही धनाढ्य दलाल आणि महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू असल्याचा खळबळजनक आरोप ग्रामस्थांनी केला होता. या पार्श्वभूमीवर आज २० मे रोजी भूमी अभिलेखकडून होणारी जमीन मोजणी उधळून लावण्यात आली आहे. शिरशिंगे येथील ग्रामस्थ, तरुण आणि चाकरमान्यांनी ही मोजणी उधळून लावत पूर्वजांची संपत्ती कुणाच्या घशात घालू नका, असे आवाहनही ग्रामस्थांनी केले.

भू-माफियांनी महसूल विभाग आणि संबंधित खात्यातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून गरीब, अशिक्षित शेतकऱ्यांना पैशांचे आमिष दाखवले आहे. त्यांच्या गरिबीचा गैरफायदा घेत ही सामाईक जमीन राजरोसपणे खरेदी केली जात आहे. महसूल खात्याकडून ही खरेदीखते नोंदवताना इतर कोणत्याही कायदेशीर सहभागधारकांना किंवा सहधारकांना कोणतीही पूर्वसूचना अथवा कायदेशीर नोटीस देण्यात आलेली नाही. नियम धाब्यावर बसवून ही खरेदीखते मारली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आल होते. तसेच ही मोजणी होऊ नये अशी मागणी करण्यात आली होती. आज भूमीअभिलेखचे अधिकारी मोजणीसाठी गावात गेले असता ग्रामस्थांनी ही जमीन मोजणी उधळून लावली. यावेळी शिरशिंगे गावची जमीन धडे वाटप न करता विकण्याचा घाट घातला आहे. एकमताने त्याला आम्ही विरोध करू, असे मत ग्रामस्थ नारायण राऊळ यांनी व्यक्त केले.‌ तर जमिन विक्रीचा घाट गावात घातला जात असून धनदांडग्या व्यक्तींसह भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून हा डाव आखला जात आहे. मात्र, आम्ही ग्रामस्थ एक आहोत, आमची एकजूट दाखवून देऊ, असा इशारा ग्रामस्थ पांडुरंग राऊळ यांनी दिला. 

दरम्यान, सामाईक जमीन मोजणीला आमचा तीव्र विरोध आहे. मोजणीचा घाट आम्ही मोडीत काढला. धनाड्य लोकांनी एजंटांच्या जीवावर एक गुंठाही जागा देखील इथं खरेदी करू नये. आमच्या पूर्वजांनी ही सामाईक जागा राखली आहे. ती आम्ही विक्री करू देणार नाही, त्याला विरोध करू. गावाबाहेरील व्यक्तींना जमीन विकू नका, जमीन राहीली तर गाव अन् मंदीर राहील, गावपण राहील. ग्रामस्थांनी आमिषाला बळी पडू नये असे आवाहन शिरशिंगे सरपंच दीपक राऊळ यांनी केले. तसेच शासनाने चुकीच्या पद्धतीने काम करू नये असेही त्यांनी म्हटले. 


ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर अधिकारी मोजणी न करता परतले.  अर्जदार तारक आरोलकर यांनी मोजणी करण्यासाठी पैसे भरले होते. त्यानुसार आगावू नोटीसा काढून  प्रत्यक्ष गावात उपस्थित होतो. मात्र, ग्रामस्थांनी यासाठी विरोध केला असून लेखी म्हणणे देखील दिले आहे. वाटप झालेलं नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून धडे वाटप झाल्याशिवाय व सर्वांना नोटीस मिळाल्याशिवाय मोजणी करण्यासाठी देणार नसल्याचे तसेच काहींचे ही मोजणी करू देणार नसल्याचे सांगत त्याला कायम विरोध राहणार असल्याचे सांगितल्याची माहिती भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी दिली. ग्रामस्थांच्या विरोधामुळे जमीन मोजणी अधिकाऱ्यांना रिकाम्या हाती मागे परतावे लागले. ग्रामस्थांचा विरोध बघता आगामी मिनी काश्मीर असणाऱ्या शिरशिंगे गावातील ग्रामस्थांच्या भूमिकेबाबत स्थानिक प्रशासन कोणती भूमिका घेत ? याकडेही लक्ष लागून राहिले आहे.