
सिंधुदुर्गनगरी : राज्यात एल निनो सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केल्याने यंदाच्या पावसाचे गणित बिघडण्याची चिन्हे आहेत. पावसात खंड पडण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांना खरीप हंगामात तग धरता यावा, यासाठी कृषी विभागामार्फत २५ व २६ मे रोजी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार असून शेतकऱ्यांना पीक नियोजन व आवश्यक काळजीबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत देण्यात आली.
जिल्हा परिषद कृषी समितीची सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती तथा उपाध्यक्ष दादा साईल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा कृषी अधिकारी दिशांत कोळप, सदस्य विजय नाईक, शोभा गावडे, सुजाता पडवळ, अक्षता गावडे, पार्वती गवस, सुयोगी घाडी तसेच तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
सभेत एल निनोच्या संभाव्य परिणामांवर चर्चा करण्यात आली. पावसात अनियमितता निर्माण झाल्यास शेतीचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक निवड, पेरणीचे नियोजन आणि पाण्याचे व्यवस्थापन याबाबत दक्षता घेणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष ग्रामसभांमधून शेतकऱ्यांना परिस्थितीनुरूप शेती नियोजनाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
दरम्यान, कृषी विभागाने जिल्हा परिषदेकडे २ कोटी ७३ लाख ६८ हजार ६०० रुपयांच्या अंदाजपत्रकाची मागणी केली होती. मात्र सुधारित अंदाजपत्रकात विभागाला २ कोटी ५ लाख ६८ हजार ६०० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विभागाला आणखी निधीची आवश्यकता असून वाढीव निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सभापती दादा साईल यांनी स्पष्ट केले.
तसेच तुळस आणि मातोंड परिसरात गवारेड्यांचा वाढता धुडगूस हा मुद्दाही सभेत उपस्थित करण्यात आला. काही दिवसांपूर्वी गवारेड्यांच्या कळपाने रस्त्यावरील वाहनांना धडक देऊन नुकसान केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र अशा नुकसानीस वन विभाग किंवा शासनाकडून भरपाई मिळत नसल्याकडे सदस्य सुजाता पडवळ यांनी लक्ष वेधले. गवारेड्यांमुळे वाहनांचे नुकसान झाल्यास नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी सभेत केली.










