LIVE UPDATES

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतबराज अभियानात अणसूर ग्रा.प. वेंगुर्ले तालुक्यात प्रथम

ग्रा.प. पेंडूर द्वितीय तर ग्रा. प. परुळेबाजार तृतीय
Edited by: दिपेश परब
Published on: May 20, 2026 19:49 PM
views 31  views

वेंगुर्ला: ग्रामविकास व पंचायतराज विभाग अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” चा निकाल नुकताच जाहीर झाला. यात वेंगुर्ला तालुक्यात ग्रामपंचायत अणसूरने प्रथम क्रमांकासहित १५ लाखांचे बक्षीस मिळवले आहे. 

   ग्रामविकास व पंचायतराज विभाग अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान”  हे महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुरू केलेले अभियान आहे. यामध्ये ग्रामीण विकास, स्वच्छता, कर वसुली, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, लोकसहभाग आणि शाश्वत विकास यावर भर दिला जातो. या अभियानात वेंगुर्ले तालुक्यातुन तालुक्यातील एकूण ग्रामपंचायतीच्या २० टक्के म्हणजेच ३० ग्रामपंचायतीं पैकी ६ ग्रामपंचायतीनी भाग घेतला होता. या अभियान अंतर्गत नुकतेच पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या पंचायत समिती टीमने मूल्यांकन केले होते. 

  यात ग्रामपंचायत अणसूरने प्रथम, ग्रामपंचायत पेंडूरने द्वितीय, ग्रामपंचायत परुळेबाजारने तृतीय तर ग्रामपंचायत मेढा व ग्रामपंचायत पालकरवाडी यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले आहेत. या ग्रामपंचायतीना अनुक्रमे १५ लाख, १० लाख, ८ लाख व उत्तेजनार्थ प्रत्येकी ५ लाख बक्षीस रक्कम मिळणार आहे. या यशाबद्दल वेंगुर्ला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, सर्व विस्तार अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.