नेरूर ठाकूरवाडीत पुन्हा रस्ता रोखल्याने ग्रामस्थ हवालदिल

सुदिन ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: April 29, 2026 21:19 PM
views 132  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरूर ठाकूरवाडी येथे पुन्हा एकदा रस्ता अडवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सुदिन महादेव ठाकूर यांच्यावर ग्रामस्थांनी रस्ता अडवल्याचा आरोप केला असून, यामुळे स्थानिक २० ते २५ कुटुंबांची मोठी कोंडी झाली आहे. प्रशासनाने यापूर्वी केलेल्या कारवाईनंतरही पुन्हा एकदा हा मार्ग बंद करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नेरूर ठाकूरवाडी येथील रस्ता काही महिन्यांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. यावर उपाय म्हणून १७ डिसेंबर २०२५ रोजी कुडाळ पंचायत समितीच्या वतीने एक विशेष मोहीम राबवण्यात आली होती. यावेळी कुडाळचे गटविकास अधिकारी (BDO), गटशिक्षण अधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत हा रस्ता मोकळा करण्यात आला होता. प्रशासनाने या मार्गाला कुंपण घालून तो सर्वांसाठी खुला करून दिला होता.

प्रशासनाने केलेल्या कारवाईनंतरही, २६ आणि २७ एप्रिल २०२६ रोजी सुदिन ठाकूर यांनी पूर्वी लावलेले कुंपणाचे पोल तोडून पुन्हा एकदा काटेरी कुंपण घातले आहे. या कृत्यामुळे येथील २० ते २५ घरांकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. पोलीस प्रशासनाने यापूर्वीच सुदिन ठाकूर यांना समज दिली होती, परंतु पोलीस प्रशासनाच्या सूचनेला न जुमानता त्यांनी पुन्हा हा रस्ता अडवला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

रस्ता अडवण्यासोबतच सुदिन ठाकूर यांनी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरूनही ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. हे कॅमेरे थेट ग्रामस्थांच्या घरांच्या दिशेने रोखलेले असल्याने, महिलांना असुरक्षित वाटत आहे. तसेच, या कॅमेऱ्यांना असलेल्या स्पीकरद्वारे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ केली जात असल्याचा धक्कादायक आरोपही महिला ग्रामस्थांनी केला आहे.

वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे ठाकूरवाडीतील नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, हा रस्ता तातडीने खुला करावा आणि ग्रामस्थांना सुरक्षित वातावरण मिळावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

यावेळी संज्योती जोशी, करिष्मा जोशी, दीपाली ठाकूर, सुलोचना नाईक, जानव्ही परब, श्वेता माधव, अंकुश जोशी, मोहन जोशी, संजय वरक, अमेय शिंदे, जितेंद्र परब, प्रसाद परब, अक्षय शिंदे, जागृत परब, विघ्नेश जोशी,गौरव ठाकूर, हर्षद ठाकूर उपस्थित होते