साप पकडताना सर्पमित्राला दंश

उपचारासाठी रुग्णालयात जाताना कारचा अपघात.!
Edited by: नागेश दुखंडे/स्वप्नील लोके
Published on: April 29, 2026 23:01 PM
views 84  views

देवगड : आरा येथे साप पकडताना एका सर्पमित्राला सापाने दंश केल्याची घटना घडली. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. राजेंद्र पंढरीनाथ पारकर (६४) असे या सर्पमित्राचे नाव आहे. मिळालेली माहिती अशी की, राजेंद्र पंढरीनाथ पारकर हे देवगड येथील आरा येथे साप पकडण्यासाठी गेले होते. यावेळी सापाने त्यांच्या हाताला दंश केला. सर्प दंशानंतर ते तातडीने स्वतःच्या सुमो गाडीने शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि अन्य दोन व्यक्ती गाडीत होत्या. शिरगाव येथे जात असताना समोरून येणाऱ्या एका रिक्षाला आणि बोलेरो गाडीला पारकर यांच्या सुमो गाडीची धडक बसली. या अपघातात रिक्षाचालक जखमी झाला असून गाड्यांचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर पारकर यांना तातडीने शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, अधिक उपचारांची गरज असल्याने त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. एकाच वेळी सर्पदंश आणि अपघात अशा दोन संकटांना त्यांना सामोरे जावे लागले. अपघात प्रकरणी अधिक माहिती समजू शकली नाही. मात्र पुढील कार्यवाही सुरू होती.